संरक्षित अर्थव्यवस्थेमुळे नवीन उद्योगांसाठी परवाना पद्धत उदयास आली. या पद्धतीमध्ये मागणी व पुरवठा यांचा मेळ घालून ठरावीक मर्यादेपर्यंतच नवीन उद्योगांना परवानगी देण्याची सोय होती. यामुळे देशातील उद्योगांना आपल्या अंतर्गत बाजारपेठेमध्ये परदेशी उद्योगांकडूनच नव्हे, तर देशातील उद्योगांकडूनदेखील स्पर्धा नव्हती. अशा बाजारपेठेमध्ये पुरवठादारांची मक्तेदारी (मोनोपॉली) तयार झाली व त्यांच्याकडून माल खरेदी करण्यावाचून ग्राहकास अन्य पर्याय उपलब्ध नव्हता. याचा उद्योगांनी काही प्रमाणात गरफायदा घेतला व उत्पादनांचा दर्जा वाढविण्यास आणि किंमत कमी करण्यासाठी कधीही प्रयत्न केले गेले नाहीत. इतर विकसित देशांतील उत्पादनांचा दर्जा आपल्या देशातील उत्पादनांच्या तुलेनेने खूपच चांगला असे व किमतीही वाजवी असत. पण ही उत्पादने खुलेपणे आपल्या बाजारपेठेत आणता येत नसल्यामुळे चोरटय़ा मार्गाने (स्मगिलग) अशा मालाची आयात होऊ लागली. कापडाच्या बाबतीतही जपानसारख्या देशातून कापडाची चोरटी आयात मोठय़ा प्रमाणावर होत होती. विकसित देशांचा असा समज झाला की विकसनशील देशातील उद्योग चांगल्या दर्जाच्या मालाचे उत्पादन करूच शकत नाही व या देशांमध्ये चांगल्या दर्जाच्या मालाला मोठी मागणी आहे. त्यामुळे हे सर्व देश जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आले तर विकसित देशातील उद्योगातील उत्पादनांना मागास देशांच्या बाजारपेठेत मोठी मागणी मिळेल व या मागास देशातील उद्योग बंद पडतील.
वस्त्रोद्योगाच्या बाबतीत जागतिकीकरणाच्या पूर्वी विविध देशांमध्ये ‘बहुविध धागा करार’ (मल्टी फायबर अॅग्रीमेंट) या नावाचा करार होता. यामध्ये एका देशामध्ये दुसऱ्या देशामधून तंतू, सूत किंवा कापड यांची जेवढी आयात करण्यात येत असे, त्या प्रमाणात त्या देशामध्ये निर्यात करण्याची मुभा असे. यासाठी प्रत्येक देशाला निर्यातीसाठी काही ठरावीक कोटा देण्यात येत असे. भारतामध्ये विकसित देशांकडून अत्यंत अत्यल्प प्रमाणात आयात करण्यात येत असल्यामुळे निर्यातीसाठी कोटाही अतिशय कमी प्रमाणात होता, म्हणून निर्यातीवर मर्यादा येत असत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत ही कोटा पद्धत टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला व याची सुरुवात इ.स. १९९५ पासून झाली. २००५ साली ही प्रक्रिया पूर्ण करावयाची होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा