१९व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत कार्बनचा समावेश असलेले रासायनिक पदार्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळवले जात असत. त्यामुळे अशा रासायनिक पदार्थाना ‘सेंद्रिय पदार्थ’ असं संबोधलं गेलं. तर खानिजांपासून मिळणाऱ्या रासायनिक पदार्थाना ‘असेंद्रिय पदार्थ’ म्हटलं गेलं. त्या काळी अशी एक ठाम समजूत होती की सजीवांच्या शरीरात घडत असलेल्या रासायनिक अभिक्रियांमधून जे पदार्थ तयार होतात ते कृत्रिमरीत्या एखाद्या प्रयोगशाळेत तयार करणे अशक्य आहे. अर्थात, असा समज असण्यामागे आणखी एक चुकीचा समज त्या वेळी दृढ होता आणि तो म्हणजे, सजीवांमध्ये जी ‘जैविक प्रेरणा’ (लाइफ फोर्स) असते, त्यामुळेच हे रासायनिक पदार्थ तयार होऊ शकतात. थोडक्यात, त्या वेळी असं समजलं जायचं की, कार्बनी पदार्थ हे केवळ सजीवांच्याच शरीरात तयार होऊ शकतात. सहाजिकच आमिनो आम्ल, ग्लुकोज, इन्शुलिन, वेगवेगळी इतर विकरे असे सजीवांच्या शरीरात तयार होणारे रासायनिक पदार्थ प्रयोगशाळेत तयार करण्याचा कुणी प्रयत्नसुद्धा केला नाही.
पण १८२८ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांना दुसरं रसायन तयार करताना योगायोगानं युरिया प्रयोगशाळेत तयार करण्यात यश आलं. वोहलर यांचं हे संशोधन क्रांतिकारी ठरलं कारण, युरियाच्या प्रयोगशाळेतील निमिर्तीनंतर जे रासायनिक पदार्थ फक्त सजीवांच्या शरीरातच बनतात असा समज होता असे असंख्य सेंद्रिय रासायनिक पदार्थ प्रयोगशाळेत तयार करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवलं. युरियाच्या निमिर्तीने मानवाला एक नवी दृष्टी दिली, नवा विचार दिला आणि रसायनशास्त्रात ‘सेंद्रिय रसायनशास्त्र’ या शाखेचा जन्म झाला.
आज घडीला दुसऱ्या कुठल्याही सेंद्रिय रसायनांच्या तुलनेत युरियाचं उत्पादन मोठय़ा प्रमाणावर केलं जातं. युरियात नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे युरियाचा खत म्हणून सर्वाधिक वापर केला जातो. रसायनिक कारखान्यांमध्ये आणि स्फोटकांच्या निर्मितीतही युरियाचा वापर केला जातो. वैद्यकशास्त्रात त्वचारोगांवरील उपचारासाठी युरियाचा वापर केला जातो. संशोधन प्रयोगशाळेत प्रथिनांची द्रावणीयता वाढवण्यासाठीही युरिया वापरतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा