वरकस जमीन: भातशेतीच्या लागवडीमध्ये राबखताच्या कामासाठी उपयोगात आणली जाणारी व त्यानुसार महसूल अभिलेखात वरकस म्हणून वर्गीकृत केलेली जमीन.
ओलिताची जमीन: लागवडीखालील क्षेत्रात पाण्याचा पुरवठा हंगामी, बारमाही असेल तर अशा जमिनीला ओलिताखालची जमीन म्हणून ओळखतात. शासनाच्या कोणत्याही उपसिंचन पद्धतीने पाणी मिळणाऱ्या जमिनीचा यात समावेश नसतो.
हंगामी ओलिताची जमीन: नदीच्या पात्रात असलेली अथवा नदीच्या पाण्यामुळे हंगामात जलसिंचित होणारी जमीन.
पट्टेदार: काही विशिष्ट मुदतीसाठी एखाद्या व्यक्तीने मूळ मालकापासून (खासगी किंवा सरकारी) शेतजमीन भाडेतत्त्वावर कसण्यासाठी घेतली असेल अशी व्यक्ती. मुदतीनंतर पट्टेदारांचे अधिकार आपोआपच रद्द होतात.
गावठाण: राज्य सरकारने एखाद्या गावच्या वस्तीसाठी गावाजवळील ठरवून दिलेले काही क्षेत्र. हे ठरावीक क्षेत्र त्या गावाच्या लोकसंख्येपुरतेच मर्यादित असते. गावठाण वाढवण्याचा अधिकार सरकारला असतो. गावठाण्यातील जमिनी करमुक्त असतात.
पोटखराबा : शेतजमीन कसण्यास अथवा लावणीस अयोग्य असणारे क्षेत्र. सव्र्हे नंबरच्या अथवा भूमापन क्रमांकाच्या एकूण क्षेत्रातील नापीक व पड क्षेत्र म्हणजे पोटखराबा क्षेत्र.
कोरडवाहू : निव्वळ पावसावर अवलंबून असणारे क्षेत्र.
रयतावा आणि रयतवारी : रयतावा म्हणजे शेतसारा किंवा शेतजमिनीवर लावलेला महसुली कर. शासनाने शेतसाऱ्यासंबंधी प्रत्येक कुळाशी स्वतंत्र ठराव करण्याची पद्धती म्हणजे रयतवारी.
शेतगणा : शेतजमिनींचा समूह किंवा गट.
शेतवारी : तलाठी किंवा कुलकर्णी यांनी गावहद्दीतील शेतजमिनींची केलेली अनुक्रमानुसार नोंदणी किंवा पत्रक. भूमापन क्रमांकाशी याचा संबंध नसतो.
शेतसनदी : काही एका ठरावीक कामाबद्दल अथवा लष्करातील सेवेबद्दल शासनाकडून शेतीची सनद प्रदान केली जाते. अशी सनद धारण करणारयास शेतसनदी म्हणतात.
सातबारा उतारा : महसूल विभागाने गावस्तरावर शेतजमिनींच्या वेगवेगळ्या नोंदी ठेवण्यासाठी आखून दिलेल्या नमुन्यातील हा एक नमुना आहे. सातबाराचा उतारा म्हणजे हक्कपत्रांच्या विहित नमुन्याचा उतारा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा