मुक्त संचार पद्धत म्हणजे गोठय़ाच्या कडेला कंपाउंड करून गायींना मोकळे सोडणे. एका गायीला १०० ते १५० चौरस फूट जागा उपलब्ध करून देणे. ऊन-सावलीची, पाणी पिण्याची, चारा खाण्याची आणि तेथेच दूध काढण्याची सोय केल्यामुळे गायी त्यांच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार चारा खातात, पाणी पितात, ऊन-सावली घेतात, स्वच्छ जागेत जाऊन बसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला शेण लागत नाही. तेथेच अंग खाजवण्यासाठी सोय असल्यास अंग खाजवून घेतात. मोकळे सोडल्यामुळे गायी स्वच्छंदपणे फिरतात व जगतात. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते. फिरल्यामुळे त्यांच्या नख्या वाढत नाहीत. गोचीड होत नाही. आजाराचे प्रमाण कमी होते.
मुक्त संचार पद्धतीने गोठा बांधणे खíचक आहे, या शंकेने काही शेतकरी याकडे वळत नाहीत. वास्तविक, शेतकऱ्यांकडे उपलब्ध भांडवलामध्ये कमी खर्चापासून जास्त खर्चाच्या आधुनिक पद्धतीचा गोठा तयार करता येतो. गायी बांधण्यासाठी असलेल्या शेडला जोडून बांबू, लाकडी गोल्टे, चनिलक, सिमेंट पाइप, लोखंडी पाइप यांसारखे साहित्य वापरून मोकळे फिरण्यासाठी जागा तयार करता येईल. गाई फिरतात तेथे उभ्या उसाचे पाचट किंवा बारीक काडीकचरा टाकला तर त्याचा उपयोग गायींना बसण्यासाठी होतो.
दहा गायींना अंदाजे दोन गुंठे क्षेत्राएवढी मोकळी जागा करावी. चारा खाण्यासाठी एका बाजूला विशेषत: शेडमध्ये गव्हाण करावी. चारा वाहतूक सोपी व्हावी म्हणून गव्हाणीत चारा बाहेरून टाकता येईल अशी सोय करावी. चारा डेपो, चॉफ कटर आणि चाऱ्याची गव्हाण यातील अंतर कमी ठेवावे, त्यामुळे कष्ट वाचतील. पाण्याची सोय शेडच्या दुसऱ्या बाजूला करावी, जेणेकरून टाकी धुतल्यानंतर पाणी बाहेर काढून देणे सोपे होईल. गायींना खाजवण्यासाठी मुक्त गोठय़ाच्या मधोमध एक खांब जमिनीत गाडून त्या खांबाला जाड काथ्या गुंडाळावा. याचा वापर गायी अंग खाजवण्यासाठी करतात. गांडूळखत तयार करण्याचा प्रकल्पही सुरू करता येईल. मुक्त गोठा तयार करण्यासाठी दहा गायींना ३० ते ४० हजार रुपयांपासून दोन-तीन लाखांपर्यंत खर्च येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा