जगभरातील बहुतांश लोकांच्या खाण्यातला एक प्रमुख आणि अविभाज्य भाग म्हणजे ‘मासे’. मासे खवय्ये अनेक प्रकारचे मासे, त्यांच्या विविध पाककृती करून आवडीने खातात. शाकाहारी लोकांना मासे न आवडण्याची कारणं अनेक असली तरी यातलं प्रमुख कारण म्हणजे माशांना येणारा वास. त्यात ती मासळी सुकी असेल तर मग पाहायलाच नको. मासळी बाजारात तर नाकाला रुमाल लावूनच चालावं लागतं. खरं तर अस्सल खवय्यांनाही मासळीचा वास आवडतो असं नाही. मासळीला वास येतो, तो कशामुळं?
मासळी नीट शिजवली, त्यात योग्य ते मसाले घातले, तर मग मासळीला ‘वईस’ दर्प येत नाही. किंबहुना शिजवताना दरवळणाऱ्या वासानेच मासे खाणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. मेलेल्या पण ताज्या फडफडीत माशाला तसा घाण वास येत नाही. मासा मेला की कुजण्याची क्रिया सुरू होते. जसजसा वेळ जातो, तसतसा अधिक वास सुटायला सुरुवात होते. या प्रक्रियेत महत्त्वाचे असतात ते जिवाणू. माशांमध्ये विशेषत: मांसल भागात ट्रायमिथाइलअमाइन ऑक्साइड (ळअटड) असतं. जिवाणूंमुळे त्याचं विघटन व्हायला लागतं. त्यातून ट्रायमिथाइलअमाइन आणि डायमिथाइलअमाइन ही दोन अमाइन्स तयार होतात. ही दोन अमाइन्स एकत्र आली की माशांचा तो टिपिकल वास यायला लागतो. जसजसा वेळ जातो, त्या प्रमाणात अमाइन्सदेखील तयार व्हायला लागतात; म्हणून वासाची तीव्रताही वाढायला लागते.
माशामध्ये ट्रायमिथाइलअमाइन किती तयार झालं आहे, यावरून तो मासा किती ताजा आहे, हे शोधता येतं. माशाला शीतपेटीत ठेवलं तर जिवाणूंची वाढ कमी होते. परिणामी ट्रायमिथाइलअमाइन ऑक्साइडचं विघटन होण्याची क्रिया मंदावते; म्हणजेच मासळी कुजण्याची क्रिया मंदावते.
अमाइन्स हे अल्कली गुणधर्माचे आहेत. त्यांचा प्रभाव नाहीसा करायचा असेल तर त्यात आम्ल घालतात. आपल्याकडं फार पूर्वीपासून हेच केलं जातंय. मासे शिजवताना किंवा शिजवण्यापूर्वी िलबाचा रस, चिंचेचा कोळ किंवा कोकमाचं आगळ घातलं जातं. पाश्चात्त्य देशांत माशांना बरेचदा व्हिनेगर चोळलं जातं. या आम्लपदार्थाशी माशातील अमाइन्सची अभिक्रिया होते, म्हणजेच उदासीनीकरण होतं आणि माशाला तो ‘वईस’ वास येत नाही.
मनमोराचा पिसारा: ‘सौभद्रा’तला श्रीकृष्ण..
श्रीकृष्ण म्हणजे भारतीय समाजमनाला भुरळ पाडणारं, मंत्रमुग्ध करणारं, भक्तिरसात न्हाऊ घालणारं विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. अनेक रूपांत श्रीकृष्ण आपल्याला भेटतो. (इतका जवळचा की कृष्णाला ‘अहो, जाहो’ असे उद्गार येतच नाहीत!) या अशा श्रीकृष्णाच्या कुटुंबातील समस्येवर अण्णासाहेब किलरेस्करांनी शतकापूर्वी ‘सौभद्र’ हे नाटक रचलं आणि त्या नाटकाची जादूदेखील आजही मराठी रसिकमनाला मोहित करते. राजकारणी कृष्ण, राजा श्रीकृष्ण, सन्मित्र श्रीकृष्ण अशा विविध रूपांच्या पलीकडला हा ‘देवकीनंदन’ भाऊ म्हणून, पती म्हणून कसा प्रेमळ असतो, याचं अतिशय रम्य दर्शन ‘सं. सौभद्र’मधून होतं. साठ-पासष्ट गाणी, अनेक लहान-लहान प्रसंग, विविध ठिकाणं यांनी हे नाटक सजलंय. नाटकातलं कथानक कसं खुलवावं, परिचित कथेतलं रहस्य कसं जपावं, याचं ‘सौभद्र’ हे उत्तम उदाहरण आहे. खेरीज संवादामध्ये खुसखुशीतपणा तर आहेच, नाटय़गीतातून गोष्ट पुढे जाते. कधी सुभद्रेचा रोष, तर कधी कृष्णाचं प्रणयाराधन, तर कधी भजन! कथा सांगायलाच हवी का? म्हणजे अर्जुनानं सुभद्रेचं ‘हरण’ केलं आणि त्यासाठी रचलेलं अर्जुनाच्या त्रिदंडी संन्यासाचं नाटक, बलरामदादाचा ‘राग’ आणि रुक्मिणीचा रुसवा घालवणं या सगळ्या कृष्ण क्ऌप्त्यांमधून ‘सौभद्र’ घडतं.
यातला श्रीकृष्ण अर्थातच मुख्य सूत्रधार. अर्जुन सुभद्रेची, कळलाव्या नारदनामक निवेदकाची ही गोष्ट; परंतु कर्ता करविता असतो श्रीकृष्ण आणि राहतो नामानिराळा.
बलरामाच्या तापट स्वभावाचं व्यवस्थापन कृष्ण चलाखीने करतो. रुक्मिणीची गोड समजूत काढताना, ‘नारी मज बहु असती, प्रीती परि तुजवरती’ असं म्हणून प्रणयासक्त करतो. सुभद्रेवरच्या प्रेमानं व्याकूळ झालेल्या अर्जुनाला होकारात्मक विचार देतो. आपलं उद्दिष्ट साध्य करताना त्यासाठी हिकमती कराव्या लागतात. समोरच्या व्यक्तीला आपलंसं करावं लागतं आणि योग्य संधीचा सत्वर उपयोग करावा लागतो. हे धडे कृष्ण शिकवितो, तेही हसत हसत आणि तुमच्या मनाची ग्लान कळी खुलवत. एखादी असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी चतुराईनं वेळेचं आणि माणसाचं व्यवस्थापन करावं लागतं हा शहाणपणादेखील कृष्ण शिकवितो. नाटकातली श्रीकृष्णाची भूमिका पाहताना असं वाटतं की, हा श्रीकृष्ण वनमाळी माझ्या जीवनात यायला हवा. निरतिशय प्रेम करावं, त्याच्यावर भक्ती करावी, त्याच्यावर आसक्त व्हावं असा कृष्ण मला हवाय. त्याच्या लोभस, कुटुंबवत्सल, चतुराईचा मला स्पर्श व्हावा याची आपोआप ओढ लागते.
श्रीकृष्णाच्या या अगाध लीला आहेत. कृष्णाच्या देवरूपापेक्षा हे कधी खटय़ाळ, खोडय़ाळ, तर कधी धीरोदात्त मानवरूप मनाला भावतं. तो कृष्ण माझा व्हावा, अशी जिवाला ओढ लागते.
हे सगळं अण्णासाहेबांनी इतकं आकर्षक लिहिलंय की, शंभर वर्षांपूर्वीचं असूनही ताजं वाटतं. त्यातली भाषा, नर्मविनोद आणि मिस्कील संवाद अतिशय आनंद देतात.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व: समाजस्वास्थ्य आणि समाजधर्म
‘‘सत्य, प्रीती, वात्सल्य, कुटुंबभाव, ज्ञानाची तळमळ या गोष्टी इतक्या मूलभूत आहेत की, जडवादाला त्यांचे उन्मूलन करिता येणे अशक्य आहे. उलट शारीरिक सुखाची थोडीफार प्राप्ती झाल्याशिवाय सामान्य माणसाला उच्च सुखाची कल्पनाच करवत नसल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या अधिकाराप्रमाणे आपली नीती ठरविण्याचे स्वातंत्र्य मिळावयास हवे. असे प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळावयाचे म्हणजे समाजातील आजची आर्थिक, सामाजिक, राजकीय, सर्व क्षेत्रातील विषमता पूर्णतेने नष्ट झाली पाहिजे. आजच्या समाजात जे वर्ग वा ज्या व्यक्ती श्रेष्ठता पावल्या आहेत त्यांनी काळाचा प्रवाह आणि न्यायाचे महत्त्व ओळखून आपला अहंकार सोडून दिला पाहिजे. असे न करता केवळ सत्तेच्या जोरावर समतेची चळवळ दडपण्याचा प्रयत्न चालेल तर समाजात भयंकर उत्पात माजल्याशिवाय राहणार नाहीत. मानवी जीवनात सुखाची इच्छा इतकी तीव्र असते की, संधी सापडताच तिच्या पूर्ततेसाठी प्रचंड खळबळ सुरू होते. या इच्छेला विवेकाने वाट काढून देणे हाच समाज-स्वास्थ्याच्या दृष्टीने इष्ट आणि न्याय्य मार्ग आहे.’’
निकोप समाजस्वास्थ्याचे रहस्य सांगत स. ज. भागवत उन्नतीचा मार्ग सांगतात – ‘‘व्यक्तीच्या आयुष्यात जशी उन्नती होत जाईल त्या मानाने त्याची बाह्य़ राहाणी साधेपणाची होत जाते. हृदय पवित्र व प्रेमळ होत जाते. बुद्धी विकाररहित आणि शुद्ध ज्ञानानुसारिणी बनते आणि आत्म्याच्या उच्च प्रेरणा मानण्यात सर्व इंद्रियांना समाधान मिळते. सुखामध्ये मानसिक तृप्ती आणि आत्मिक शांती यांचा पूर्ण समावेश होतो. ही अवस्था समाजातील प्रत्येक व्यक्तीला मिळेल, अशा प्रकारे समाजातील अर्थ, काम या पुरुषार्थाची व्यवस्था करून देणारा व समाजातील सुखभावनांचा विरोध न करता सर्वानाच आत्मिक समाधानाच्या उच्च भूमीवर नेणारा समाजधर्म बनविण्याचा आज काळ आला आहे.. अहिंसेच्या वृत्तीने, विज्ञानाच्या सहाय्याने समतेची आकांक्षा पूर्ण करून समाजाला आध्यात्मिक अनुभवाकडे जाण्याची पात्रता आणून देणे हे उद्याच्या संस्कृतीत शक्य होईल.