पानाचा कोंब बाहेर आला की त्याचा लाल-पोपटी रंग मनास मोहून टाकतो. तजेलदार कोवळी पानं पाहता पाहता वाढताना हिरवीगार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात, तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. कालांतराने ती पानं पिकून पिवळी पडतात, सुकत जातात आणि अखेरीस गळून पडतात. काही झाडांना विशिष्ट ऋतूंमध्ये नवीन पालवी फुटते तसेच काही ऋतूंमध्ये पिकलेली पानं जास्त प्रमाणात गळतात.
पानांमध्ये हिरव्या रंगाचं हरितद्रव्य, पिवळ्या, लाल रंगाचे कॅरेटोनाइड्स आणि पिवळा, लाल, नािरगी, कोनफळी, जांभळा अशा अनेक रंगछटांचे अॅन्थोसायॅनिन असतात. पण पानात सगळ्यात जास्त प्रमाण अर्थातच हरितद्रव्याचं असतं. वनस्पती पानांच्या साहाय्याने आपलं अन्न तयार करतात, ते प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारा. सर्व प्राणिमात्रांसाठीच नव्हे तर वनस्पतींच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या या प्रकाशसंश्लेषण क्रियेत हरितद्रव्यांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग असतो. अर्थातच हरितद्रव्याला जास्त महत्त्व आहे. त्याची निर्मितीही इतर रंगद्रव्यांच्या मानाने भरपूर प्रमाणात होते. त्यामुळे इतर रंगद्रव्यं झाकली जातात आणि पानांचा हिरवा रंग उठून दिसतो.
जोपर्यंत पानाला प्रकाश मिळत आहे, पाणी मिळत आहे; तोपर्यंत हरितद्रव्य बनवण्याचं काम सुरू राहतं. पण पाण्याची पातळी कमी झाली किंवा प्रकाश कमी झाला की हरितद्रव्यांची निर्मिती कमी होत जाते.
पानांत विशेषत: देठांत पाणी पोहोचवणाऱ्या वाहिन्यांच्या (जलवाहिन्या) खाली पेशींचा एक थर असतो. पाणी जोपर्यंत पानात त्या पेशींपर्यंत येत असतं, तोपर्यंत हरितद्रव्याची निर्मिती चालूच राहते. पण पाणी येणं कमी झालं की हरितद्रव्याची निर्मिती कमी कमी होत जाते. हरितद्रव्यांचं काम मंदावत जातं. पानातली इतर रंगद्रव्यं दिसायला लागतात.
म्हणजे पानांत कॅरेटोनॉइड्स असतील तर पानं पिवळी किंवा नािरगी दिसतात. टॅनिन असेल तर पानं तपकिरी दिसू लागतात. पानाचा देठाकडचा भाग सगळ्यात शेवटी सुकतो. जेव्हा पाणी पानांत येणं पूर्णपणे थांबतं, तेव्हा इतर रंगद्रव्यंही आपलं कार्य थांबवतात आणि कालांतराने नष्ट होतात. देठ पूर्णपणे सुकलं की ते झाडापासून वेगळं होतं आणि गळून पडतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा