आंबा, चिक्कू, फणस या फळांवर प्रक्रिया करून त्यापासून अनेक पदार्थ तयार केले गेले आहेत. मात्र अजूनही अनेक फळांवर प्रक्रिया करणे शक्य झालेले नाही. या अशक्य गोष्टीवर मात्र जळगाव जिल्ह्यातील शेतकरी अशोक प्रभाकर गडे यांनी मात केली आहे. जळगाव जिल्हा केळी या फळासाठी प्रसिद्ध असून ४८ हजार हेक्टरवर केळी उत्पादित केली जात आहे. जिल्ह्यात केळीचे उत्पादन प्रति हेक्टरी ६५ टन इतके आहे. या उत्पादनापकी ४० टक्के उत्पन्न केळीच्या अल्पायुषी आयुष्यामुळे वाया जाते. केळी पिकतात तेथे प्रति किलो रु. पाच इतका दर मिळत असेल,  तर मुंबईसारख्या शहरात रु. ३० प्रति डझन दराने केळी विकत घ्यावी लागतात.
केळीसारख्या फळात प्रोटीन, काबरेहायड्रेट, फॅटस् इत्यादी पोषक घटक पदार्थ असतात, ते प्रक्रियेनंतरही कायम राहावेत, अशी दक्षता घ्यावी लागते. केळय़ांचे वेफर्स सर्रास तेलात तळून काढले जातात, ते टिकाऊही असतात. परंतु पोषणाची  पथ्ये पाळून या अल्पायुषी फळावर  प्रकिया केल्याचे फारसे ऐकिवात नसले तरी आज मात्र हे अनेकांच्या प्रयत्नांतून शक्य झाले आहे. अशोक गडे यांनी केळी या फळाची समस्या जाणून घेऊन होणारे नुकसान कसे टाळता येईल, याकडे लक्ष केंद्रित केले. केळीचे आयुष्य वाढवणे, सहज वाहतूक करता येणे, नसíगक चव जपून ठेवणे, त्यातील अन्नघटक टिकवून ठेवणे ही उद्दिष्टे साध्य केली. याकरिता सुरू केलेल्या प्रकल्पातून केळीचे चॉकलेट, केळीचे पापड, केळीचे लाडू, जाम आणि केळीची बिस्किटे तयार केली जातात. भाकरीसाठी केळीचे पीठही या प्रकल्पात त्यांनी तयार केले आहे.  विशेष म्हणजे, स्वत:च्या शेतातच आठ ते दहा कामगारांना घेऊन हा प्रकल्प ते चालवत आहेत.
जे देखे रवी..      मी मराठी कोकणस्थ ब्राह्मण
नथुरामने गांधीजींवर गोळ्या झाडल्या तेव्हा आई-वडील हुंदके देऊन रडल्याचे आठवते. नऊ वर्षांचा मी तेव्हा हतबुद्ध झालो होतो. पुढे नथुरामचा भाऊ गोपाळ नाशिकच्या कारागृहात असताना सिव्हिल सर्जन या नात्याने त्याची प्रकृती माझे वडील तपासत असत तेव्हा मोठे कावरेबावरे होत. गोपाळला हे कळले असणार, पण तरीही त्याने त्याच्या पुस्तकात माझ्या वडिलांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. ते असो. मराठी कोकणस्थ ब्राह्मणांवर त्या वेळी बसलेला शिक्का अजून पुसलेला नाही. अतिरेकी मनस्वीपणा हे आमच्या जातीचे लक्षण आहे आणि ते हल्लीच्या रमाबाई रानडेंवर चाललेल्या धारावाहिकेत स्पष्ट होते. ज्या घरात केस काढल्यामुळे डोक्यावर पदर घेतलेल्या विधवा आहेत त्याच घरात रानडे आपल्या बालवधूचे आधुनिक संगोपन करीत आहेत हे दृश्य अनेक बाजूंनी अतिरेकी आहे. अर्थात माझ्या जातीला मराठी हेही विशेषण आहे आणि तेही महत्त्वाचे कारण मराठी माणूस दरिद्री असेना का तो बंडखोर आहे हे ज्ञानेश्वरांपासून आंबेडकरांपर्यंत सिद्ध झाले आहे. आंबेडकर कोकणातले त्यांनीही कोकणस्थ शब्द वापरल्याची पुसटशी आठवण आहे. जाती म्हणजे भिंती, पण या भिंतींच्या भोवताली प्रत्येक जातीच्या वैशिष्टय़ाबद्दल ज्या खुसखुशीत चर्चा होतात त्याही मोठय़ा मनोरंजक असतात. भटुरडय़ांनी मांसमच्छी खायला सुरुवात केल्यामुळे पुरवठा कमी पडला आणि भाव वाढले हे विधान मी मनोरंजकच समजतो. शेवटी रवीन थत्ते धर्माभिमानामुळे वेदांताच्या बाजूनेच लिहिणार, असे वाटणे योग्य नव्हे. कारण जे प्रस्थापित आहे त्याविरुद्ध बंड करणे हे माझे, माझ्या जातीचे आणि माझ्या मराठीपणाचे द्योतक आहे. माझे ज्ञानेश्वरीवरचे पहिले पुस्तक जाणीव ते चाचपडत लिहिले, पण खपले. त्या काळात शहाबानो या तलाक पीडित मुस्लीम महिलेचा खटला गाजला तेव्हा न्यायालयाचा निर्णय लोकसभेने काँग्रेसमुळे फिरवला. तेव्हा पडद्याआडून वार करीत ‘मी हिंदू झालो’ हे पुस्तक लिहिले. त्यावर विंदा करंदीकर रागावले. मग त्या पलीकडे जाऊन सगळी माणसे सारखीच अशा अर्थाचे ‘माणूस नावाचे जगणे’ लिहिले. त्यानंतर ज्ञानेश्वरीत भारतीय विचारांच्या परंपरेवर ज्या पहिल्या साठ-सत्तर ओव्या आहेत. त्यावर विज्ञानेश्वरी नावाचे पुस्तक लिहिले आणि हल्लीच ‘जाणीव भाग दोन’ हे पुस्तक लिहून त्याच्या प्रस्तावनेत माझ्या बंडखोरीचे स्वरूप बदलत गेले याची प्रांजळ कबुली दिली आहे. प्रपंचाने आणि विज्ञानयुक्त प्लास्टिक सर्जरीने मी वेढलेला आहे. मी पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची थोडीफार ओळख करून घेतली आहे आणि पदार्थविज्ञान हा माझ्या हौशीचा विषय आहे. या सगळ्या उपद्व्यापात मला वेदान्त कसा पटतो हे पुढच्या लेखात. अर्थात ही काही दगडावरची रेघ नव्हे. माझा दगडही एक दिवस फुटणारच आहे, तेव्हा रेषेचे काय घेऊन बसलात.
रविन मायदेव थत्ते
वॉर अँड पीस: नाडी परीक्षा – एक अभ्यास (भाग १)
नाडी परीक्षा हे प्रकरण आर्य वैद्यकात असो किंवा पाश्चात्त्य वैद्यकात असो, फारच महत्त्वाचे, अगत्याचे आहे. परंतु ते त्याच मानाने अत्यंत बिकटही आहे. याचे महत्त्व, अगत्य पाहावयास पुरावा म्हटला म्हणजे प्रत्येक वैद्य आणि प्रत्येक रोगी एकत्र झाले, की प्रथमत: नाडी परीक्षेनेच चिकित्सेला आरंभ होतो आणि याचा बिकटपणाचा पुरावा म्हटला म्हणजे नाडी पाहून रोगाचे ज्ञान होणारा वैद्य कित्येक शेकडय़ातून एखादाच असतो. नाडीशास्त्र हे थोतांड नव्हे, अशी  रोज त्याचा अभ्यास करण्याच्या माझ्या प्रयत्नावरून खात्री पटत आहे. ‘नाडी मूत्रं मलं जिव्हा शब्द स्पर्श दृकाकृती’ अशा विविध प्रकारे आयुर्वेदीय रोग परीक्षण व निरीक्षण करावयास शास्त्रकारांनी सांगून ठेवले आहे. त्या सर्वाचा  सम्यगरीतीने विचार न करता, जे नुसतेच हाताला हात लावून नाडी पाहतात, टेबल वैद्यासारखे वागतात व आम्हाला सर्व रोग कळतो असा आव आणतात ते मात्र ढोंगीपणा करतात ही माझी खात्री आहे. त्यांच्यामुळे आयुर्वेदातील या महत्त्वाच्या परीक्षण पद्धतीला कमीपणा आला आहे. माझे अल्प अनुभवावरून बऱ्याचशा दुर्धर विकारात  नाडी परीक्षणाचा उपयोग होतो हे ठामपणाने सांगता येईल. ज्वर, दौर्बल्य, रक्तदाबाचे विकार, अनिद्रा, वातविकार, श्वास या विकारांत खूप अभ्यासानंतर नाडीचे ज्ञान रुग्ण समजून घेण्याकरिता वैद्यांना जरूर होईल. त्याकरिता प्रत्येक रुग्णाची स्वस्थपणे नाडी पाहणे आवश्यक आहे. ‘अभ्यासात्प्राप्यते दृष्टि’ या वचनाप्रमाणे नित्य नाडी पाहणाऱ्यांना नाडीवर प्रभूत्व नक्कीच येईल अशी खात्री आहे. वैद्य डॉक्टर मंडळींना सकाळी रिकाम्या पोटी नाडी दाखविणे योग्य ठरेल. रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही-आम्ही चांगली झोप घेतो, सर्व गात्रांना, इंद्रियांना विश्रांती मिळालेली असते, शरीर, इंद्रिये, मन उल्हसित असते. त्यामुळे ही प्राकृत नाडी परीक्षा रोगाचा, वातपित्तकफप्रधान रोगावस्थेचा सामान्य अंदाज देते. पुरुषांची उजव्या व स्त्रियांची डाव्या हाताची नाडी बघावी असा संकेत आहे. त्याला शास्त्राधार नाही. तर्जनीच्या खालील मनगटाच्या भागावर तीन बोटे ठेवून नाडीचे ठोके अनुक्रमे वात, पित्त, कफाचे परिमाण ढोबळमानाने सांगू शकतात.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत:  ७ ऑक्टोबर
१८६६ > ‘ब्राह्मण नाही, हिंदुहि नाही, न मी एक पंथाचा’ अशा भावनेतून ‘साकल्याचा प्रदेश’ शोधायला निघालेले आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक, कवी ‘केशवसुत’ तथा कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म. करमणूक, मासिक मनोरंजन, काव्यरत्नावली आदी नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत. ‘केशवसुतांची कविता’ या संग्रहात १२१ कविता आहेत, त्यापैकी ‘नवा शिपाई’, ‘आम्ही कोण?’, ‘तुतारी’ किंवा ‘हरपले श्रेय’, ‘झपूर्झा’, ‘सतारीचे बोल’ अशा अनेक कविता आजही मराठीचा अनमोल ठेवा मानल्या जातात. पारतंत्र्य-विरोधाची, राष्ट्रोदयाची आणि आत्मतेज शोधून ते टिकवण्याची जाणीव त्यांच्या अन्य अनेक कवितांतूनही दिसते.
१९१७ > कविता, बालसाहित्य, ‘गरिबांचे राज्य’ ही पटकथा असे विविधांगी लेखन आणि अनेक पुस्तकांचे संपादन करणारे कवी विनायक महादेव कुलकर्णी यांचा जन्म.  
१९२७ > चरित्र कादंबऱ्या, स्त्रियांचे भावविश्व चितारणाऱ्या कादंबऱ्या, प्रवासवर्णन आदी २०हून अधिक पुस्तकांच्या लेखिका मृणालिनी प्रभाकर देसाई यांचा जन्म. गीतगोविंदकार जयदेव, सॉक्रेटिस, मायकलँजेलो, कान्होजी आंग्रे, अहिल्यादेवी होळकर आदींची चरित्रे त्यांनी कादंबऱ्यांत मांडली.
संजय वझरेकर

Story img Loader