जगातील अनेक देशांत लोकरीचे उत्पादन होत असले तरी मेंढय़ांची एकूण संख्या, तंतूंचे प्रति मेंढी उत्पादन, तंतूंची गुणवत्ता या परिमाणांच्या संदर्भात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे देश इतर देशांच्या मानाने अतिशय प्रगत आहेत. तिथे मेंढय़ा चरण्यासाठी कुरणेपण मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे तेथील मेंढय़ांना पोषक आहार उपलब्ध होतो. लोकर उत्पादनाच्या संदर्भात भारत फारच अप्रगत अवस्थेत आहे. त्यातल्या त्यात राजस्थान, जम्मू/काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा हे प्रांत इतर प्रांतांपेक्षा पुढे आहेत. या कारणास्तव लोकर व्यवसाय अमृतसर, पानिपत, लुधियाना या उत्तरेकडील शहरात केंद्रित झाला आहे. महाराष्ट्र याबाबतीत मागे असण्याचे कारण मेंढय़ांना अन्न-पाण्याच्या शोधात सतत राज्यभर फिरत राहावे लागते. मेंढय़ांना चरण्यासाठी आवश्यक अशा कुरणांची इथे फारच कमतरता आहे. त्यामुळे दर्जेदार तंतूंसाठी लागणारे पोषक शरीर नसल्याने दर्जेदार तंतूंची वाढ होऊ शकत नाही. हे खरे असले तरी तंतूंची आयात करून त्यापासून धागे बनवून आपण वस्त्रनिर्मिती करतो. अत्यंत उत्तम दर्जाचे वस्त्र निर्मिण्यात व त्याची निर्यात करण्यात भारत अग्रेसर आहे. म्हणजे मेंढय़ांचे पालनपोषण करण्यात जर भारताने भरारी घेतली तर परकीय चलनात फार मोठी बचत तर होईलच, तसेच वस्त्रनिर्मितीचा विस्तार वाढवण्यास मदतदेखील होईल. सध्या लोकरीचा तंतू, धागा यांची आयात २१४३ कोटी रुपये इतकी आहे, तर लोकरीची तयार वस्त्रे, काप्रेट, स्वेटर यांची निर्यात ७६१७ कोटी रुपये इतकी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा