१९व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत कार्बनचा समावेश असलेले रासायनिक पदार्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळवले जात असत. त्यामुळे अशा रासायनिक पदार्थाना ‘सेंद्रिय पदार्थ’ असं संबोधलं गेलं. तर खानिजांपासून मिळणाऱ्या रासायनिक पदार्थाना ‘असेंद्रिय पदार्थ’ म्हटलं गेलं. त्या काळी अशी एक ठाम समजूत होती की सजीवांच्या शरीरात घडत असलेल्या रासायनिक अभिक्रियांमधून जे पदार्थ तयार होतात ते कृत्रिमरीत्या एखाद्या प्रयोगशाळेत तयार करणे अशक्य आहे. अर्थात, असा समज असण्यामागे आणखी एक चुकीचा समज त्या वेळी दृढ होता आणि तो म्हणजे, सजीवांमध्ये जी ‘जैविक प्रेरणा’ (लाइफ फोर्स) असते, त्यामुळेच हे रासायनिक पदार्थ तयार होऊ शकतात. थोडक्यात, त्या वेळी असं समजलं जायचं की, कार्बनी पदार्थ हे केवळ सजीवांच्याच शरीरात तयार होऊ शकतात. सहाजिकच आमिनो आम्ल, ग्लुकोज, इन्शुलिन, वेगवेगळी इतर विकरे असे सजीवांच्या शरीरात तयार होणारे रासायनिक पदार्थ प्रयोगशाळेत तयार करण्याचा कुणी प्रयत्नसुद्धा केला नाही.
पण १८२८ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांना दुसरं रसायन तयार करताना योगायोगानं युरिया प्रयोगशाळेत तयार करण्यात यश आलं. वोहलर यांचं हे संशोधन क्रांतिकारी ठरलं कारण, युरियाच्या प्रयोगशाळेतील निमिर्तीनंतर जे रासायनिक पदार्थ फक्त सजीवांच्या शरीरातच बनतात असा समज होता असे असंख्य सेंद्रिय रासायनिक पदार्थ प्रयोगशाळेत तयार करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवलं. युरियाच्या निमिर्तीने मानवाला एक नवी दृष्टी दिली, नवा विचार दिला आणि रसायनशास्त्रात ‘सेंद्रिय रसायनशास्त्र’ या शाखेचा जन्म झाला.
आज घडीला दुसऱ्या कुठल्याही सेंद्रिय रसायनांच्या तुलनेत युरियाचं उत्पादन मोठय़ा प्रमाणावर केलं जातं. युरियात नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे युरियाचा खत म्हणून सर्वाधिक वापर केला जातो. रसायनिक कारखान्यांमध्ये आणि स्फोटकांच्या निर्मितीतही युरियाचा वापर केला जातो. वैद्यकशास्त्रात त्वचारोगांवरील उपचारासाठी युरियाचा वापर केला जातो. संशोधन प्रयोगशाळेत प्रथिनांची द्रावणीयता वाढवण्यासाठीही युरिया वापरतात.  

मनमोराचा पिसारा: गाडीवाले गाडी धीरे हाक रे..
दु:ख बोलू लागलं की बोलकं होतं. वेदनेला आवाज फुटला की ती व्यक्त होते. कधी दु:ख बडबडू लागतं, वाचाळ होतं आणि त्यातल्या संतापाचा सूर तापू लागतो. वेदना आक्रंदने, आक्रोश करते, आक्रमक होते, विद्रोह करते. त्यामानाने सुखाचा निसटता हुंकार असतो, स्मितरेषेतून आपल्या नकळत व्यक्त होते.
म्हणूनच, आनंदाची जल्लोषपूर्ण गाणी काळजाचा ठाव घेत नाहीत, आवडतात पण जिव्हारी लागत नाहीत.
काही आनंदी, उत्सवी गाण्यातून माळ जीवनातल्या जोशपूर्ण अनुभवातले क्षण मनाला भावतात.
मदर इंडियामधील गाडीवाले गाडी धीरे हाकरे हे त्यातलं लोकप्रिय आणि आवडतं गाणं.
गाण्याचा बाज त्या काळातल्या फिल्मी ढंगाचा. बुजरा प्रणय, चोरटी नजर, घुंघटात छुपलेला गोरीचा चेहरा म्हणजे थेट नॉस्टाल्जिआ.
गाण्याच्या सिच्युएशनमध्ये गावाकडचं उत्सवी आणि उत्साही भारलेलं वातावरण आहे.
बैलगाडय़ा आणि त्यांना जोडलेल्या खिल्लारी बैलांच्या जोडय़ा. गाडय़ांचं शाकारणंही तसं जेमतेमच. पण लाल चुनरिया, पीली पगरिया आणि चुस्त नारिया बघून आपण त्या मंडळींबरोबर खाडखुटकरत्या गाडय़ात भरधाव पळू लागतो.
सुनील दत्तच्या एरवीच्या गुलजार चेहऱ्यावरील काळपटपणामुळे तेव्हा इंडस्ट्रीला पहिला अँग्रीमॅन मिळाला. इतर बैलगाडय़ातली मंडळी तशी निनावी पण जवान मस्तवाल पोरं आणि नाजूक तरीही ठणठणीत बांध्याच्या पोरी गाण्याबरोबर अशा उधळतात की बैलगाडय़ांना काय म्हणावं?
गाण्यात मस्ती आहे, जवान मदहोशी आहे, उल्हास आहे, पण त्यामध्ये नर-नारीमधली छेडछाड मनाला भुरळ पाडते.
शमशाद बेगमचा आवाज म्हणजे धारदार मिठी छुरी आणि रफीसाहेबांच्या स्वरातलं लाघवी आर्जवर यांची जुगलबंदी आहे.
या गाण्यात नुसता आनंद आणि जल्लोष नाहीये. यात जीवनानं उधळलेल्या रंगात मश्गुल होण्याची नशा आहे.
गाण्यामधले शृंगाराचं वर्णन ऐकूण गंमत वाटतं, नथनी हले, डुले, बिंदिया मोरी गिर गिर जाए.
‘मोरी लाल चुनरिया उड गयी रे’ हे तर नेहमीचं आहे, पण ती पुढे म्हणते ‘मोरी गजरे की डबिया गयी रे!!’
गाण्याचा हा बाज मोठा मजेशीर आहे. देहाती जीवनातले चढउतार, आनंदोत्सवाचे क्षण आणि अर्थात शर्यती!
‘शर्यती’ आणि एकमेकांवर वरचढ करावीशी वाटणं, या नैसर्गिक ऊर्मीचं अतिशय खेळकर स्वरूप गाण्यात अनुभवल्या मिळतं पुढे अशाच शर्यतीमधून, वितुष्ट आक्रमकपणा आणि विध्वंसाची वाटचाल सुरू होते. दिग्दर्शकात खुबीने जीवनातला विरोधाभास मांडलेला आहे. नौशादजींच्या संगीतामध्ये विलक्षण नाटय़मयता असते, विशेषकरून गाण्याचा शेवट उत्कंठावर्धक होऊन अचानक थांबतो, त्याचा इथे हृद्य प्रत्यय येतो.
sam05
चित्रपट मदर इंडिया/ स्वर शमशाद बेगम, रफी
संगीत नौशाद, गीत शकील बदायुनी
पडद्यावर  नर्गिस, राजकुमार

डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: समाज-चित्ताची अन्वेषण पद्धत
‘‘आज विज्ञानवाद हे चैतन्यवादाचेच एक रूप ठरते. म्हणून तो टाकून बुद्धाचा बाह्य़ार्थवादी अनित्यवाद गुणात्मक, प्रमाणशास्त्रीय रीत्या पुढे नेणारा सौत्रान्तिकवादच स्वीकारला पाहिजे.. प्रमाणशास्त्राशिवाय समाजवादउभारणी करणारा नवमानव तयार होणार नाही. बुद्ध सांगत असे, की वस्त्रावर रंग चांगला चढावा म्हणून त्याला आधी स्वच्छ धुवावे लागते, तसे चित्त सुसंस्कारित करण्यासाठी ते स्वच्छ करावे लागते. माणसाकडून गुणात्मकरीत्या नवी कृती घडवण्यासाठी.. संबंधित जुने संस्कार हटवून, स्वच्छ करून, नवे संस्कार चढवावे लागतात. जुन्या संस्कारांतील जाणीव ‘दिसते’, म्हणून ती स्वच्छ केली जाऊ शकते. मन मग यांत्रिक कृतीची आज्ञा कर्मेन्द्रियांना करते. पण मन बदललेले नसते. नेणीव बदलण्यातूनच मन बदलते. याला दार्शनिकदृष्टय़ा पटवणे म्हणतात. म्हणून दार्शनिक उपायांनीच माणूस बदलू शकतो, नवा होत जातो. क्लोनिंग ‘नव्या’ माणसाला जन्म देऊ शकते, पण असा ‘नवा’ माणूस तयार करू शकत नाही. म्हणून नवा माणूस तयार करायचे काम योगिनी व सिद्धांनी बनलेल्या नव्या क्रांतिकारी पक्षाला करावे लागेल. तांत्रिकी श्रुती अशाप्रकारे आधुनिक समाजवादउभारणीसाठी अपरिहार्य सिद्ध होते.’’कॉ. शरद् पाटील ‘जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती’ (खंड ३, नोव्हेंबर २००३) या पुस्तकातील ‘समाजवादी क्रांती व समाजवाद उभारणी’ या प्रकरणात मार्क्‍सवादाची चिकित्सा करताना लिहितात – ‘‘पण हे चित्ताचे डिसेक्शन (शवसाधना) झाले. चित्ताची जाणीवनेणीव ऐतिहासिकरीत्या तयार होत असते. या ऐतिहासिक बनावटीचा ठाव अन्वेषणपद्धतीनेच घेतला जाऊ शकतो. दिग्नाग स्कूलने प्रमाणशास्त्र दिले, अन्वेषणपद्धत दिली नाही. ती दिली मार्क्‍सने. ती गत व वर्तमान समाजांचे अभ्यासातून आकलन करायची पद्धत आहे, साधन आहे, रेडीमेड आकलन नाही. पारंपरिक कम्युनिस्टांनी तिला रेडीमेड आकलन करून टाकले आहे. त्यामुळे ते वर्गवादी, एकप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादाला श्रद्धेने घट्ट धरून बसले आहेत. वर्गपूर्व, वर्गेतर व वगरेतर समाजांना हीच अन्वेषणपद्धत रामबाण लागू पडते असा त्यांचा हट्ट आहे.’’

Story img Loader