अमोनियम नायट्रेट हे एक उत्तम नायट्रोजनयुक्त खत आहे, कारण त्यामध्ये ३४% नायट्रोजन आहे. साहजिकच पिके जोमाने यावीत म्हणून शेतकरीबंधू सफेद रंगाच्या स्फटिकयुक्त  अमोनियम नायट्रेटचा खत म्हणून अगदी आवर्जून उपयोग करतात, कारण युरियापेक्षा ते जास्त स्थिर असे रसायन आहे.
दक्षिण अमेरिकेतील चिली देशामध्ये अ‍ॅटाकामा नावाचे वाळवंट आहे. या ठिकाणी सुमारे ७२० चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे क्षार सापडतात. हे खनिज ‘चिली सॉल्ट पिटर’ नावाने ओळखले जाते. मुख्य म्हणजे या भागातील वरच्याच थरामध्ये अमोनियम नायट्रेटबरोबर सोडियम/ पोटॅशियम नायट्रेटदेखील मिळते. एके काळी साऱ्या जगाची गरज भागवण्यासाठी ही दोन्ही रसायने या भागातून निर्यात होत असत. हे दोन्ही क्षार स्फोटकांमध्ये मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. अमोनियम नायट्रेट जर काही कारणामुळे तप्त झाले तर त्याचा स्फोट होतो. त्यातून नायट्रस ऑक्साइड आणि पाण्याची वाफ बाहेर पडते. परिणामी स्फोटकांच्या निर्मितीसाठी दुसऱ्या महायुद्धात या रसायनाची मागणी प्रचंड वाढली. साहजिकच कृत्रिम रीतीने त्याची निर्मिती करण्याची पद्धत जर्मनीमध्ये रसायनशास्त्रज्ञांनी शोधून काढली.
आता कृत्रिम पद्धतीने तयार केलेले अमोनियम आणि सोडियम नायट्रेट वापरण्याचा प्रघात आहे. याचे उत्पादन करताना नायट्रिक आम्ल आणि अमोनियाचा संयोग घडवून आणतात. ‘एएनएफओ’ नामक एका स्फोटकात ९४% अमोनियम नायट्रेट आणि ६% फ्युएल ऑइल असते. हे औद्योगिक क्षेत्रात वापरतात. ते कोळशाच्या खाणीत वापरले जाते. शिवाय एखाद्या खाणीतून ‘टायटॅनियम’ या मूलद्रव्याचे उत्पादन करताना होतो. नायट्रोग्लिसरिन या महत्त्वपूर्ण स्फोटकासाठी एक विस्फोटक म्हणून याचा उपयोग होतो. रॉकेटमध्ये प्रोपेलंट म्हणूनही याचा उपयोग होतो. ‘कॉम्पोझिट सॉलिड रॉकेट प्रॉपेलंट’मध्ये अमोनियम परक्लोरेटबरोबर अमोनियम नायट्रेट वापरतात. अनेक प्रकारच्या शोभेच्या दारूमध्येही अमोनियम नायट्रेटचा समावेश असतो. नायट्रस ऑक्साइड म्हणजे ‘लािफग गॅस’, म्हणजे ‘हास्यवायू’. शस्त्रक्रियेच्या वेळी याचा वेदनाशामक म्हणून उपयोग केला जायचा. अमोनियम नायट्रेट तापवल्यावर जे पदार्थ बाहेर पडतात,  त्यात एक ‘हास्यवायू’ असतो.
डॉ. अनिल लचके, (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org  

प्रबोधन पर्व: राष्ट्रवादी, सशस्त्र क्रांतीचे पुरस्कत्रे आणि बुद्धिवादी सावरकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रांतिकारक देशभक्त, ओजस्वी लेखक आणि राष्ट्रवादी सुधारक होते. त्यांनी आत्मचरित्र, नाटक, काव्य, चरित्र आणि संकीर्ण असे विपुल लेखन केले आहे. अंदमानातील १४ वर्षांचा रोमांचकारी अनुभव त्यांनी ‘माझी जन्मठेप’मध्ये लिहिला आहे. त्यांच्या ‘मॅझिनी चरित्र’ या पुस्तकावर इंग्रज सरकारने बंदी घातली होती. किंबहुना तत्कालीन मराठी लेखकांमध्ये सावरकरांच्या सर्वाधिक पुस्तकांवर बंदी घातली गेली असे म्हणावे लागते. सावरकरांचे इतिहासप्रेम जाज्वल्य म्हणावे इतके प्रखर होते. य. दि. फडके म्हणतात, ‘‘सावरकरांचे राजकारणही त्यांच्या इतिहासलेखनाप्रमाणे मूलत: आणि मुख्यत: ‘रोमँटिक’च होते. जन्मभर सावरकरांनी राष्ट्रवादाचा पोटतिडिकीने पुरस्कार केला. राष्ट्रवादाचा स्वीकार रोमँटिक प्रवृत्तीची माणसे विनासायास करू शकतात.’’ मात्र असे असेल तरी सावरकरांनी धर्मभोळेपणा, जातिभेद, अनिष्ट चालिरीति, गाईचे माहात्म्य अशा अनेक गोष्टींवर प्रखर टीका करत विज्ञाननिष्ठ व बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी यांचा सावरकरांनी तीव्र शब्दांत निषेध केला. िहदू धर्मातील त्याज्य गोष्टींचा धिक्कार केल्याने सावरकर सनातनी लोकांचे नावडते तर पुरोगामी लोकांचे आवडते होतात. िहदू राष्ट्रवाद हा सावरकरांचा धर्म होता. त्याचेही ते तितकेच कडवे पुरस्कत्रे होते. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कत्रे आणि त्यावर अविचल निष्ठा याबाबतीत सावरकर त्यांच्या समकालीनांमध्ये खूपच उजवे होते. गुप्त आणि क्रांतिकारक संघटनांचे नेतृत्वही त्यांनी केले. जातिभेदाचे मूळ आणि तिचे उच्चाटन, भाषाशुद्धी आणि तिजवरील परकीय आक्रमण याविषयीच्या आपल्या लेखनातून सावरकरांचा विवेकवाद आणि तर्कशुद्ध बुद्धिवाद प्रतीत होतो. भावनांची उत्कटता, विचारांची प्रक्षोभकता, कृतीची तळमळ आणि जहाल राष्ट्रवादी बाणा यांचे सावरकर मूíतमंत उदाहरण होते.

मनमोराचा पिसारा:  मज ठाऊकीच नाही!
ऋतूंमधले बदल जाणून घ्यायचा शहरी मार्ग म्हणजे रेडिओवरची गाणी. विशेषत: एफएम रेडिओवरील जॉकी या गाण्यांवर रंगतदार कॉमेंट करून मजा आणतात. परंतु त्या गाण्यांपैकी फारसं न वाजवलेलं एक गाणं. ‘आला वसंत देही मज ठाऊकीच नाही!’ जुन्या ‘प्रपंच’ चित्रपटातलं गदिमा, सुधीर फडके आणि आशाताईंच्या रम्य त्रिकुटाने सजवलेलं गाणं.
गाण्यामधला निखळ आनंद आणि आशाताईंचा सहजसुंदर आवाज मनाचे दरवाजे उघडून देतो नि वसंताचा बहार अवघ्या जिवाला मोहरून टाकतो. मित्रा, पन्नासएक वर्षांपूर्वीच्या गाण्यातला निष्पाप आणि निरागसपणा मनाला मोहित करतो.
गाण्यातील नायिकेचं म्हणणं असंय की, माझा देह फुलून निघालाय, पण अंगावर उठणारे हे रोमांच कशामुळे उमलतायेत हे मला उमगत नाहीये! खुदकन येणारं हसू ओठातच का थांबतंय? आणि मनातले बोल बाहेर डोकावायला का लाजताहेत?
तरुणाईचा वसंत आपल्या शरीरात हळूहळू फुलतो आणि अचानक एक दिवस त्याची चाहूल लागते. ‘आपण वयात आलोय. आपला देह पूर्वीसारखा एकटा नाही राहिला, त्याला दुसऱ्या माणसाची ओढ वाटत्येय, त्याचं तारुण्य खुणावतंय. या जाणिवा उमगतात आणि जीवनातलं रहस्य जाणून घ्यावंसं वाटतं.’ ही भावना गदिमांनी सुरेख शब्दबद्ध केलीय.
पण मित्रा, मानसशास्त्राचा चष्मा घातला की मनोकायेचा हा खेळ अधिक गहिरा होतो. गंमत म्हणजे गदिमांनी ज्या काळी हे गाणं लिहिलं, त्याच सुमाराला गाण्यातल्या बोलांप्रमाणे श्ॉक्टर आणि सिंगर यांनी भावनांच्या उगमाविषयी टू फॅक्टर (दोन घटक : शरीर संवेदना आणि त्याचं बुद्धीनं केलेलं नामकरण) सिद्धान्त मांडला.
 त्यांनी थोडक्यात असं म्हटलं की, बाह्य़ घटनेमुळे आपल्या शरीरात संवेदना निर्माण होतात. शरीरात काहीतरी घडतंय याची मेंदू (बुद्धी) नोंद घेतो. त्या संवेदनांना, पूर्वानुभवांना ताडून पाहतो आणि ती भावना ओळखतो. म्हणजे अंगाला घाम फुटतोय, हृदयाचे ठोके वाढलेत, म्हणजे मी घाबरलेलो आहे तर! श्ॉक्टर-सिंगर जोडीने स्वयंसेवकांवर प्रयोग करून तो सिद्धान्त सिद्ध केला. म्हणजे ‘एविनेफ्रिन’ नावाच्या संप्रेरकाचे इंजेक्शन टोचलेल्या दोन गटांना वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात ठेवलं. या संप्रेरकामुळे नाडीचे ठोके वाढले ते दोन्ही गटांतील लोकांचे. एका गटाला आनंदी, हसऱ्या वातावरणात सोडलं; तर दुसऱ्याला चिंतातुर लोकांबरोबर सोडलं. हसऱ्या ग्रुपच्या नाडीचे ठोके वाढले, कारण आनंद झालाय, असं म्हटलं तर दुसऱ्या गटाला चिंतेने धडधड वाढलीय असा निर्वाळा दिला. पुढे हा सिद्धान्त फार मूळ धरू शकला नाही, पण इट मेड अ पॉइंट! गाण्यातल्या नायिकेला ‘हे आज काय झाले? माझे मला कळे ना!’ असं वाटलं ते बरोबर आहे. बाई गं, या संवेदनांच्या लहरी म्हणजे तू तरुण झालीस गं आता! असं सांगायला हवं. कोणी सांगायचं? कदाचित त्या गाण्यातला कोकिळेचा पोर रानातल्या गीतातूनच सुचवेल.
 वसंत ऋतूचं स्वागत पक्षी हिंदी गाण्यातून कसं करतात, त्याच्या गजाली इथेच.. या कट्टय़ावर, मोर नाचतो तेव्हा.. करू.
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

Story img Loader