डॉ. बाळ दत्तात्रय टिळक
डॉ. बाळ दत्तात्रय टिळक (१९१८ – १९९९) हे मुळातले यवतमाळ जिल्हय़ातील कारंजा गावचे. मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून तंत्रज्ञानातील बीएस्सी करून मग इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी प्रा. के. व्यंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केली. नंतर ते इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले व नोबेल पुरस्कार विजेते प्रा. रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात संशोधन केले. त्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.फिल. ही पदवी दिली. इंग्लंडमधून परत येऊन ते १९४६ साली मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ते तेथे १९६६ सालापर्यंत होते. १९६६ साली त्यांना पुण्याला नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक म्हणून बोलावण्यात आले. ते तेथे १९७८पर्यंत म्हणजे त्यांच्या वयाच्या साठीपर्यंत होते.
इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये स्टिरॉइडवर्गीय रंगांच्या रसायनशास्त्रामध्ये त्यांनी मोलाची भर घातली. हेटेरोसायक्लिकस (विषमचक्रिय) संयुंगाचे महत्त्व औद्योगिक रसायनशास्त्रात वाढत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारच्या संयुगांची जडणघडण प्रयोगशाळांमध्ये करून पाहिली. त्यांचे मूलभूत गुणधर्म तपासले आणि सखोल संशोधनही केले. या संशोधनावर आधारित ‘न्यू ट्रेंड्स इन हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी लिहिले. सल्फरशी (गंधक) संबंधित असलेल्या एका रासायनिक प्रक्रियेला टिळक प्रक्रिया (ळ्र’ं‘ फीूं३्रल्ल) असे नाव आहे. कृषी उद्योगांमध्ये कीटकनाशकांचे महत्त्व उत्पादकता वाढवण्यासाठी असते हे लक्षात घेऊन त्यांनी त्यासंबंधी संशोधन सुरू केले.
वैज्ञानिक संशोधन व विकासाच्या क्षेत्रातील अनेक करार करण्यासाठी गेलेल्या परदेशी पथकांचे त्यांनी नेतृत्व केले आहे. देशी-परदेशी नियतकालिकांतून त्यांचे एकूण २०० निबंध प्रसिद्ध झाले आहेत.
प्रबोधन पर्व: महाराष्ट्राची सरस्वती इंद्रायणीच
ज्ञानोबाच्या आळंदीने ज्ञानाचा पाया रचला आणि तुकोबाच्या देहूने भक्तीचा कळस चढविला.. ‘ग्यानबा-तुकाराम’ हा एक प्रकारचा मध्यमपदलोपी समास आहे. म्हणजे ह्य़ात भागवत-धर्माच्या सर्व साधुसंतांचा समावेश आहे. थोडक्यात दोघांचा उच्चार केला आहे. ज्ञानोबा आचार्य आणि तुकोबा प्रचारक. तुकाराम महाराजांचे अभंग महारापोरांच्या तोंडीं बसून गेले आहेत. महाराष्ट्रात ज्ञानाचा सार्वत्रिक प्रसार तुकोबांइतका कोणीच केला नाही. ज्ञानोबांनी ज्ञानाचें भांडार भरून ठेवलें. तुकोबांनी हमाली पत्करून तें ‘भांडार फोडलें’ आणि ‘धन्याचा माल’ गरीबगुरिबापर्यंत पोंचविला. म्हणून महाराष्ट्रातली जनता कृतज्ञतापूर्वक ह्य़ा दोघांच्या नांवाचा जयजयकार करीत असते.’’ महाराष्ट्रातील संतपरंपरेची थोरवी सांगत आचार्य विनोबा भावे इंद्रायणी नदीविषयी लिहिताना मोठे मार्मिक निरीक्षण मांडतात. ते लिहितात –
‘‘ ‘ग्यानबा-तुकाराम’ हा मध्यमपदलोपी समास असून ह्य़ात इतर साधुसंत समजून घ्यावयाचे हें तर खरेंच. पण ह्य़ाच दोघांचा उच्चार करण्यात हेतु आहे. सत्पुरुषांची सार्वराष्ट्रीय परिषद भरविण्याचें ठरलें तर महाराष्ट्राची बाजू मांडण्याकरिता ह्य़ाच दोघांना पाठवावें लागेल. महाराष्ट्राची बाजू उत्तम राखतील अशी खात्री असल्यामुळे महाराष्ट्रीय जनतेकडून ह्य़ांनाच निवडण्यात आलें आहे. इंद्रायणी ही महाराष्ट्राची सरस्वती आहे. कारण हिच्या कांठावर सारस्वताचे हे दोन अप्रतिम बगीचे तयार झाले असून त्यातील ‘फुलां-फळां-छायेचा’ आनंद सर्व महाराष्ट्रास सतत लुटावयास सांपडत आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली गोदावरीच्या तीरीं, तथापि ज्ञानोबांची समाधि इंद्रायणीच्या कांठावर असल्यामुळे ज्ञानोबांवर हक्क इंद्रायणीचाच समजला पाहिजे. संतांचा सारा ‘अट्टाहास’ ‘‘शेवटचा दीस गोड व्हावा’’ म्हणून असतो. त्यामुळे संतांची मृत्युतिथि हीच पुण्यतिथि होय. संतांची मृत्युतिथि, तशीच त्यांची मृत्युभूमि महत्त्वाची असते. अवताराची जन्मभूमि, वीरपुरुषाची कर्मभूमि आणि संतांची मृत्युभूमि पवित्र मानलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वरी जरी साक्षात इंद्रायणीच्या कांठीं लिहिली नसली तरी तिचें फळ इंद्रायणीलाच मिळणारें आहे. म्हणून महाराष्ट्राची सरस्वती इंद्रायणीच.’’
मनमोराचा पिसारा: आर्चरची गोष्ट
‘कादंबरी’ या वाङ्मय प्रकारात निरनिराळ्या ऋतुमानातल्या कवडशांचे रंग व आकार आणि जीवनातली आणखी काही रहस्यं सापडतात, तर कथेमध्ये लेखकाचा प्रत्यक्ष अथवा कल्पित अनुभव थोडक्यात मांडला जातो. सुरुवात, मध्य आणि शेवट अशा तीन भागांत कलाप्रकार विभागला जातो. कथेमध्ये या तीन गोष्टी लेखक कौशल्याने हाताळतो आणि वाचकाला खिळवून ठेवतो.
मराठीचे कथाविश्व समृद्ध होण्यापूर्वी जागतिक पातळीवरील कथेनं आपले पंख विस्तारलेले होते. युरोप, अमेरिकेतल्या कथा प्रसिद्ध होत्या, पण मुख्यत: इंग्लिश कथाकारांनी भारतीयांना गुंतवून ठेवलं. त्यापैकी सॉमरसेट मॉम हे अव्वल आणि सत्तरीनंतर उदयाला आलेले. त्यानंतर झपाटय़ानं लोकप्रिय झालेले कथाकादंबरीकार म्हणजे जेफ्री आर्चर. ते मुळात गोष्टीवेल्हाळ, त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यामध्येदेखील कथेचा फॉर्म विस्तारलेला वाटतो. ‘फर्स्ट अमंगस्ट इक्वल’, ‘केन अॅण्ड अेबल’, ‘अॅज द क्रो फ्लाइज’, ‘शॉल वी टेल द प्रेसिडेंट’ अशा अत्यंत वेधक कादंबऱ्यांमध्ये आर्चर वाचकावर विलक्षण मोहिनी घालतात. त्यांच्या कथावस्तूमधलं नाटय़ जरा बॉलीवूडछाप असल्याचा भास होतो (‘केन अॅण्ड अेबल’मधले बिछडे भाई, ‘दिवार’मधील ७८६ या बिल्ल्यासारखं मेडल!).
मुळात आर्चर यांना वैश्विक अवकाश आणि कथेतील पात्रांचा नातेसंबंधांतील अवकाश आणि अंतर्मनातील द्वंद्व यांचा सुरेख मेळ घालता येतो. त्यामुळे अतिश्रीमंत, राजकारणी, सत्ताधीश याप्रमाणे सर्वसामान्य मध्यमवर्गीयामधले इन्शुरन्स विक्रेते, बँकेतले कारकून, कामगार, कैदी अशा लोकांच्या गोष्टींशी वाचक सहज एकरूप होतो. त्यांना स्थल, काल, देश, वंश यांच्या मर्यादा राहत नाहीत.
जेफ्री आर्चर यांनी ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज’ या कथासंग्रहात कथेच्या ‘सुरुवात-मध्य-शेवट’ या फॉर्मची मस्त मोडतोड केली आहे.
नावाप्रमाणे या कथांमध्ये गुंगारा देणारं रंजक रहस्य आहे, पण त्या रूढार्थानं रहस्यकथा नाहीत तर माणसांच्या गोष्टी आहेत. जीवनामध्ये सरळसोटपणा नसतो, प्रत्येक क्षणात अनन्वित शक्यता असतात. त्या तशा अतक्र्यही नसतात, त्यांची अटकळ बांधता येते. तरीही त्या कथेमधलं ते विशिष्ट वळण आलं की गोष्ट अचानक मार्ग बदलते. शेवट अनपेक्षित वाटला त्याचा धक्का बसला तरी ते वळण अशक्य कोटीतलं वाटत नाही. कथेमधल्या पात्राची मानसिकता वाचकाने अचूक हेरली तर कथेचा शेवट काय होईल याचा अंदाज त्याला येतो तरीही आश्चर्य वाटतं. हेच आर्चर यांचं वैशिष्टय़ आणि कौशल्य आहे. याच कथासंग्रहातल्या शेवटच्या कथेची ओळख करून देतो.
कथा ऐन मध्यावर सुरू झाल्यासारखी वाटते. नायक मायकेल याला एका नाटय़गृहात शिरणारी देखणी तरुणी दिसते आणि तो हातातली कामं टाकून गाडी जेमतेम पार्क करून तिच्या मागोमाग नाटय़गृहात शिरतो. सुदैवानं औना (तरुणी)कडे एक एक्स्ट्रा तिकीट असतं. ते हिकमतीनं मिळवून मायकेल थेट तिच्याशेजारी बसतो. जेमतेम ओळख होत असताना नाटक सुरू होतं (तेव्हा त्याला नाटकाचं नाव कळतं.) मध्यंतरात तिला ‘ड्राय मार्टिनी फ्रतो’ पिलवतो. नाटक संपताना किंचित संवाद आणि अखेरीस, आज रात्री तुला वेळ असेल तर ‘वुड यु केअर टु जॉईन मी फॉर डिनर’ असं म्हणतो. इथे कथा संपते पण हा कथेचा मध्य आहे असं मानून आर्चर मायकेल आणि अॅना यांच्या पहिल्या डेटची गोष्ट चार निरनिराळ्या प्रकारे सांगून संपवतो.
अॅनाचा स्वभाव, ती विवाहित, घटस्फोटित, विधवा, खडुस, चलाख, प्रेमळ असू शकतो. मायकेलही काम अर्धवट टाकून आलेला असतो, नि गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क केलेली असते. याची विविध जोडणी करून आर्चर त्या चार नव्या गोष्टीत खिळवून टाकतो, आणि प्रत्येक शेवट शक्यतेच्या सीमारेषेच्या आत राहातो. आर्चरनं कथेमधून केलेला हा प्रयोग अद्वितीय नसला तरी अत्यंत कल्पक आहे. आर्चर वाचायला या पुस्तकापासून सुरुवात करायला काय हरकत आहे? बऱ्याच शक्यता आहेत..
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com