अमोनियम नायट्रेट हे एक उत्तम नायट्रोजनयुक्त खत आहे, कारण त्यामध्ये ३४% नायट्रोजन आहे. साहजिकच पिके जोमाने यावीत म्हणून शेतकरीबंधू सफेद रंगाच्या स्फटिकयुक्त अमोनियम नायट्रेटचा खत म्हणून अगदी आवर्जून उपयोग करतात, कारण युरियापेक्षा ते जास्त स्थिर असे रसायन आहे.
दक्षिण अमेरिकेतील चिली देशामध्ये अॅटाकामा नावाचे वाळवंट आहे. या ठिकाणी सुमारे ७२० चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे क्षार सापडतात. हे खनिज ‘चिली सॉल्ट पिटर’ नावाने ओळखले जाते. मुख्य म्हणजे या भागातील वरच्याच थरामध्ये अमोनियम नायट्रेटबरोबर सोडियम/ पोटॅशियम नायट्रेटदेखील मिळते. एके काळी साऱ्या जगाची गरज भागवण्यासाठी ही दोन्ही रसायने या भागातून निर्यात होत असत. हे दोन्ही क्षार स्फोटकांमध्ये मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. अमोनियम नायट्रेट जर काही कारणामुळे तप्त झाले तर त्याचा स्फोट होतो. त्यातून नायट्रस ऑक्साइड आणि पाण्याची वाफ बाहेर पडते. परिणामी स्फोटकांच्या निर्मितीसाठी दुसऱ्या महायुद्धात या रसायनाची मागणी प्रचंड वाढली. साहजिकच कृत्रिम रीतीने त्याची निर्मिती करण्याची पद्धत जर्मनीमध्ये रसायनशास्त्रज्ञांनी शोधून काढली.
आता कृत्रिम पद्धतीने तयार केलेले अमोनियम आणि सोडियम नायट्रेट वापरण्याचा प्रघात आहे. याचे उत्पादन करताना नायट्रिक आम्ल आणि अमोनियाचा संयोग घडवून आणतात. ‘एएनएफओ’ नामक एका स्फोटकात ९४% अमोनियम नायट्रेट आणि ६% फ्युएल ऑइल असते. हे औद्योगिक क्षेत्रात वापरतात. ते कोळशाच्या खाणीत वापरले जाते. शिवाय एखाद्या खाणीतून ‘टायटॅनियम’ या मूलद्रव्याचे उत्पादन करताना होतो. नायट्रोग्लिसरिन या महत्त्वपूर्ण स्फोटकासाठी एक विस्फोटक म्हणून याचा उपयोग होतो. रॉकेटमध्ये प्रोपेलंट म्हणूनही याचा उपयोग होतो. ‘कॉम्पोझिट सॉलिड रॉकेट प्रॉपेलंट’मध्ये अमोनियम परक्लोरेटबरोबर अमोनियम नायट्रेट वापरतात. अनेक प्रकारच्या शोभेच्या दारूमध्येही अमोनियम नायट्रेटचा समावेश असतो. नायट्रस ऑक्साइड म्हणजे ‘लािफग गॅस’, म्हणजे ‘हास्यवायू’. शस्त्रक्रियेच्या वेळी याचा वेदनाशामक म्हणून उपयोग केला जायचा. अमोनियम नायट्रेट तापवल्यावर जे पदार्थ बाहेर पडतात, त्यात एक ‘हास्यवायू’ असतो.
डॉ. अनिल लचके, (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा