हर्षां गणेशपुरे या अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा गावच्या महिला शेतकरी. हर्षांताई व त्यांची फुलशेती आज अनभोरा गावाची ओळख बनलेली आहे. दहा वर्षांपूर्वी याच हर्षांताई दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायच्या. मात्र काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असलेल्या हर्षांताईंनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली फुलशेतीची सुरुवात केली आणि त्यांचं जीवनच बदलून गेलं.
राष्ट्रीय फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत योजनेतून त्यांनी झेंडू, ग्लॅडिओलस, गिलाíडया, निशिगंध, गुलाब, लीली या फुलांची लागवड केली. त्यांच्या शेतीच्या प्रयत्नांना त्यांच्या पतीने आणि सासऱ्यांनी चांगली साथ दिली. फुलशेतीचे तंत्र समजून घेण्यासाठी त्यांनी यशस्वी फुलशेती केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. वेगवेगळ्या फुलांची लागवड, व्यवस्थापन, त्यांचा बाजार या गोष्टींची माहिती करून घेतली. उत्पादनाची शेतातील सगळी कामे हर्षांताई पाहातात. तर त्यांचे पती आणि मुलगा विक्रीचे काम सांभाळतात. दहा गुंठय़ांपासून सुरू झालेली त्यांची फुलशेती आता चार एकरांवर पसरली आहे. या शेतात तयार झालेली फुलं अकोला, मूर्तिजापूर आणि अमरावतीच्या बाजारात पोहोचली आहेत.
लागवडीसाठी लागणारी रोपं, कंद यांची निर्मितीदेखील हर्षांताई स्वत: करत असल्याने त्यांना उत्पादनखर्च कमी येतो. फुलांची लागवड, खतं, किटकनाशकं, तोडणी आणि वाहतूक यांवर त्यांचा वार्षकि खर्च दीड ते दोन लाख रुपये होतो. वेगवेगळ्या फुलांच्या विक्रीतून वर्षभरात त्यांना सात ते आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
हर्षांताईंच्या या प्रयोगशीलतेमुळे त्यांना सह्य़ाद्री वाहिनीचा कृषी गौरव पुरस्कार, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार, कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांना स्वामीनाथन फाऊंडेशनची फेलोशिपदेखील मिळाली आहे.
फुलशेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच हर्षांताई शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फुलशेती करू पाहाणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना त्या मोफत सल्ला देतात. इतकंच नाही तर, इच्छुक शेतकऱ्यांना त्या कमी दराने बियाणेसुद्धा देतात.
बदलत्या काळाचं भान प्रत्येक क्षेत्रात बाळगलं तरच तुमचा टिकाव लागू शकतो, हे वास्तव हर्षांताईंनी स्वतच्या उदाहरणावरून दाखवून दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा