डॉक्टर जेव्हा आरोग्याचा विचार करून मीठ न खायचा सल्ला देतात, तेव्हा त्या व्यक्तीला सगळं जेवण बेचव लागतं. स्वत:ची चव खारट असतानासुद्धा दुसऱ्या पदार्थाना चविष्ट करणारं मीठ एक महत्त्वपूर्ण पदार्थ आहे. पण याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात कच्चा माल म्हणून मिठाचा वापर यापेक्षाही अधिक आहे. धुण्याचा सोडा, क्लोरिन, कॉस्टिक सोडा, सोडिअम धातू, सोडिअम सल्फेट, कॅल्शिअम क्लोराइड, सोडिअम नायट्रेट, सोडिअम सल्फाइट, सोडिअम हायपोक्लोरेट इत्यादी रसायनांच्या निर्मितीत मिठाचा वापर केला जातो.
एके काळी हायड्रोक्लोरिक आम्ल करण्यासाठीही मिठाचा कच्चा माल म्हणून वापर होई. पण आता मिठाच्या द्रावणाचं विद्युतविघटन प्रक्रियेनं कॉस्टिक सोडा आणि क्लोरिन ही औद्योगिक रसायनं मोठय़ा प्रमाणावर तयार होऊ लागली असल्यानं, या सहजी उपलब्ध असलेल्या क्लोरिन वायूपासूनच हायड्रोक्लोरिक आम्ल बनवलं जातं. मिठापासून तयार झालेली वा मिठाच्या संस्कारानंतर तयार झालेली रसायनं इतर अनेक रसायनांच्या निर्मितीत वापरली जातात. अमेरिकेसारख्या देशात मिठाच्या उत्पादनाचा फार मोठा जास्त भाग एकटय़ा रासायनिक उद्योगात वापरला जातो. आपल्याकडे हे प्रमाण त्यामानाने कमी आहे. आपल्या मिठाच्या उत्पादनापकी साधारणत: ५० टक्के भागच आपण रासायनिक उद्योगात वापरतो, काही परदेशी निर्यात करतो, तर साधारण ३० टक्के मीठ आपण ‘घरगुती’ कामांसाठी वापरतो.
भारताला लाभलेला मोठा समुद्रकिनारा आणि इथलं उष्ण आणि कोरडं हवामान, यामुळे भारतात तयार होणाऱ्या मिठापकी ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त मीठ समुद्राच्या पाण्यापासून बनतं, उरलेलं देशातल्या अंतर्भागात असलेली खाऱ्या पाण्याची सरोवरं आणि पंजाब, हिमाचल या राज्यातल्या खाणींमधून मिळतं. हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी खाऱ्या पाण्याची जिवंत झरेही आढळली आहेत. या खारट पाण्यापासून केवळ सूर्यप्रकाशाच्या साह्य़ानं भारतात मीठ बनवलं जातं.
मीठ म्हणजे केवळ जेवायच्या ताटात प्रथम वाढायचा पदार्थ नसून त्याचं औद्योगिक अधिराज्य लक्षणीय आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा