पॉलिस्टर तंतूंचा मुख्य दोष म्हणजे त्यांची अत्यंत कमी असलेली बाष्पग्रहणक्षमता. कमी बाष्पग्रहणक्षमतेमुळे या तंतूंवर स्थितिक विद्युत निर्माण होते. हा दोष काही प्रमाणात तरी कमी करण्याच्या उद्देशाने पोकळ तंतूंच्या निर्मितीला आरंभ झाला. नेहमीच्या पॉलिस्टर तंतूंप्रमाणे पोकळ तंतूंचे उत्पादनसुद्धा वितळ कताई पद्धतीनेच केले जाते. फक्त पोकळ तंतूंच्या कताईसाठी तनित्राच्या रचनेत काही बदल केले जातात. या बदलांमुळे तनित्रातून बाहेर येणारा तंतू पोकळ बनतो. या छिद्राचा आकार कमी किंवा जास्त करून तंतूंचा पोकळपणा कमी किंवा जास्त करता येतो.
पॉलिस्टर तंतूंमध्ये मुद्दाम निर्माण केलेल्या या पोकळीमुळे या तंतूंचे गुणधर्म नेहमीच्या पॉलिस्टर तंतूंपेक्षा खूपच वेगळे असतात. समान डेनिअर असलेल्या सामान्य तंतूपेक्षा पोकळ तंतूचा व्यास जास्त असतो त्यामुळे पोकळ तंतूत अधिक पृष्ठभाग उपलब्ध होतो. पोकळ तंतू अधिक फुगीर असतो. पोकळ तंतूची उष्णतारोधकता अधिक चांगली असते. पोकळ तंतू अधिक रंग शोषून घेतात. पोकळ तंतूमधील पोकळीमुळे या तंतूंमध्ये केशाकर्षणाची प्रक्रिया होते व या गुणधर्माचा उपयोग करून पोकळ तंतूंपासून द्रवपदार्थ शोषून घेणारे कपडे बनविले जातात. आतील बाजूस असलेल्या पोकळीमुळे पोकळ तंतूंची स्थितिस्थापकता चांगली असते. या तंतूंवर दाब दिल्यास ते सहज दाबले जातात परंतु दाब काढल्यास िस्प्रगप्रमाणे उसळी घेऊन पुन्हा पूर्वस्थितीला येतात.
पोकळ तंतू प्रामुख्याने आखूड स्वरूपात बनविले जातात. त्यामुळे सूत कताईची प्रक्रिया वापरून या तंतूंपासून सूत तयार करावे लागते. सर्वसामान्यपणे कापसाच्या किंवा लोकरीच्या कताईसाठी जी यंत्रसामग्री वापरली जाते ती वापरून पॉलिस्टरच्या पोकळ तंतूंची कताई करता येते. पोकळ तंतूंच्या विशिष्ट गुणधर्मामुळे या तंतूंचा वापरही काही विशिष्ट कारणासाठी केला जातो. थंडीमध्ये घालावयाच्या स्वेटर, जाकीट अशा कपडय़ांमध्ये पोकळ तंतू वापरले जातात. या तंतूंमध्ये केशाकर्षण क्षमता असल्याने ज्याठिकाणी द्रव शोषून घेण्याचे कार्य करावे लागते अशा कापडांमध्ये पोकळ तंतू वापरले जातात. उदा. लहान मुलांचे डायपर्स, स्त्रियांचे सॅनिटरी नॅपकिन्स आणि वैद्यकीय क्षेत्रात उपयोगात येणारे कापड. उष्णतारोधक कापड तयार करण्यासाठीही या तंतूंचा उपयोग केला जातो. उच्च दर्जाच्या गालिच्यांमध्ये पोकळ तंतूंचा आवर्जून उपयोग केला जातो. पोकळ तंतूंचा सर्वात जास्त वापर उशांमध्ये भरण तंतू म्हणून केला जातो.
पोकळ पॉलिस्टर तंतू
पॉलिस्टर तंतूंचा मुख्य दोष म्हणजे त्यांची अत्यंत कमी असलेली बाष्पग्रहणक्षमता. कमी बाष्पग्रहणक्षमतेमुळे या तंतूंवर स्थितिक विद्युत निर्माण होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-05-2015 at 12:07 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity hollow polyester fabric