डॉ. बाळ दत्तात्रय टिळक
डॉ. बाळ दत्तात्रय टिळक (१९१८ – १९९९) हे मुळातले यवतमाळ जिल्हय़ातील कारंजा गावचे. मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून तंत्रज्ञानातील बीएस्सी करून मग इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी प्रा. के. व्यंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केली. नंतर ते इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले व नोबेल पुरस्कार विजेते प्रा. रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात संशोधन केले. त्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.फिल. ही पदवी दिली. इंग्लंडमधून परत येऊन ते १९४६ साली मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ते तेथे १९६६ सालापर्यंत होते. १९६६ साली त्यांना पुण्याला नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक म्हणून बोलावण्यात आले. ते तेथे १९७८पर्यंत म्हणजे त्यांच्या वयाच्या साठीपर्यंत होते.
इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये स्टिरॉइडवर्गीय रंगांच्या रसायनशास्त्रामध्ये त्यांनी मोलाची भर घातली. हेटेरोसायक्लिकस (विषमचक्रिय) संयुंगाचे महत्त्व औद्योगिक रसायनशास्त्रात वाढत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारच्या संयुगांची जडणघडण प्रयोगशाळांमध्ये करून पाहिली. त्यांचे मूलभूत गुणधर्म तपासले आणि सखोल संशोधनही केले. या संशोधनावर आधारित ‘न्यू ट्रेंड्स इन हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी लिहिले. सल्फरशी (गंधक) संबंधित असलेल्या एका रासायनिक प्रक्रियेला टिळक प्रक्रिया (ळ्र’ं‘ फीूं३्रल्ल) असे नाव आहे. कृषी उद्योगांमध्ये कीटकनाशकांचे महत्त्व उत्पादकता वाढवण्यासाठी असते हे लक्षात घेऊन त्यांनी त्यासंबंधी संशोधन सुरू केले.
वैज्ञानिक संशोधन व विकासाच्या क्षेत्रातील अनेक करार करण्यासाठी गेलेल्या परदेशी पथकांचे त्यांनी नेतृत्व केले आहे. देशी-परदेशी नियतकालिकांतून त्यांचे एकूण २०० निबंध प्रसिद्ध झाले आहेत.
प्रबोधन पर्व: महाराष्ट्राची सरस्वती इंद्रायणीच
ज्ञानोबाच्या आळंदीने ज्ञानाचा पाया रचला आणि तुकोबाच्या देहूने भक्तीचा कळस चढविला.. ‘ग्यानबा-तुकाराम’ हा एक प्रकारचा मध्यमपदलोपी समास आहे. म्हणजे ह्य़ात भागवत-धर्माच्या सर्व साधुसंतांचा समावेश आहे. थोडक्यात दोघांचा उच्चार केला आहे. ज्ञानोबा आचार्य आणि तुकोबा प्रचारक. तुकाराम महाराजांचे अभंग महारापोरांच्या तोंडीं बसून गेले आहेत. महाराष्ट्रात ज्ञानाचा सार्वत्रिक प्रसार तुकोबांइतका कोणीच केला नाही. ज्ञानोबांनी ज्ञानाचें भांडार भरून ठेवलें. तुकोबांनी हमाली पत्करून तें ‘भांडार फोडलें’ आणि ‘धन्याचा माल’ गरीबगुरिबापर्यंत पोंचविला. म्हणून महाराष्ट्रातली जनता कृतज्ञतापूर्वक ह्य़ा दोघांच्या नांवाचा जयजयकार करीत असते.’’ महाराष्ट्रातील संतपरंपरेची थोरवी सांगत आचार्य विनोबा भावे इंद्रायणी नदीविषयी लिहिताना मोठे मार्मिक निरीक्षण मांडतात. ते लिहितात –
‘‘ ‘ग्यानबा-तुकाराम’ हा मध्यमपदलोपी समास असून ह्य़ात इतर साधुसंत समजून घ्यावयाचे हें तर खरेंच. पण ह्य़ाच दोघांचा उच्चार करण्यात हेतु आहे. सत्पुरुषांची सार्वराष्ट्रीय परिषद भरविण्याचें ठरलें तर महाराष्ट्राची बाजू मांडण्याकरिता ह्य़ाच दोघांना पाठवावें लागेल. महाराष्ट्राची बाजू उत्तम राखतील अशी खात्री असल्यामुळे महाराष्ट्रीय जनतेकडून ह्य़ांनाच निवडण्यात आलें आहे. इंद्रायणी ही महाराष्ट्राची सरस्वती आहे. कारण हिच्या कांठावर सारस्वताचे हे दोन अप्रतिम बगीचे तयार झाले असून त्यातील ‘फुलां-फळां-छायेचा’ आनंद सर्व महाराष्ट्रास सतत लुटावयास सांपडत आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली गोदावरीच्या तीरीं, तथापि ज्ञानोबांची समाधि इंद्रायणीच्या कांठावर असल्यामुळे ज्ञानोबांवर हक्क इंद्रायणीचाच समजला पाहिजे. संतांचा सारा ‘अट्टाहास’ ‘‘शेवटचा दीस गोड व्हावा’’ म्हणून असतो. त्यामुळे संतांची मृत्युतिथि हीच पुण्यतिथि होय. संतांची मृत्युतिथि, तशीच त्यांची मृत्युभूमि महत्त्वाची असते. अवताराची जन्मभूमि, वीरपुरुषाची कर्मभूमि आणि संतांची मृत्युभूमि पवित्र मानलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वरी जरी साक्षात इंद्रायणीच्या कांठीं लिहिली नसली तरी तिचें फळ इंद्रायणीलाच मिळणारें आहे. म्हणून महाराष्ट्राची सरस्वती इंद्रायणीच.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा