पिंजलेल्या तंतूपासून पेळू व पेळूपासून वात तयार करण्याच्या प्रक्रियेस पूर्वतयारी म्हणतात. वातेपासून सूत कातले जाते. सूतकताई यंत्रावर तयार केले जाणारे सूत हे एका लहानशा बॉबिनवर गुंडाळले जाते. ह्य़ा बॉबिन विणाई प्रक्रियेमधील पुढील यंत्रावर वापरण्यायोग्य नसते. यासाठी सूतकताई यंत्रानंतर बॉबिनवरील सूत मोठय़ा गोळ्यावर गुंडाळले जाते. या गोळ्यास त्याच्या आकारानुसार कोन किंवा चीज असे म्हणतात व या प्रक्रियेस ‘गुंडाळणी प्रक्रिया’ असे म्हटले जाते. अशा रीतीने तंतूपासून सूत निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये १. िपजण व स्वच्छता, २. पूर्वतयारी, ३. सूतकताई व ४. गुंडाळणी असे चार विभाग येतात.
चरख्याची रचना :
चरख्यात एका लाकडी चौकटीवर एका बाजूला सायकलच्या चाकासारखे, पण आकाराने लहान असे एक चक्र बसविलेले असते. हे चक्र हातांनी फिरविता यावे यासाठी त्याला एक मूठ लावलेली असते. दुसऱ्या बाजूला एक चाते (िस्पडल) आडवी (जमिनीला समांतर) बसविलेले असते. चात्याच्या मागील भागावर एक छोटी कप्पी असते. मोठय़ा चाकावरून एक अखंड दोरी या कप्पीभोवती नेलेली असते. मोठय़ा चाकाची मूठ फिरवून चाकाला गती दिल्यावर दोरीमुळे कप्पी व अनुषंगाने चाते फिरू लागते.
चरख्याचे चाते टकळीसारखेच काम करते. चात्यावर सुरुवातीला थोडेसे सूत गुंडाळून या सुताला पेळूतील तंतू जोडले जातात. पेळू हळूहळू चात्याच्या दिशेतच चात्यापासून दूर नेला जातो अशी सूतनिर्मिती सुरू होते. यावेळी चाकाच्या साहाय्याने चाते फिरवून तयार होणाऱ्या सुताला पीळ दिला जातो. डाव्या हातात पेळू धरून तो मागे नेला जातो व उजव्या हाताने चाक फिरविले जाते. डावा हात पूर्णपणे मागे गेल्यावर, डाव्या हातापासून चात्यापर्यंत लांबीचे सूत तयार होते. नंतर डावा हात पुढे नेऊन तो चात्याला काटकोनात धरला जातो व चाते फिरविले जाते. या वेळी तयार झालेले सूत चात्यावर गुंडाळले जाते. हीच क्रिया वारंवार करून मोठय़ा लांबीच्या सुताची निर्मिती करता येते. चरखा हा मूलभूत सूतनिर्मितीचा उद्गाता आहे.
संस्थानांची बखर: ब्रिटिश साम्राज्यातील किताब, पुरस्कार
२५ जून १८६१ रोजी महाराणी व्हिक्टोरियाने भारतीय संस्थानिक व सरकारी अधिकाऱ्यांना ‘मोस्ट एक्झाल्टेड ऑर्डर ऑफ स्टार ऑफ इंडिया’ असे सन्माननीय किताब देऊन त्यांचा सत्कार करण्याची प्रथा सुरू केली. या प्रथेनुसार ब्रिटिश सम्राट/सम्राज्ञी या पुरस्कारांचे ‘सॉव्हरीन ऑफ द ऑर्डर’ होते व भारताच्या व्हाईसरॉयपदावर असलेली व्यक्ती ‘ग्रँड मास्टर’ होती. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या खात्यात कमीत कमी ३० वष्रे काम केलेले कर्मचारी व भारतीय संस्थानिक हा पुरस्कार प्राप्त करण्यास पात्र समजले जात. प्रशासकीय वा सनिकी क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांसाठी हे किताब देण्याची प्रथा सुरू झाली. यापकी ‘नाईटग्रँड कमांडर’ (GCSI) हा सर्वोच्च बहुमान, ‘नाइट कमांडर’ (KCSI) हा दुसऱ्या क्रमांकाचा व ‘कंपॅनियन’ (CSI) हा तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान समजला जाई. काही बडय़ा संस्थानांच्या राज्यकर्त्यांना नाईट ग्रँड कमांडर (GCSI)चा मान त्यांच्या राज्यारोहणाच्या वेळी आपोआप प्राप्त होत असे. हैदराबादचा निजाम, भोपाळचा नवाब, म्हैसूरचा, जम्मू काश्मीर, बडोदे, ग्वाल्हेर , इंदौर, उदयपूर तसेच त्रावणकोर येथील महाराजा, जोधपूरचा महाराणा आणि कच्छचा महाराव हे यापैकी होत. नाइट ग्रँड कमांडरचे पहिले मानकरी हैदराबादचे नवाब मीर अली खान, ग्वाल्हेरचे जयाजीराव शिंदे, शीख साम्राज्याचे दलीपसिंह, जम्मू-काश्मीरचे रणबीरसिंग, इंदौरचे तुकोजीराव होळकर, बडोद्याचे खंडेराव गायकवाड इ. होते. ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया या सन्मानापेक्षा दुय्यम श्रेणीचा ‘ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर’ हा सन्मान देण्याची प्रथा पुढे सुरू झाली. काशीनरेश प्रभुनारायण सिंह यांना नाईट ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (GCIE) चा सन्मान मिळाला. या सन्मानांमध्ये शर्टाची विशिष्ट प्रकारची कॉलर, गळ्यात घालण्याचा हार आणि त्याला लावलेले पदक असे. फिकट निळ्या रंगाचा लांब अंगरखा व त्याच्या डाव्या बाजूला सूर्यफुलाप्रमाणे मोठे, सोनेरी राजचिन्ह असे. काही विशिष्ट दिवशी (कॉलर डे) ही मानचिन्हे लावून दरबारात येणे ही शिष्टाचाराची बाब होती.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com