भारतात फळे आणि भाजीपाला यांच्या काढणीनंतर चुकीच्या हाताळणीमुळे दरवर्षी जवळजवळ ३०-४० टक्के मालाची नासाडी होते. म्हणून त्यांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये फळांची व भाजीपाल्याची शास्रोक्त पद्धतीने काढणी, शेतावरील हाताळणी, संस्करण, प्रतवारी, पॅकिंग पूर्वशीतकरण, साठवण, विक्रिव्यवस्थापन व प्रक्रिया यांचा समावेश होतो.
फळांच्या काढणीनंतरची गुणवत्ता आणि त्यांचे आयुष्य प्रामुख्याने फळांच्या पक्वतेवर अवलंबून असते. फळे पक्के होण्यापूर्वी काढल्यास त्यांची प्रत खराब होते. ती पिकत नाहीत. फळे उशिराने काढल्यास जास्त काळ साठवून ठेवता येत नाहीत. म्हणून, फळांची पक्वता ओळखून काढणी करणे महत्त्वाचे असते. काढणीनंतर ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत फळे खराब होता कामा नयेत.
जी फळे झाडावरून काढल्यानंतर पिकतात, त्यांना ‘क्लायमॅक्टेरिक’ फळे म्हणतात. काढणीनंतर या फळांतील पेशींचा श्वसनाचा वेग एकदम वाढलेला असतो. उदा. आंबा, पपई, चिकू, केळी, सीताफळ. जी फळे झाडावरून काढल्यानंतर पिकत नाहीत, झाडावरच पिकतात, त्यांना ‘नॉन-क्लायमॅक्टेरिक ’ फळे म्हणतात. काढणीनंतर या फळांतील पेशींचा श्वसनाचा वेग स्थिर असतो. उदा. पेरू, िलबूवर्गीय फळे, अंजीर, जांभूळ, द्राक्षे.
फळ तयार होईपर्यंत लागलेला कालावधी, दृश्यसंकेत, वाढ, आकार, रंग, स्वरूप, वाण, घनता, साखर, पिष्टमय पदार्थ, सामू, आम्लता, टॅनिन आणि श्वसनाचा वेग हे मानदंड फळ परिपक्व झाले की नाही हे ओळखण्यासाठी वापरतात. परंतु फळ उत्पादाला बागेत अथवा शेतात उभे राहून विशेष करून फळांचा रंग, वाढ, आकार आणि दृश्यसंकेत यावरूनच फळांची परिपक्वता सहज ओळखता येते. अर्थात, फळांच्या परिपक्वतेबाबतचा अनुभव त्याला असावा लागतो.
भाजीपाल्याची काढणी फळांसारखी पक्वतेला करत नाहीत. भाज्या कोवळ्या व खाण्यास योग्य असतात, अशा पक्वतेला ‘हॉर्टकिल्चरल मॅच्युरिटी’ म्हणतात.
फळे व भाजीपाल्याची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो हातांनीच करावी. काढणीसाठी झेल्याचा वापर करावा. फळे व भाजीपाला एकमेकांना घासणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
वॉर अँड पीस: नेत्ररुक्षता व नेत्रस्राव : आयुर्वेदीय उपचार
रात्रभर भरपूर जागून काम, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांचा अतिरिक्त वापर, वातानुकूलित कार्यालय, खूप बारीक अक्षरांचे वाचन, मानसिक ताणतणाव, ठराविक वेळेत काम रेटावे लागणे, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची नोकरी, नोकरीतील बेभरवसा या सर्वामुळे तरुण मंडळी ताणतणावात असतात. मेंदूकडून शरीरातील विविध यंत्रणांना आज्ञा मिळत असतात. शरीरातील सात धातू-रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र यांचे सम्यग पोषण झाले तर आपल्या डोळ्यांचे काम विनासायास चालते. डोळा हे सातही धातूंचे सार आहे. वर सांगितलेला खूप ताणतणाव, मेंदूवरचा अतिरिक्त भार, यामुळे डोळ्यांचे पोषण पुरेसे होत नाही. डोळे रूक्ष होतात. कोरडे कोरडे वाटतात. ज्यांना सतत कॉम्प्युटरचे बारीक वाचनाचे काम आहे त्यांचे डोळे वारंवार रुक्ष होतात. स्वाभाविकपणेच अशी माणसे काहीतरी स्निग्ध पदार्थ तात्पुरते खाऊन डोळ्यांतील रुक्षता कमी होईल असे प्रयत्न आपापल्या परीने करत असतात. नेत्रतज्ज्ञ डोळ्यांकरिता विविध नेत्रबिंदू सुचवितात. पण त्यामुळे नेत्ररूक्षतेचे मूळ कारण दूर होत नाही. ज्यांना नेहमीच जागरण करावे लागते, डोळ्यांचे खूप ताणतणावाचे काम आहे त्यांनी शतावरीघृत वा महात्रफलघृत नियमितपणे सकाळ-सायंकाळ घ्यावे. खात्रीचे दूध, घरगुती लोणी, तूप पातळ करून डोळ्यांमध्ये सकाळ-सायंकाळ टाकून डोळ्य्ऋांची उघडझाप करावी. तिखट, खारट, आंबट, चहा, मांसाहार, व्यसने टाळावी.
दिवसेंदिवस आपल्या आसपास धुळीचे प्रदूषण, तीव्र उन्हाळा, रात्रपाळी, वातानुकूलित कार्यालय, मलावरोधाची नेहमीची तक्रार यामुळे डोळ्यांतून फाजील स्राव ही वाढती समस्या खूप खूप जणांना सतावत असते. डोळे वारंवार धुवावे लागतात. विविध नेत्रबिंदू तात्पुरता आराम देतात. अशा नेहमीच्या नेत्रस्राव तक्रारीकरिता रात्री योगवाहीत्रिफळाचूर्ण, सकाळी-सायंकाळी आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, नेत्ररक्षावटी, प्र. ३ गोळ्या, रसायनचूर्ण एक चमचा दोन वेळा घ्यावे. डोळ्याला जपावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. शब्दांचे जग
ज्ञानेश्वरांनी एके ठिकाणी म्हटले आहे की माणूस योगी वा ज्ञानी होण्याच्या मार्गावर असला तर एके ठिकाणी बसून तो सगळ्या विश्वाचा फेरफटका मारू शकतो.
ते या जन्मात तरी मला शक्य नाही. परंतु शब्दांच्या जगात मात्र एके ठिकाणी बसून फेरफटका मारण्याचा एक खेळ मी शोधून काढला आहे. त्याची सामग्री पुढीलप्रमाणे : आपटय़ांचा संस्कृत इंग्रजी शब्दकोश, कृ. पां. कुलकर्णी यांचा मराठी शब्दांचा व्युत्पत्तिकोश, रानडय़ांची इंग्लिश मराठी डिक्शनरी, वेलिंगकरांचे ज्ञानेश्वरीतील शब्दभांडार आणि तुळपुळे आणि फेलडहॉस यांचा जुने मराठी/इंग्रजी शब्दकोश.
ही तयारी केली की तुम्ही प्रवासाला निघू शकता. जावळ हा मराठीतला शब्द घ्या. मला असे वाटते की जन्मलेल्या मुलाला जर बऱ्यापैकी केस असतील तर हा शब्द वापरला जातो. मुलींना चांगले केस असणे अपेक्षित असते. जावळमधला वळ वलय या शब्दापासून आल्याची शक्यता दाखवतात तसेच वलय आणि बाल ह्य़ामध्येही साधम्र्य आहे असे सूचित केले आहे. आता राहिला जा. तो जातमधून आला आहे. त्याचा अर्थ जन्म होणे, देणे असा आहे, परंतु जर हा शब्द जर तुम्ही सूक्ष्मात जाऊन त्याचे प्रकार बघितलेत जत/न: अशी फोड करून दिला आहे. आता आपला एक प्रवास पूर्ण झाला. जत + न: वलय = जावळ. मुलाच्या डोक्याभोवतीचे केसाचे वलय.
आणखी एक शब्द बघू. अजीर्ण सरळ सरळ तर अर्थ दिसतो जे जीर्ण होत नाही, फाटत नाही ते. जीर्ण हा शब्द जृ ह्य़ा धातूपासून आला आहे. त्याचा अर्थ नाश पावणे असा आहे. मग आपले पोट बिघडते तेव्हा अजीर्ण शब्द कुठून टपकला असा प्रश्न निर्माण होतो. आपण आत्मकेंद्रित म्हणून ही भानगड होते. इथे जास्त खाल्ल्यामुळे किंवा चुकीचे खाल्ल्यामुळे अन्न जीर्ण होत नाही त्याचे विघटन होत नाही म्हणून ते अजीर्ण राहते आणि अजीर्ण आपल्याला त्रास देते म्हणून अजीर्ण झाले असे म्हणतात.
आता एक अक्षर घेऊ ‘ख’ ह्य़ाचा अर्थ आकाश किंवा अंतरिक्षाची पोकळी असा आहे. ही पोकळी गोल भासते म्हणून ख-गोल (शास्त्र). नंतरचा शब्द खग्रास. आकाशातल्या वस्तूंचा ग्रास झाला तर खग्रास ग्रहण लागते. पण ग्रहण शब्दही महत्त्वाचा. ग्रह या शब्दाचा एक अर्थ वेढणे आणि ताब्यात घेणे असा आहे. आता खग्रास ग्रहण समजले. हे ग्रासणे जर पूर्ण नसेल किंवा त्याच्यात खंड पडला तर मग खंडग्रास ग्रहण.
बघा. तुम्हीही प्रयत्न करून बघा. इतका मनमोकळा आनंद आणि काही काहीतरी शोधल्याचे समाधान असा योग तयार होतो.
उद्या विशेषणांबद्दल आणि तेही श्रीकृष्णाला लावलेल्या.
रविन मायदेव थत्ते
आजचे महाराष्ट्रसारस्वत ९ डिसेंबर
१८७८> ग्रंथकार अण्णा आबाजी लट्टे यांचा जन्म. कोल्हापूरच्या राज्याचा इतिहास, हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याचा उदय, शाहू महाराजांचे चरित्र, जगातील संघटित राजव्यवस्था, संस्थानचा इतिहास आणि माझ्या विलायतेच्या आठवणी अशी ग्रंथसंपदा.
१९३९> गीतावाचस्पति गोपाळ भिडे यांचे निधन. वयाच्या ५व्या वर्षी अंधत्व येऊनही त्यांनी उपनिषद रत्नप्रकाशचे भाषांतर केले, गीतेवर श्रीमद्भगवद्णीतार्थ रहस्यदीपिका हा ग्रंथ लिहिला.
१९४१> रासायनिक परिभाषा व अन्य विज्ञान-पुस्तके लक्ष्मण गणेश साठे यांचे निधन.
१९६८> वारकरी संप्रदायाचे गुरुतुल्य अभ्यासक ह. भ. प. शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर यांचे निधन. ज्ञानेवरी व वारकरी पंथावर अनेक ग्रंथ त्यांनी सिद्ध केले.
१९७३> कथा-कादंबरीकार डॉ. वामन दामोदर गाडगीळ यांचे निधन. विचित्र संसार, चंपी आणि मोरया या कादंबऱ्या. खुसखुशीत मेवा, मुलीच्या लग्नाच्या चटकदार कथा हे कथासंग्रह. मराठवाडय़ातील गद्यविहार’हे २३ लेखकांच्या गद्यांचे संपादनही त्यांनी केले.
१९७३> जयवंत दळवी लिखित संध्याछाया या नाटकाचा प्रथम प्रयोग धि गोवा हिंदू असोसिएशनतर्फे करण्यात आला.
संजय वझरेकर