भारतात फळे आणि भाजीपाला यांच्या काढणीनंतर चुकीच्या हाताळणीमुळे दरवर्षी जवळजवळ ३०-४० टक्के मालाची नासाडी होते. म्हणून त्यांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये फळांची व भाजीपाल्याची शास्रोक्त पद्धतीने काढणी, शेतावरील हाताळणी, संस्करण, प्रतवारी, पॅकिंग पूर्वशीतकरण, साठवण, विक्रिव्यवस्थापन व प्रक्रिया यांचा समावेश होतो.
फळांच्या काढणीनंतरची गुणवत्ता आणि त्यांचे आयुष्य प्रामुख्याने फळांच्या पक्वतेवर अवलंबून असते. फळे पक्के होण्यापूर्वी काढल्यास त्यांची प्रत खराब होते. ती पिकत नाहीत. फळे उशिराने काढल्यास जास्त काळ साठवून ठेवता येत नाहीत. म्हणून, फळांची पक्वता ओळखून काढणी करणे महत्त्वाचे असते. काढणीनंतर ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत फळे खराब होता कामा नयेत.
जी फळे झाडावरून काढल्यानंतर पिकतात, त्यांना ‘क्लायमॅक्टेरिक’ फळे म्हणतात. काढणीनंतर या फळांतील पेशींचा श्वसनाचा वेग एकदम वाढलेला असतो. उदा. आंबा, पपई, चिकू, केळी, सीताफळ. जी फळे झाडावरून काढल्यानंतर पिकत नाहीत, झाडावरच पिकतात, त्यांना ‘नॉन-क्लायमॅक्टेरिक ’ फळे म्हणतात. काढणीनंतर या फळांतील पेशींचा श्वसनाचा वेग स्थिर असतो. उदा. पेरू, िलबूवर्गीय फळे, अंजीर, जांभूळ, द्राक्षे.
फळ तयार होईपर्यंत लागलेला कालावधी, दृश्यसंकेत, वाढ, आकार, रंग, स्वरूप, वाण, घनता, साखर, पिष्टमय पदार्थ, सामू, आम्लता, टॅनिन आणि श्वसनाचा वेग हे मानदंड फळ परिपक्व झाले की नाही हे ओळखण्यासाठी वापरतात. परंतु फळ उत्पादाला बागेत अथवा शेतात उभे राहून विशेष करून फळांचा रंग, वाढ, आकार आणि दृश्यसंकेत यावरूनच फळांची परिपक्वता सहज ओळखता येते. अर्थात, फळांच्या परिपक्वतेबाबतचा अनुभव त्याला असावा लागतो.
भाजीपाल्याची काढणी फळांसारखी पक्वतेला करत नाहीत. भाज्या कोवळ्या व खाण्यास योग्य असतात, अशा पक्वतेला ‘हॉर्टकिल्चरल मॅच्युरिटी’ म्हणतात.
फळे व भाजीपाल्याची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो हातांनीच करावी. काढणीसाठी झेल्याचा वापर करावा. फळे व भाजीपाला एकमेकांना घासणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा