मुक्त संचार पद्धत म्हणजे गोठय़ाच्या कडेला कंपाउंड करून गायींना मोकळे सोडणे. एका गायीला १०० ते १५० चौरस फूट जागा उपलब्ध करून देणे. ऊन-सावलीची, पाणी पिण्याची, चारा खाण्याची आणि तेथेच दूध काढण्याची सोय केल्यामुळे गायी त्यांच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार चारा खातात, पाणी पितात, ऊन-सावली घेतात, स्वच्छ जागेत जाऊन बसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला शेण लागत नाही. तेथेच अंग खाजवण्यासाठी सोय असल्यास अंग खाजवून घेतात. मोकळे सोडल्यामुळे गायी स्वच्छंदपणे फिरतात व जगतात. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते. फिरल्यामुळे त्यांच्या नख्या वाढत नाहीत. गोचीड होत नाही. आजाराचे प्रमाण कमी होते.
मुक्त संचार पद्धतीने गोठा बांधणे खíचक आहे, या शंकेने काही शेतकरी याकडे वळत नाहीत. वास्तविक, शेतकऱ्यांकडे उपलब्ध भांडवलामध्ये कमी खर्चापासून जास्त खर्चाच्या आधुनिक पद्धतीचा गोठा तयार करता येतो. गायी बांधण्यासाठी असलेल्या शेडला जोडून बांबू, लाकडी गोल्टे, चनिलक, सिमेंट पाइप, लोखंडी पाइप यांसारखे साहित्य वापरून मोकळे फिरण्यासाठी जागा तयार करता येईल. गाई फिरतात तेथे उभ्या उसाचे पाचट किंवा बारीक काडीकचरा टाकला तर त्याचा उपयोग गायींना बसण्यासाठी होतो.
दहा गायींना अंदाजे दोन गुंठे क्षेत्राएवढी मोकळी जागा करावी. चारा खाण्यासाठी एका बाजूला विशेषत: शेडमध्ये गव्हाण करावी. चारा वाहतूक सोपी व्हावी म्हणून गव्हाणीत चारा बाहेरून टाकता येईल अशी सोय करावी. चारा डेपो, चॉफ कटर आणि चाऱ्याची गव्हाण यातील अंतर कमी ठेवावे, त्यामुळे कष्ट वाचतील. पाण्याची सोय शेडच्या दुसऱ्या बाजूला करावी, जेणेकरून टाकी धुतल्यानंतर पाणी बाहेर काढून देणे सोपे होईल. गायींना खाजवण्यासाठी मुक्त गोठय़ाच्या मधोमध एक खांब जमिनीत गाडून त्या खांबाला जाड काथ्या गुंडाळावा. याचा वापर गायी अंग खाजवण्यासाठी करतात. गांडूळखत तयार करण्याचा प्रकल्पही सुरू करता येईल. मुक्त गोठा तयार करण्यासाठी दहा गायींना ३० ते ४० हजार रुपयांपासून दोन-तीन लाखांपर्यंत खर्च येतो.
वॉर अँड पीस व्यसने कोणी करावी? कोणी करू नये! भाग-४
जी गरीब मंडळी, त्यांचे हातावर पोट आहे असे रिक्षावाले, ट्रकवाले, पाटीवाले, फेरीवाले, हमाल, कष्टकरी, ओझीवाले, शेतमजूर, गिरणीत घाम गाळणारे, हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करणारे, टेबल पुसणारे पोरे लोक यांना, ‘तुम्ही खूप श्रम करून थोडासा पैसा मिळवता व मग व्यसनांमुळे होणाऱ्या विकारांकरिता माझेकडे येता, मोठय़ा कष्टाचे पैसे खर्च करता; हे मला पसंत नाही. तुम्ही व्यसन सोडणार नसाल तर मला तुमचे पैसे नको. मी तुम्हाला औषध देणार नाही. तुमचे पैसे तुम्ही जवळच्या मंदिराला द्या’ असा परखड दम द्यावा लागतो. बहुधा लहान माणूस, गरीब माणूस, त्याबरोबरचे नातेवाईक ऐकतात. या लहान मंडळींनी व्यसन सोडायलाच हवे. या व्यसनाधीन मंडळींचे नीतिधैर्य उंचावे म्हणून मी मुख्यमंत्र्यांसह सर्वावर तोफ डागतो. मला प्रामाणिकपणे असे वाटते की, मी एक दिवस एक तरी दारूचे दुकान, दारूचा माल जाळावा. त्या अगोदर दारूच्या मालकाला व कामगारांना बाहेर सुरक्षित काढावे. पण ही वैचारिक हिंसा झाली. मूळ मुद्दा असा आहे की, दिवसरात्र महात्मा गांधी, संत विनोबाजी, श्री गाडगेमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, श्री शिवाजीमहाराज इ. इ. नावे घेऊन राज्य करणाऱ्यांनी, दारूबंदी सप्ताह दरवर्षी साजरा करणाऱ्यांनी व्यसन मुक्तीकरिता प्रामाणिक प्रयत्न करायचे का वाइनची प्रशस्ती करायची?
तंबाखू सेवनवाल्यांना सांगावे लागते की, गुरे तंबाखू खात नाहीत, तंबाखूच्या शेताला कुंपण, राखण नसते. फक्त ‘माणूस नावाचा पशू’ तंबाखू व तज्जन्य पदार्थ खातो, वापरतो. तंबाखू खाणाऱ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम दारूपेक्षा कैकपटीने अधिक आहेत, हे साधार सांगावे लागते. कारण दारू किती ढोसता येते याला मर्यादा आहे. बिडय़ा, सिगारेट, तंबाखू यांच्या सेवनाला मर्यादा राहात नाही. ‘मद्यं न पेयं, पेयं वा, स्वल्पं सुबहुवारिवा।’ अशा शास्त्रवचनापेक्षा ‘संथमसे स्वास्थ्य’ हेच खरे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. अणूमधल्या कणांची कवायत
जनावरांना चामडे असते. झाडांच्या खोडाला साल असते. आपल्याला त्वचा असते. सजीव प्राण्यात किंवा वनस्पतीमध्ये पेशी cells असतात त्या पेशींना भिंती असतात या भिंतींना भोके पडली तर त्यातले स्राव वाहून जाते आणि त्या मरतात. कलिंगड साल काढून उघडय़ावर ठेवल्यावर होते तसे. पेशींमधल्या अणुंना मात्र कवच नसते. किंबहुना विश्वातल्या कोठल्याही अणूमध्ये भिंती नसतात. आपण भिंत बांधून घर वसवतो. त्यामुळे भिंत ही गोष्ट आपल्याला सर्व गोष्टींत अभिप्रेत असते.
मन बुद्धीच्या। त्याच्या आड ज्ञान हा अग्नी।। ऐक्याची भावना। हीच यज्ञाची वेदी।। अशा अर्थाची ओवी ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे. अणूंना भिंती नसतात हे ज्ञानच आहे. ते विज्ञानमार्गे आलेले असो अथवा अंतर्मुख झालेल्या असामान्य व्यक्तीच्या मेंदूतून आलेले असो. भिंती नसलेले अणू म्हणूनच त्यांच्या केंद्रकाभोवती फिरत असलेल्या मूळ कणांची अदलाबदल करू शकतात. केंद्रकाभोवती एक कण असेल तर ड्रायड्रोजन. दोन कण असतील तर हिलियम असे कोष्टक असते. अशा तऱ्हेने पंगत बसते पण ती खोल्यांची नसते तर उर्जा क्षेत्राची असते. या क्षेत्राचे विश्वभर एक जाळे असते इथे दुसरे काही शिरू शकत नाही. जिथे हे अणू नसतात तिथे ऊर्जेचे तरंग वाहतात ओवी म्हणते:
बघतो सर्वत्र। परंतु तुझ्या व्यतिरिक्त। परमाणूही नाही जागेला पात्र। इतके सारे भरले।।
तुला नाही आदी अथवा मध्य। तुला नाही अंत। विश्वाचे पाय आणि हात। अमर्याद॥
या ओव्या श्रीकृष्णाला उद्देशून असल्या तरी खरेतर त्या विश्वाचे रूप सांगतात. या अणुंच्या रचनेत असलेल्या लहान कणांचा जो नाच, धांगडधिंगा, अफरातफर, गोफ, किंवा वस्त्र विणले जाते त्याला काही नियम असतात का? त्याचे उत्तर असे आहे की, नियम असेलच तर ते आपल्या अवाक्यात अजून आलेले नाहीत. म्हणूनच ते आपल्यापुरते अनिश्चित असतात, पण तरीही या गर्दीत या अनिश्चिततेत काहीतरी सरासरी निघते त्यावर आपले विश्व तरते. जसे मानवी व्यवहार शेवटी गोळाबेरीज तत्त्वावर ठरतात तसे. पुढचा प्रश्न असा की, या कणांच्या भाऊगर्दीला काही दिशा देता येईल का? या कणांमध्ये केवढी तरी ऊर्जा भरलेली आहे. दिशा दिली तर मग ही ऊर्जा आपल्या कामी लागेल. हे कामी लावणे आता शक्य झाले आहे. या अणुंना त्यांच्या कणांना कवायती करीत सैन्य चालते तसे चालविता येते. शेतांवर झाडांवर बागडणारे पक्षी कितीतरी असतात, पण काय करतील यांचा नेम नसतो; परंतु टोळधाड मात्र रांगेत येते.
या अणूंच्या कणांच्या टोळधाडीविषयी पुढच्या लेखात.
रविन मायदेव थत्ते
आजचे महाराष्ट्रसारस्वत ५ ऑगस्ट
१८५८> कवी, इतिहास संशोधक, नाटककार वासुदेव वामनशास्त्री खरे यांचा जन्म. ‘नाना फडणीसांचे चरित्र’ हा त्यांचा पहिला इतिहासविषयक ग्रंथ, तर ‘अधिकारयोग’, ‘इचलकरंजी संस्थानाचा इतिहास’ ही पुस्तके तसेच पाच नाटके , समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे ‘यशवंतराय’ हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता.
१८७६> संपादक के. मो. पंडित यांनी ‘आर्यावर्त’ हे पत्र धुळय़ात सुरू केले.
१८९०> ख्यातकीर्त इतिहासकार, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्म. ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार’, ‘मराठी इतिहास आणि इतिहास संशोधन’ हा शास्त्रीय इतिहासलेखन पद्धतीचा आढावा घेणारा ग्रंथ, तसेच ‘महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य संमेलन’, ‘सुमनसप्तक’, ‘श्रोते हो’ (भाषणसंग्रह) आदी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांचा शिवचरित्र प्रकल्प मात्र अपूर्णच राहिला.
१९२२ > कथाकार, अनुवादक, लोकगीतांचे संग्राहक नरेश भिकाजी कवडी यांचा जन्म. ‘बीअरची सहा कॅन्स’, ‘चुळचुळ मुंगी पळीपळी कंटाळा’ हे कथासंग्रह आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकगीतांचे ‘भरली चंद्रभागा’ हे संकलन यांसाठी ते मराठीत अधिक परिचित झाले.
संजय वझरेकर