पिंजलेल्या तंतूपासून पेळू व पेळूपासून वात तयार करण्याच्या प्रक्रियेस पूर्वतयारी म्हणतात. वातेपासून सूत कातले जाते. सूतकताई यंत्रावर तयार केले जाणारे सूत हे एका लहानशा बॉबिनवर गुंडाळले जाते. ह्य़ा बॉबिन विणाई प्रक्रियेमधील पुढील यंत्रावर वापरण्यायोग्य नसते. यासाठी सूतकताई यंत्रानंतर बॉबिनवरील सूत मोठय़ा गोळ्यावर गुंडाळले जाते. या गोळ्यास त्याच्या आकारानुसार कोन किंवा चीज असे म्हणतात व या प्रक्रियेस ‘गुंडाळणी प्रक्रिया’ असे म्हटले जाते. अशा रीतीने तंतूपासून सूत निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये १. िपजण व स्वच्छता, २. पूर्वतयारी, ३. सूतकताई व ४. गुंडाळणी असे चार विभाग येतात.
चरख्याची रचना :
चरख्यात एका लाकडी चौकटीवर एका बाजूला सायकलच्या चाकासारखे, पण आकाराने लहान असे एक चक्र बसविलेले असते. हे चक्र हातांनी फिरविता यावे यासाठी त्याला एक मूठ लावलेली असते. दुसऱ्या बाजूला एक चाते (िस्पडल) आडवी (जमिनीला समांतर) बसविलेले असते. चात्याच्या मागील भागावर एक छोटी कप्पी असते. मोठय़ा चाकावरून एक अखंड दोरी या कप्पीभोवती नेलेली असते. मोठय़ा चाकाची मूठ फिरवून चाकाला गती दिल्यावर दोरीमुळे कप्पी व अनुषंगाने चाते फिरू लागते.
चरख्याचे चाते टकळीसारखेच काम करते. चात्यावर सुरुवातीला थोडेसे सूत गुंडाळून या सुताला पेळूतील तंतू जोडले जातात. पेळू हळूहळू चात्याच्या दिशेतच चात्यापासून दूर नेला जातो अशी सूतनिर्मिती सुरू होते. यावेळी चाकाच्या साहाय्याने चाते फिरवून तयार होणाऱ्या सुताला पीळ दिला जातो. डाव्या हातात पेळू धरून तो मागे नेला जातो व उजव्या हाताने चाक फिरविले जाते. डावा हात पूर्णपणे मागे गेल्यावर, डाव्या हातापासून चात्यापर्यंत लांबीचे सूत तयार होते. नंतर डावा हात पुढे नेऊन तो चात्याला काटकोनात धरला जातो व चाते फिरविले जाते. या वेळी तयार झालेले सूत चात्यावर गुंडाळले जाते. हीच क्रिया वारंवार करून मोठय़ा लांबीच्या सुताची निर्मिती करता येते. चरखा हा मूलभूत सूतनिर्मितीचा उद्गाता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा