विहीर, ओहोळ, नदी, झरे ही पाण्याची महत्त्वाची उगमस्थाने होत. या प्रत्येक उगमस्थानातील पाण्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात. कठीण, मृदू, खनिजयुक्त पाणी हे पाण्याचे काही रासायनिक गुणधर्म आहेत. पाण्यात साबणाला कमी फेस नाही तर ‘कठीण पाणी’ आणि भरपूर फेस आला तर ‘मृदू पाणी’ होय.
कागद कारखान्यात जर कठीण पाण्याचा पुरवठा होत असेल तर कागदाच्या लगद्यातील सेल्यूलोजच्या तंतूंना या क्षारातील बारीक कण चिकटून बसतात. हे कण विरंजन प्रक्रियेने निघून जात नाहीत, त्यामुळे कागद पांढराशुभ्र दिसत नाही. अशा वेळेस हे पाणी मृदू करण्याची गरज असते. कठीण पाण्यात कॅल्शियम बायकाबरेनेट, मॅग्नेशियम बायकाबरेनेट्स यांचे क्षार असतील तर ते पाणी तात्पुरते कठीण असते. पाणी उकळल्यावर कॅल्शियम काबरेनेट, मॅग्नेशियम काबरेनेट हे पाण्यात न विरघळणारे क्षार तयार होऊन पाण्याच्या तळाशी जाऊन बसतात, त्यामुळे ते वेगळे करता येतात.
कागद कारखान्यात लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. एवढे पाणी उकळण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते. अशा वेळेस पाण्यात चुन्याची निवळी मिसळून पाणी मृदू केले जाते. या प्रक्रियेत कॅल्शियम बायकाबरेनेटचे कॅल्शियम काबरेनेटमध्ये आणि मॅग्नेशियम बायकाबरेनेटचे मॅग्नेशियम काबरेनेटमध्ये रूपांतर करून वेगळे करतात. जेव्हा पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार पाणी उकळून वेगळे करता येत नाहीत, तेव्हा त्या पाण्याला ‘कायमच कठीण’ पाणी म्हणतात. पाण्यात धुण्याचा सोडा (सोडियम काबरेनेट) मिसळतात. कधी कधी पाण्यात मॅग्नेशियम सल्फेटचे क्षार असतात. हे क्षार जरा जास्तच हट्टी असतात. उकळून किंवा सोडियम काबरेनेट मिसळून वेगळे करता येत नाहीत. तेव्हा, पाण्यात चुन्याची निवळी आणि सोडियम काबरेनेट यांचे मिश्रण वापरून ही समस्या दूर करता येते. या सर्व प्रक्रिया करून झाल्यावर पाण्यात जे न विरघळलेले क्षार राहतात ते तळाशी जातात. ते पूर्णपणे काढण्यासाठी पाणी चार वेगवेगळ्या टाक्यांमधून गाळले जाते. आजकाल बऱ्याच वेळेस ऑयन एस्क्चेंज ही पद्धत सुद्धा पाणी मृदू करण्यासाठी वापरली जाते.
प्रबोधन पर्व: संस्कृत व आपल्या देशी भाषेची थोडी तुलना
‘‘ ‘संस्कृत’ हे नावच पहिल्याने कोणत्याही राष्ट्राचे किंवा मुलुखाचे नव्हे. ‘संस्कृत’ नावाचे लोक नव्हते, व ‘संस्कृत’ नावाचा मुलुखही नव्हता. दरोबस्त ब्राह्मण ‘संस्कृत’ बोलत असेही समजण्यास पुरावा नाही. तेव्हा ‘संस्कृत’ नाव पडलेली भाषाही राष्ट्रीय भाषा समजण्यास अनेक अडचणी दिसतात. ‘संस्कृत’ भाषेत ऐतिहासिक ग्रंथ नाहीत, यावरून ती राष्ट्रीय भाषा नव्हती, असे निर्विवाद सिद्ध होत नाही काय? ‘लातिन’ व ‘ग्रीक’ या तर पूर्वी धडधडीत जागत्या भाषा होत्या. ‘लातिन’ हे पूर्वी जसे लोकांचे तसेच मुलुखाचे नाव होते. ‘लातिन’ हे नाव लोकांचे होते त्यापक्षी त्या लोकांचा इतिहास त्या भाषेत लिहिला गेला आहे, त्यात नवल नाही. सारांश, ‘लातिन’ ही राष्ट्रीय भाषा होती. हाच न्याय ‘ग्रीक’ भाषेस लागू होतो. तर ‘संस्कृत’ ही राष्ट्रीय भाषा नव्हती व तीत ऐतिहासिक ग्रंथ नाहीत, तर राष्ट्रीयपणास ‘संस्कृता’च्या अध्ययनाने स्फुरण येण्याचा थोडा तरी संभव आहे काय? जर इतिहास नाही तर उदाहरणे नाहीत, व जर उदाहरणे नाहीत तर आध्यात्मिक उन्नतीचे पाऊल हृदयात पडणार कसे, व ते तसे न पडले तर राष्ट्रीयपणास स्फुरण येणार कसे? ’’ असा तर्कशुद्ध युक्तिवाद करत मायमराठीला गौणत्व देऊ पाहणाऱ्यांना ठणकावत राजारामशास्त्री भागवत पुढे लिहितात – ‘‘आमच्या देशी भाषेत जीव असून, तिच्यातील दरोबस्त तत्त्व संस्कृतात आले आहे, असे कित्येक संस्कृताचे कैवारी म्हणतात. देशी भाषेत जे राष्ट्रीय धर्मरूपी नुकतेच निर्विष्ट केलेले तत्त्व वहात्या पाण्याप्रमाणे जिवंत वहात आहे, ते तर संस्कृतात कोठेही सापडण्याचा संभव नाही. बरे, जे बखरांसारखे ऐतिहासिक तत्त्व आमच्या देशी भाषेत आहे, ते तरी संस्कृतात कोठे व कसे आढळणार?.. संस्कृतातील महाकाव्यात तरी अपूर्वपणा कोणता? जितका अपूर्वपणा रघुवंशकादिकात आहे, तितकाच मुक्तेश्वराच्या व वामनाच्या व मोरोपंताच्याही काव्यात आहे.’’
मनमोराचा पिसारा: ‘लॉजिकॉमिक्स’चं गारूड
‘लॉजिकॉमिक्स’ या ग्राफिक कादंबरीचा चित्र कॅनवास आणि रसेल यांचा चरित्रपट अतिशय विस्तृत आणि व्यामिश्र आहे. मुळात बट्र्राड रसेल यांचं व्यक्तिमत्त्व एखाद्या चरित्रकाराला आकर्षक वाटावं, असं नाही. कारण प्रथमदर्शनी रुक्ष वाटावा असा उमरावी व उर्मटपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांच्या आवडीचे म्हणजे आयुष्याचं ध्येय तर्कज्ञान (लॉजिक) आणि गणित. गणिताचा मूळ पाया तर्काधिष्ठित आणि तर्काच्या सिद्धीसाठी गणित अशी गुंतागुंत त्यांनी रचली.
अंतस्फूर्ती, भावनांचे आवेग आणि सवयी, या तीन गोष्टी मानवी विकास आणि व्यवहाराला बाधक असतात. सगळे प्रश्न फक्त ‘तर्का’ने सुटू शकतात यावर रसेल यांचा अढळ विश्वास होता. त्याला पदोपदी तडे जातात आणि अंतस्फूर्तीने घेतलेला सत्याचा शोध यांनी आलेला अस्वस्थपणा त्यांना टोचतो. अशी ही ढोबळ कथा आहे. पण कथानक अथवा चरित्र हा या ग्राफिक कादंबरीचा उद्देश नाहीये. ते फक्त निमित्त आहे. संपूर्ण कादंबरी ‘कॉमिक्स’च्या शैलीत चित्रित केली आहे. आशय आपली अभिव्यक्ती शोधत चित्रित आणि शब्दांकित होतो याचा अनुभव कादंबरी वाचताना येतो.
ग्राफिक कादंबरी चित्रपटाच्या चित्रफितीसारखी चित्रित केलेली असते. त्यात चित्रमयता नेहमी शब्दांच्या पुढे असते. पात्रांच्या तोंडचे काही शब्द बुडबुडय़ात मांडलेले असले तरी (पात्रांचा) मूड चित्रातून व्यक्त होतो. जशी पुस्तकाची भाषा आणि पद्धत असते तशी चित्रपटांची असते. इथे परिच्छेद तर तिथे ‘कटिंग.’ पुस्तकात वाक्य तसा तिथे शॉट. स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह इ. हे मजकुराचं व्याकरण असतं, तसं ग्राफिकचं व्याकरण असतं. पुस्तकात लेखक किंवा नॅरेटर तसा इथे कॅमेरा. तो वेगवेगळ्या पद्धतीने भोवताली पाहतो. त्यामुळे ग्राफिकमध्येही लाँगशॉट, मिडशॉट, क्लोजप आणि टाइट क्लोजप असतात. काही शॉट ओव्हर द शोल्डर, काही पॅन, काही झूम. अगदी हेच व्याकरण इथे वापरलं आहे. सातत्याने केवळ शब्दांच्या माध्यमातून आशय समजून घेणाऱ्या आपल्या मनाला ही कादंबरी वाचण्याकरिता विशिष्ट ट्रेनिंग लागतं. बारकाईनं चित्रं पाहावी लागतात. ती दृष्टी आजमावली तर ‘लॉजिकॉमिक्स’ ग्राफिक शैलीचं पाठय़पुस्तक आहे, हे लक्षात येतं. मुळात भारतीय मनाला नॅरेटिव चित्रशैली अधिक भावते. चित्रांच्या मांडणीपेक्षा ते (चित्र) कोणती गोष्ट सांगतंय, हे आपण आधी शोधतो, त्यामुळे ग्राफिक कादंबरीतला मजकूर आपण वाचून पटकन पुढे जातो. तसं न करता, पानावरील प्रत्येक चित्र नीट पाहून, त्या प्रसंगामधला मूड साकारण्याकरिता चित्रकारांनी कोणत्या प्रयुक्त्या वापरल्या आहेत, हे तपासणं रंजक ठरतं.
संपूर्ण पानभर असलेल्या चित्रामध्ये दोन पात्रं बोलत बोलत पुढे जात आहेत असं दाखवलंय. त्यामध्ये झूम असल्यानं, पात्रांचे मूड त्यांच्या चेहऱ्यापेक्षा क्लोजप एकूण आविर्भावातून व्यक्त होतात आणि श्रोत्यांची बॉडी लँग्वेज कशी बदलते हे लक्षात येतं. रसेलची गोष्ट सुरू होते त्या वेळी पोलंडवर जर्मनीने हल्ला चढवलेला असतो; परंतु हे कथन करण्यापूर्वीच चित्रांतल्या मोकळ्या कॅनव्हॉसवर रणगाडे चितारलेले दिसतात. सिनेमात ज्याप्रमाणे, दृष्य दिसण्यापूर्वीच त्याचा साऊंड ट्रॅक ऐकू येऊ लागतो, तसा हा चित्रमय प्रकार आहे. कादंबरी रसेलच्या जीवनावर असली तरी ते लिहिणारे अपोस्टोलोस आणि क्रिस्टोस हे लेखक आणि अलेकॉस पापाडटोस आणि अॅन दि डोना हे ग्राफिक आर्टिस्ट स्वत:च्या गोष्टी सांगतात. कादंबरीची प्रक्रिया कशी घडली हे सांगताना मध्येमध्ये आपल्या मँगा या कुत्र्यासकट मोकाटपणे फिरतात. एका ग्रीक नाटकाचा मध्ये प्रवेश होतो आणि त्यातच रसेल यांच्या गोष्टीचा शेवट मिसळून जातो.
हे वाचायला किचकट वाटलं तरी पुस्तकामध्ये विलक्षण गारुड आहे. अनुभवलं तर ते कळेल.
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
कुतूहल: कठीण पाणी आणि कागद
विहीर, ओहोळ, नदी, झरे ही पाण्याची महत्त्वाची उगमस्थाने होत. या प्रत्येक उगमस्थानातील पाण्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात.
First published on: 22-02-2014 at 12:59 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity heavy water and paper