दुधाचा वापर वाढवण्यासाठी परिणामकारक नियोजन आजही आपल्याकडे दिसून येत नाही. देशाच्या कृषी क्षेत्रातील एकूण उत्पादनाच्या २५ ते २६ टक्के वाटा असलेल्या या क्षेत्राला कृषी क्षेत्राच्या एकूण निधीपकी फक्त ११ वा १२ टक्केच वाटा मिळतो. देशातील ६५ टक्के शेतकरी केवळ या व्यवसायावरच अवलंबून असूनही फक्त पाच टक्के शेतकरी कुटुंबांपर्यंत या व्यवसायाच्या नवनवीन योजनांची माहिती पोहोचते. या क्षेत्रात तंत्रज्ञान-प्रसाराचा वेग कमी आहे. आजही या व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यंत कमी प्रमाणात केला जातो.
या व्यवसायातील चांगले उत्पादन देणारे १८ ते १९ टक्के पशुधन विविध रोगांना बळी पडत असताना या पशुधनाला विम्याचे संरक्षण फारच कमी आहे. दुग्ध व्यावसायिकांना सेवा-सुविधा देण्यासाठी २,५९,००० कर्मचारी/ गोधन सेवकांची गरज असताना अवघे ५२,००० कर्मचारी सेवा देतात. शेतीसाठी १८ टक्के पीक कर्ज देणे विविध बँकांना बंधनकारक असताना फक्त चार-पाच टक्केच कर्जपुरवठा दुग्ध व्यवसायाला करण्यात येतो. पीक कर्ज घेतल्यानंतर त्यावर व्याजदरात सवलत किंवा बिनव्याजी सवलत किंवा बिनव्याजी कर्ज असते. परंतु दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना व्याजदरात सवलत मिळत नाही.
पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढावे यासाठी उत्तम दर्जाच्या संकरित जातींची निर्मिती होत असते. परंतु दुग्ध व्यवसायासाठी पशूंच्या जाती, वीर्यपुरवठा आणि गुणनियंत्रण यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. या व्यवसायासाठी सुयोग्य नियोजन आणि अंमलबजावणी यांचा अभाव असल्यामुळे जगाच्या उत्पादनाच्या तुलनेत फार कमी उत्पादन आपल्याकडे होते. उत्तम दर्जाचे खाद्य, चारा पिकांचा प्रसार, ब्रीडिंग- फीडिंग धोरणाचा प्रत्यक्ष अवलंब, रोग व आजारांचे व्यवस्थापन आणि त्यांचे नियंत्रण यांवर योग्य कार्यवाही झाली, तरच हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आधारस्तंभ ठरेल. कमी होत असलेली जमीनधारणा, पाण्याची टंचाई, हवामानात होत असलेले बदल या सर्व बाबींचा विचार केला तर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी विशेषत: जिरायत भागातील शेतकरी तसेच तरुण बेरोजगार युवकांसाठी प्रगतीकडे घेऊन जाणारा राजमार्ग होऊ शकेल.
वॉर अँड पीस: गुप्तरोग (स्त्रियांचे आजार)
मी गेली काही वर्षे पुणे मनपाच्या डॉ. कोटणीस दवाखान्यात एचआयव्हीग्रस्त स्त्री-पुरुषांना नि:शुल्क आयुर्वेदीय औषधे देतो. एक दिवस एक अत्यंत कृश, दिवसरात्र ताप असणारी दुर्दैवी महिला गुप्तांगची त्वचा खूप जाड पूग्रस्त अशी आली. रुग्ण कृश असल्याने आहाराची चौकशी केली. ‘जेवणाचे काय बोलताय, धंदा बंद, पैसा नाही, खाणार काय?’ तिने माझेच बौद्धिक घेतले. त्या दवाखान्यात मी फक्त विविध प्रकारच्या गोळय़ा आस्कंद, उपळसरी असे टॉनिक देत असे. ही विशेष रुग्ण म्हणून तिला आमच्या मअपपं रुग्णालयात बोलावून त्रिफळाचूर्णाच्या काढय़ाने योनीधावन करून एलादितेलाचा पिचू नित्य सकाळ-संध्याकाळ ठेवावयास सांगितला. मूत्रवहस्रोताची सूज व कंड कमी करण्याकरिता गोक्षुरादि व चंदनादि प्र. ६, रसायनचूर्ण एक चमचा, उपळसरीचूर्ण अर्धा चमचा असे दोन वेळा दिले. टॉनिक म्हणून शतावरीकल्प व च्यवनप्राश दिला. पंधरा दिवसांत रुग्ण खूपच सुधारली. गाडीखान्यात येऊन तिने सगळय़ा स्टाफ समक्ष धन्यवाद दिले.
एक दुर्दैवी स्त्री विविध पुरुषांच्या संसर्गाने व एकाएकी गर्भ राहिल्यामुळे काय करावे या सल्लामसलतीकरिता आली होती. गर्भपाताचा सल्ला देणे सोपे होते. तिची आपल्या गर्भाचे नीट पोषण व्हावे अशी वाजवी इच्छा तिने व्यक्त केली. तिला मी महिन्याकरिता शतावरी, आस्कंद, ज्येष्ठमध रोज काढा करण्याकरिता काढापुडय़ा दिल्या. एक महिन्यात पूर्वी अत्यंत कृश, रुक्ष असलेल्या महिलेच्या चेहऱ्यावर तजेला आला. हीच औषधे दोन महिने दिली. या काळात तिला कटाक्षाने ‘धंदा बंद’ करावयास सांगितला. दलालानेही ऐकले. योग्य वेळी उत्तम प्रसूती झाली. आणखी एक रुग्ण गुप्तरोगग्रस्त, भरपूर तंबाखू व्यसन असणारी, तिच्या शरीरात पूवाळ जखमांचा वास आला. सहायक स्त्रीवैद्याने तपासले. त्रिफळाकाढय़ाचे धावन, एलादितेलाचे शोधन, पोटात घेण्याकरिता महातिक्तघृत, आरोग्यवर्धिनी, त्रिफळागुग्गुळ, प्रवाळ, कामदुधा, चंदनादि अशी महिनाभराची औषधे दिली. रुग्ण ठणठणीत बरी.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत: ९ ऑगस्ट
१९०१> अर्वाचीन मराठी नाटकाचे आद्य प्रवर्तक विष्णुदास अमृत भावे यांचे निधन. सीतास्वयंवर हे त्यांचे पहिले नाटक. त्यांनी लिहिलेल्या आख्यानांपैकी ५१ आख्यानांचा संग्रह ‘नाटय़कवितासंग्रह’ या नावाने प्रसिद्ध झाला होता.
१९२० > भावगंभीर व चिंतनशील मनोवृत्तीचे कवी कृष्ण बळवंत निकुंब यांचा जन्म. ‘उज्ज्वला’ या काव्यसंग्रहामुळे कवी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. ‘ऊर्मिला’, ‘अनुबंध’, ‘अभ्र’, पंख-पल्लवी’ आदी काव्यसंग्रह तसेच ‘सायसाखर’ हा बालगीतसंग्रह आणि ‘मृगावर्त’ हे खंडकाव्यही त्यांनी लिहिले. ‘पारख’ हा त्यांचा जुन्या-नव्या कवितांचे समीक्षण करणारा लेखसंग्रह असून १८७० ते १९२० या काळातील कवितेचा इतिहासही त्यांनी लिहिला होता.
२००२ > दलित- स्त्रीवादी चळवळीच्या आद्य नेत्या शांताबाई दाणी यांचे निधन. बाबसाहेब आंबेडकरांचा प्रभाव, रिपब्लिकन पक्षात प्रवेश आणि त्यानंतरचे कार्यकर्ती म्हणून करावे लागलेले संघर्ष चितारणारे ‘रात्रंदिन आम्हां’ हे त्यांचे आत्मकथन ग्रंथरूप झाले आहे. या आत्मकथनाचे ‘धूप और छाँव’ हे हिंदी भाषांतरही कालांतराने प्रकाशित झाले.
संजय वझरेकर
जे देखे रवी.. लेखक की लिपिक?
आपल्याकडे श्रुती नावाची एक गोष्ट आहे. खरेतर ती एक उत्स्फूर्त पण परावलंबी प्रक्रिया आहे. इथे मोठा विरोधाभास आहे. कारण उत्स्फूर्त गोष्ट परावलंबी कशी असेल? कोणीतरी कानात सांगावे आणि मग ते बाहेर पडावे असे ह्य़ा क्रियेचे स्वरूप. म्हणून श्रुती कोठल्यातरी नाव नसलेल्या किंवा दिसत नसलेल्या शक्तीमार्फत जे विचार सुचतात ते मग जेव्हा कोणीतरी म्हणून दाखवतो तेव्हा तो/ ती म्हणते मी अनामिकच राहिले पाहिजे म्हणून आपल्या अनेक अद्वितीय तत्त्वज्ञानाच्या रचनांचे किंवा श्रुतींचे लेखक अज्ञात राहिले आहेत. ह्य़ा श्रुतींची पुढची आवृत्ती किंवा उत्क्रांती म्हणजे स्मृती. उदाहरणार्थ गीता कितीही महान असली तरी ती स्मृती असते कारण ती जगाचे स्वरूप समजवून सांगताना श्रुतीचा आधार घेते आणि म्हणून दुय्यम असते. स्मृती नावाच्या इतिहासात (स्मृती म्हणजे आठवण) श्रुतींचा वापर करत समाज बांधला जातो. आणि त्या स्मृतींमधे मग कलाकृती अवतरतात चित्रकला, शब्दकला, शिल्पकला वगैरे. इथेही कलाकार जे आसमंतात बघतो, अनुभवतो ते आपल्या परीने व्यक्त करतो. एका अर्थाने त्या वैयक्तिक श्रुती असतात आणि लेखक असतो त्याचा अनुभव. इथे कलाकार किंवा शब्द लिहिणारा लिपिकाचे काम करतो. ज्ञानेश्वरांच्या एका ओवीत पाटीवर लिहिणारा लहानसा विद्यार्थी आणि लहानग्याकडून हात धरून लिहून घेणारा पंतोजी अशी एक प्रतिमा आहे. कलाकार किंवा हा लहानगा दोघेही वाहक असतात. त्याहूनही एक आणखी भारी ओवी आहे. त्यात ज्ञानेश्वर म्हणतात पाटीवरची अक्षरे पुसली तरी त्याचा अर्थ जसा अबाधित राहतो त्याप्रमाणेच ह्य़ा विश्वामागची प्रेरणा अबाधित राहते. अक्षरे उमटवणारे येतात आणि जातात. अर्थात काही लिपिक आपल्याला आकर्षित करण्यात मोठे पटाईत असतात. उदा. झालासा सूर्यास्त वाटतो। सांज अहाहा तो उघडे। तरू शिखरावर उंच घरांवर। पिवळे पिवळे ऊन पडे। ही कविता बालकवींची. त्यांचा पंतोजी निसर्ग. नेहमीच्या पांढऱ्या सूर्यप्रकाशाचे पिवळे रूप त्यांना भावते. ‘झालासा’मध्ये ते लवकरच होणाऱ्या बदलाची सूचना देतात. अहाहा शब्दात आल्हाद दाटतात. हे झाले बालकवी. अशीच एक बहिणाबाई नावाची मुलगी आपल्याला सुचलेल्या श्रुतीच्या उगमाचे श्रेय सरस्वतीला देते. माझी माय सरसोती। माले शिकवित बोली। लेक बहिणेच्या मनी। किती गुपिते पेरली/ बहुतेक सगळ्या विलक्षण माणसांना त्यांच्या मधल्या लक्षणांचे श्रेय देण्याची भावना किंवा बुद्धी होते कारण ती विलक्षण प्रज्ञा चैतन्याशी एकरूप झालेली असते. नवव्या अध्यायाच्या मंगलचरणात ज्ञानेश्वर निवृत्तिनाथांना म्हणतात अहो सरस्वतीच्या मुलाला बाराखडी थोडीच लागणार? त्याच प्रस्तावानेत असेही म्हणतात की बाहुल्याने सूत्रधाराला काय शिकवावे? असो. पुढच्या लेखात सरस्वतीबद्दल चर्चा करू.
रविन मायदेव थत्ते