भारतात होणाऱ्या एकूण फळांच्या उत्पादनाच्या बारा टक्के एवढे उत्पादन महाराष्ट्रात होते. म्हणूनच महाराष्ट्राला ‘फ्रूट बास्केट ऑफ इंडिया’ म्हणतात. महाराष्ट्रात आंबा, द्राक्ष, संत्री, मोसंबी, पेरू, पपई, केळी, चिकू, डाळिंब इत्यादींबरोबरच अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे येणारी महत्त्वाची व दुर्लक्षित राहिलेली फळझाडे उदा. आवळा, चिंच, सीताफळ, अंजीर, कवठ, जांभूळ, फणस, करवंद, कोकम, बोर इत्यादी फळझाडांचेदेखील उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते.
फळे आणि भाजीपाल्यांच्या लागवडीखालील क्षेत्राच्या आणि उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. असे असले तरी त्यांच्या काढणीनंतरच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे व प्रक्रिया उद्योगाच्या अभावामुळे जवळपास ३०-४० टक्के उत्पादन वाया जाते. म्हणजेच न खाता टाकून द्यावे लागते. या नासाडीमुळे आíथक नुकसान तर होतेच, पण त्यासाठी लागलेले मानवी श्रम आणि वाया गेलेला वेळ याची मोजदाद वेगळीच! एकंदर आपल्या देशात होणारी फळे व भाजीपाल्याची नासाडी पशामध्ये मोजल्यास दर वर्षी ६०-६५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. म्हणून या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
फळे ही हंगामी स्वरूपाची असल्याने तसेच त्यामध्ये ८५ ते ९० टक्के पाणी असल्याने काढणीनंतर चुकीच्या हाताळणीमुळे जंतुसंसर्ग होऊन त्यांची मोठय़ा प्रमाणावर नासाडी होते. त्यांची साठवणक्षमता कमी असल्याने व साठवण सुविधांच्या अभावांमुळे ते दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाहीत. परिणामी, त्यांची आवक बाजारात एकाच वेळी होते व शेतकऱ्यांना त्यांचा माल कमी भावाने विकावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आíथक नुकसान होते.
साखर कारखान्यांच्या धर्तीवर स्थानिक पातळीवरच फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करून मूल्यवíधत पदार्थ तयार करण्याचे उद्योग अजूनही आपल्याकडे बाल्यावस्थेत आहेत. भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण फळे आणि भाजीपाल्यांच्या दोन टक्के उत्पादनांवर प्रक्रिया केली जाते. मात्र हेच प्रमाण मलेशियामध्ये ८३ टक्के, दक्षिण आफ्रिकेत ८० टक्के, फिलिपाइन्समध्ये ७८ टक्के, ब्राझीलमध्ये ७० टक्के, अमेरिकेत ६५ टक्के तर इस्रायलमध्ये ५० टक्के एवढे जास्त आहे.

वॉर अँड पीस: अँकिलोझिंग स्पाँडिलायटीस :  भाग-१
वातविकारांचा एक प्रकार आमवात किंवा ऱ्हुमॅटिझम, तर दुसरा ऱ्हुमॅटिक अथ्र्रायटीस-संधिवात या नावाने ओळखला जातो. या दोन्ही प्रकारच्या विकारात सूज, वेदना, जखडणे ही तीन सामान्य लक्षणे असतात. आमवातामध्ये ही लक्षणे संचारी म्हणजे शरीरातील वेगवेगळ्य्ऋा अवयवांना, वेगवेगळ्या वेळी जखडणारी असतात. हा त्रास वातग्रस्त विकारांपैकी मोठय़ा संख्येने सुरुवात करून देऊन, त्यानंतर अवघड संधिवातविकारात रूपांतरित होतो. संधिवात विकार हा प्रथम छोटे सांधे व नंतर मोठय़ा सांध्यांचा घास करतो. असा सुरू झालेला संधिवात पाठीच्या मणक्यांना केव्हा पकडतो, ते रुग्णाच्या लक्षात फार उशिरा येते. मणक्यांच्या विकारात प्रामुख्याने मणक्यांतील अंतर कमी-अधिक होणे, मणके एकावर एक चढणे व मणक्यांची झीज-डिजनरेशन अशी तीन लक्षणे असतात.
अ‍ॅकिलोझिंग स्पाँडिलायटीस ही १६ ते ४० वयात होऊ शकणारी गंभीर व्याधी, असहय़ वेदना, पाठीच्या कण्यामध्ये ताठरता आणि शरीराची हालचाल करण्यात असमर्थता, अशी गंभीर लक्षणे असलेल्या त्या व्याधीमुळे रुग्णाची पाठ आणि मान पूर्ण जखडून जाऊन त्याला हालचाल करणेही अशक्य बनते. अँकिलोझिंग स्पाँडिलायटीस म्हणजे पाठीच्या कण्याशी संबंधित डिजनरेटिव्ह अथ्र्रायटीस या प्रकारातील असून तो अतिशय वेदनादायक असतो. ही व्याधी सर्वसाधारणपणे दोन मणक्यांत किंवा पाठीचा कणा आणि ओटीपोटाच्या सांध्यांमध्ये उद्भवते. कालांतराने शरीरातील इतर संस्थांतही या व्याधीचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीला सांध्यांत सूज येऊन वेदना होतात. नंतर हळूहळू सांध्यांत ताठरता येऊ लागते.  सांध्यांमध्ये येणारी ताठरता कायमस्वरूपी असून, प्रभावित सांधे पूर्ववत होणे अशक्य असल्याचे बोलले जाते.
या व्याधीमध्ये पाठीचा कणा बांबूप्रमाणे कडक होत असल्याने, त्याला ‘बांबू स्पाईन’ असेही म्हटले जाते. ही व्याधी वयाच्या १६ ते ४० वर्षांपर्यंत कधीही जडू शकते. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये उद्भवण्याची अधिक शक्यता असते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..       बलात्कार आणि सतर्कता
सातवा अध्याय ज्ञान-विज्ञानबद्दल मशहूर आहे. विज्ञान केवळ          प्रयोगशाळेत नसते मानसोपचारतज्ज्ञ उपचार करतो तेव्हा प्रयोगशाळेतून आलेल्या औषधांचाच तो वापर करत नाही, तर गप्पाही मारतो आणि तुमचे मन तुम्हाला समजवून सांगतो.
 त्याबद्दल ज्ञानेश्वरांनी एक गोष्ट सांगितली आहे आणि एक प्रवासवर्णन केले आहे. त्या दोन्हीत आपल्या अंतर्गतच चालणाऱ्या घटनांची गोष्ट आहे.
गोष्ट अशी: जेव्हा अहंकार आणि देहाचे प्रेम जडले तेव्हा त्यांना इच्छा नावाची मुलगी झाली. जेव्हा ही वयात आली तेव्हा तिचे द्वेषाशी लग्न लावले. त्यातून मोह आणि आपपर भाव जन्मला. अहंकार त्याचा आजोबा त्याने त्याला वाढवले. मोह आणि सात्त्विकता किंवा चांगुलपणा याचे फार जुने वाकडे आहे त्यातच आशा आकांक्षा आणि मुख्य म्हणजे महत्त्वाकांक्षा याने हा मोह जेव्हा माजतो तेव्हा तो नियमांना जुमानत नाही. त्याला असंतोष नावाच्या दारूची सवय लागते आणि मग तो पाच विषयांची खोली बांधतो आणि विकारी नावाच्या स्त्रीबरोबर बिऱ्हाड थाटतो. या मोहाने संशय आणि शंका नावाचे काटे अंत:करण शुद्धीच्या वाटेवर पसरवून ठेवले आहेत. या सगळ्या अंतर्गत भानगडीमुळे माणूस भांबावतो. संसार नावाच्या अरण्यात ठेचा खात पडतो आणि मग मोठमोठय़ा दु:खाच्या दांडग्याने बडवला जातो.
आता प्रवासवर्णन बघू.
या जगाची भांबावणारी नदी ब्रह्माच्या तुटलेल्या कडेतून उगम पावते आणि त्यात पंचमहाभूतांचा बुडबुडा उत्पन्न होतो. सृष्टी वाढते तशी ही काळाबरोबर वाहते. हिला दोन काठ असतात, प्रवृत्तीचा काठ म्हणतो काहीतरी करूया. निवृत्तीचा काठ म्हणतो, जरा विचार करूया. या नदीत गुणांचा वर्षांव झाला की मोह निर्माण होतो आणि नियम वाहून जातात. हिच्यात द्वेष नावाचे भोवरे आहेत आणि मत्सर नावाची वाकडी तिकडी वळणे आहेत. शिवाय प्रपंचाचा उतार आहे. हिला कर्माचे पूर येतात, सुखा-दु:खाचे पुराड याच्यावर तरंगते. अहंकाराच्या धारा इथे वाहतात. इथे उदय अस्त होतात. जन्ममृत्यूचे खाचखळगे आहेत. शरीराचे बुडबुडे फुटत राहतात. अविवेक आणि गोंधळ नावाचे मासे सात्त्विकतेला गिळतात आणि अज्ञानाची उलटी चक्राकार आवर्तने आहेत. हा पूर थांबत नाही. एवढेच नव्हे तर जे जे उपाय आपण हा ओघ ओलांडण्यास वापरतो ते सर्व उपाय इथे निष्फळ ठरतात असे ज्ञानेश्वरांचे म्हणणे आहे.
 पण या पुराच्या पलीकडे जाण्यासाठीचा जो उपाय आहे तोही आश्चर्यकारक आहे. तो उपाय म्हणजे सतर्क राहणे. त्याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ८ नोव्हेंबर
१९०९ > स्वातंत्र्यसैनिक, वक्ते, लेखक-पत्रकार नरहर वामन तथा नरूभाऊ लिमये यांचा जन्म. ‘लाल लाल पूर्व’ , ‘मे तील सात दिवस’ ,  ‘वीस चोक ऐंशी’ हे आत्मचरित्र, नीळकंठ कल्याणींचे चरित्र आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
१९१९> महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, साहित्यिक, कलावंत, चित्रपटकार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म. ‘भय्या नागपूरकर’ हे त्यांचे पहिले व्यक्तिचित्र, तर ‘तुका म्हणे आता’ हे पहिले नाटक. तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी अशी त्यांची नाटके रंगभूमीवर ताजी राहिली. अपूर्वाई आणि पूर्वरंग यांतून पुलंनी प्रवासवर्णन म्हणजे प्रवासात भेटलेल्या, पाहिलेल्या माणसांचे वर्णन, ही धाटणी रुळविली. नवे गोकुळ, वयम् मोठम् खोटम् ही पुलंची बालनाटय़-लेखनातली कामगिरी, तर ‘वाऱ्यावरची वरात’ या सादरीकरणातून कथानाटय़ापेक्षा निराळा प्रयोग त्यांनी रंगभूमीवर केला. अनेक पुस्तके, कथाकथनाच्या सीडी, भाषणांचे संग्रह आणि छायाचरित्र यांतून पु.ल. आज उरले आहेत.
१९२९> ‘श्रीविठ्ठल दैवत: एक  चिंतन’ ‘दाक्षिणात्य साहित्यसंस्कृतीचा मराठीशी अनुबंध’ आदी पुस्तकांचे लेखक, अभ्यासक माणिक लक्ष्मण धनपतकर यांचा जन्म.
संजय वझरेकर

Story img Loader