मायकेल फेरेडेने असे निरीक्षण केले की, गुट्टा पर्चा चीक(मलाया द्विपकल्पामधील पर्चा नावाच्या झाडापासून मिळणारे चीक/रबर) उत्तम विद्युतरोधक असतो व त्यावर पाण्याचा अजिबात परिणाम होत नाही. या गुणधर्मामुळे ट्रान्स अटलांटिक केबलवर पर्चाच्या झाडाच्या चिकाचे आवरण दिले गेले. आजही हे आवरण समुद्राच्या पाण्यातून जाणाऱ्या केबलवर देतात. पर्चा झाडाचा चीक हा एक प्लास्टिकसदृश पदार्थ होता.
१८६२ साली अलेक्झांडर पार्कस् याने लंडनमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सेल्युलोज नायट्रेट व कापूर मिसळून पहिले कृत्रिम प्लास्टिक बनवले. त्यापासून त्याने चाकू, सुऱ्यांच्या मुठी, गुंडय़ा, बटणे, कंगवे, टाक, पेन्सिलीची टोपणे वगरे वस्तू बनवल्या. या प्लास्टिकला त्याने ‘पार्क साइन’ असे नाव दिले.
१८९७ साली डब्ल्यू क्रिशे याने दुधाच्या प्रोटीनपासून प्लास्टिक बनवले. त्याला ‘केसिन प्लास्टिक’ म्हणत. त्यापासून त्याने सुऱ्यांच्या मुठी, छत्र्यांचे दांडे बटणे, कंगवे इत्यादी वस्तू बनवल्या. आणि या वस्तू ज्वलनशीलही नव्हत्या. अॅडोल्फ स्पिटलर याला असे आढळून आले की केसिन प्लास्टिकपासून बनवलेले तक्ते फॉर्मल्डिहाइडच्या द्रावात बुचकळले तर त्यावर पाण्याचा अजिबात परिणाम होत नाही. या केसिन प्लास्टिकचा उपयोग केसिन अॅडेसिव्ह बनवण्यासाठी करता येऊ लागला.
अॅडोल्फ बायरचे संशोधन पुढे बेकलंड या शास्त्रज्ञाने चालू ठेवले व फिनोल आणि फॉर्मल्डिहाइड रेझिन्स बनवली. त्यांना पुढे बेकलाइट असे म्हटले गेले. १९२४ साली स्टाउडिंगरने प्लास्टिक व रबर ही लांब साखळी असलेल्या रेणूंपासून बनलेली असतात, असे सिद्ध केले. स्टाउडिंगरला पुढे रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला.
१९२७ साली पीव्हीसी आणि सेल्युलोज अॅसिटेट, तर १९२८ साली अॅक्रिलिकचा शोध लागला. अॅक्रिलिकचा वापर लढाऊ विमानांच्या खिडक्यांच्या काचा, वैमानिकाच्या बठकीवरील छत (कोकपीट) बनवण्यासाठी करतात. कारण अॅक्रिलिक काचेपेक्षाही पारदर्शक असते. १९२९ साली युरिया फोर्मल्डिहाइड व १९३० साली पॉलिस्टायरीनचे उत्पादन सुरू झाले. डय़ू पोण्ट कंपनीतील शास्त्रज्ञांनी नायलॉन ६६ या प्लास्टिकच्या धाग्याचा शोध लावला. १९३६ साली पॉलिक्रिलोनायट्रील स्टायरीन, अॅक्रिलोनायट्रील व पॉलिव्हिनल अॅसिटेट यांचा उगम झाला. तर १९५२ साली झिग्लरने पॉलिथिलीनचा शोध लावला.
प्रबोधन पर्व: आचार्य शं. द. जावडेकर – आधुनिक तत्त्वज्ञ
महाराष्ट्राची तरुण पिढी १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी वैचारिकदृष्टय़ा घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं. द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व समाजवादी नेते, कार्यकत्रे, त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले. दैनिक लोकशक्तीचे संपादक, साधना साप्ताहिकाचे संपादक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच जावडेकर यांनी ‘आधुनिक भारत’, ‘लोकशाही’, ‘गांधीवाद’, ‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी’, ‘गांधीवाद’, ‘समाजवाद’, ‘जवाहरलाल नेहरू’, ‘िहदू -मुसलमान ऐक्य’ अशी विविध महत्त्वपूर्ण पुस्तकेही लिहिली. ‘आधुनिक भारत’ या पुस्तकात जावडेकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाची अतिशय मूलगामी चिकित्सा केली आहे. त्यामुळे मराठीतील तत्त्वज्ञ कादंबरीकार वामन मल्हार जोशी यांनी ‘गीतारहस्यानंतरचा थोर ग्रंथ’ असे त्याचे वर्णन केले आहे. जावडेकर हे आगरकर, टिळक आणि गांधी या तिघांनाही गुरू मानत. (त्यात पुढे मार्क्सची भर पडली.) या सर्व द्रष्टय़ा नेत्यांचे विचार कोणत्याही प्रकारचे किल्मिष येऊ न देता, त्यातील देशाला व समाजाला उपयुक्त व अनुकरणीय असेल असा भाग जावडेकर यांनी साक्षेपाने महाराष्ट्रीय जनतेसमोर मांडण्याचे काम केले, त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले. त्यामुळे तत्कालीन महाराष्ट्रातील बुद्धिवंत त्यांच्या लेखनाकडे आकर्षति झाले. जावडेकर यांचे संपूर्ण जीवन हे ‘बोले तसा चाले’ या वृत्तीचा आविष्कार होते. नतिक मूल्यांवर हुकमत, शुद्ध आचरण आणि स्फटिकवत चारित्र्य यामुळे जावडेकर यांचा त्यांच्या विरोधकांनाही दरारा वाटत असे.
जावडेकर गांधीवादी अिहसेचे कट्टर पुरस्कत्रे होते. जावडेकर यांचे जीवन आणि विचार आजही आदर्शवत ठरावेत असे आहेत.
मनमोराचा पिसारा: पत्रास कारण की..
पत्रास कारण की पत्र लिहिण्यास काही विशेष कारण नाही; हेच. कारण नसणं, हेच कारण आहे. कारणाशिवाय काहीतरी करावंसं वाटतंय. हे कारण पुरेसं नाही का? म्हणून हा पत्रप्रपंच. हा शब्दांचा खेळ खेळल्यावर वाटतंय की काही कारण नाही, हे संपूर्ण खरं नाहीय. मी स्वत:शी संवाद करून काय हासिल करतो? कोणतं उद्दिष्ट साध्य करायचं असतं? मला स्वत:ला काहीतरी सांगायचंय!! स्वत:शी बोलून माझ्या विचारांना क्लॅरिटी येते. माझे विचार मलाच अधिक स्पष्ट होतात.
म्हणून खरं म्हणजे अगदी खासगी वाटावेत असे विचार व्यक्त करायला सरसावलोय. आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाशी संवाद काय हरकत आहे? जसे सुचतील, तसे मांडतो, बस इतकंच.
स्वत:बद्दल काय वाटतं ह्य़ाचा मी पब्लिक डिस्प्ले करतो. चारचौघात मी अस्सा आहे, तस्सा आहे किंवा अमुक तमुक नाहीये अशा फुशारक्या मारतो. फुशारक्या मारून आपली छाप पाडायचा प्रयत्न करतो. मी जसा नाही किंवा थोडासा आहे, त्यापेक्षा खूप जास्त आहे, असं भासवतो, म्हणजे मी मनमोकळा आहे, माझं आत-बाहेर असलं काही नाही, असं ठासून सांगतो, तेव्हा दाखवतो तितका पारदर्शी नसतो. माझ्या व्यक्तिमत्त्वाचं अधिक उजळ चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करतो आणि मी जेव्हा म्हणतो की मी जरा विसरभोळा आहे, तेव्हा खूपच गोष्टी बेजबाबदारपणे विसरतो. ‘आपण बुवा किती दिलदार’ असं म्हणून स्वत:ची बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो. आपल्या स्वभावातल्या त्रुटींची जाहीर कबुली देऊन समोरच्या व्यक्तीकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्या सहानुभूतीच्या जोरावर अधिक विसराळूपणानं वागण्याचा डिस्काऊंट मिळवतो.
सवय लागलीय असं वागण्याची. काहीसं दुटप्पी म्हणायला हवं. दाखवायचं एक आणि असतं भलतंच! वेल, भलतं नाही, असायचं दुसरंच.
सोडायची आहे का मला ही सवय? तोंडानं म्हणतो, ‘म्हणजे काय? प्रश्नच नाही.’ पण स्वत:ला लिहिलेल्या पत्रात एक खासगी कन्फेशन करतो.
दुटप्पीपणे वागण्याचे फायदे खूप आहेत. हवं तसं वागायचं आणि मग जीभ चावल्यासारखं करून सॉरी म्हणायचं! मग पुन्हा हवं तसं वागायला मोकळा!! या वागण्यात खूप कम्फर्ट आहे. वर्क्स बोथ वेज ना!
सवय न सुटण्याचं कारण, ती सोडायचीच नव्हती. सवय सोडायचीय, असं फक्त म्हणायचं होतं. वेल, ही लबाडी झाली माझ्या मनाची.
खूप झालं हे विश्लेषण. मला या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचंय. खरंच. ही मखलाशी नाही. असे खूप कम्फर्ट झोन तयार केलेत मी. काही मित्र, या कम्फर्ट झोनला ‘सिक्युअर’ झोन म्हणतात. त्यांना असुरक्षित वाटणं सहन करता येत नाही म्हणून ते सुरक्षित वाटून घेण्यासाठी कशाला तरी घट्ट पकडून ठेवतात. कधी रिलेशनशिप तर कधी सिक्युअर नोकरी. कधी मारकुटा नवरा तर कधी कजाग बायको! माझा कम्फर्ट झोन कसला आहे? कोणत्या सुखसुविधांना मी कवटाळतोय?
कळत नाहीये! कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचंय हे नक्की.. फ्रँकली बोललो तर नक्की कळेल.. बोलीन तुझ्याशी अधूनमधून.
तुझा.. ‘मी.’
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com