तेल हा आपल्या रोजच्या स्वयंपाकातील व आहारातील अविभाज्य भाग आहे. फोडणीसाठी, तळण्यासाठी, पीठ भिजवण्यासाठी, पदार्थाबरोबर खाण्यासाठी अशा विविध कारणांसाठी आपण रोज तेल वापरतो. उत्तम आरोग्यासाठी आहारात पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे यांचा समावेश होतो. यापकी स्निग्ध पदार्थाची गरज तेल, तूप व लोणी यांतून भागते. कोणत्याही स्निग्ध पदार्थाचा एक रेणू हा ग्लिसरॉलच्या एका रेणूला बांधलेल्या तीन मेदाम्लांच्या रेणुंनी युक्त असतो. मेदाम्लाच्या एका रेणूत सोळा ते अठरा कार्बनच्या अणूंची साखळी असते. या साखळीमध्ये हायड्रोजनचे अणू पूर्णपणे बांधलेले असतील तर त्याला संपृक्त मेदाम्ले (Saturated Fatty Acid-SAFA) म्हणतात. कार्बनच्या साखळीत हायड्रोजनची एक जोडी नसेल तर त्या मेदाम्लाला मोनो असंपृक्त मेदाम्ले (Mono Unsaturated Fatty Acid- MUFA) व हायड्रोजनच्या दोन किंवा अधिक जोडय़ा नसतील तर त्या मेदाम्लाला पॉलिअसंपृक्त मेदाम्ले (Poly Unsaturated Fatty Acid-PUFA) असे म्हणतात. या मेदाम्लात हायड्रोजनची जोडी किंवा जोडय़ा नसल्याने रेणूंची बांधणी कमजोर होते म्हणून असे पदार्थ घट्ट न राहता द्रवरूपी बनतात. अशा तेलांमध्ये दाबाखाली हायड्रोजनचा भरणा केला की संपृक्त मेदाम्लांचे प्रमाण वाढते व तेल घट्ट बनते.
अ, क, ड, ई ही जीवनसत्त्वे मेदात विरघळतात व ती सर्व शरीराला मिळतात. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण योग्य राखण्यास मेद हा घटक साहाय्य करतो. कोणताही स्निग्ध पदार्थ हा संपृक्त, मोनो आणि पॉली असंपृक्त मेदाम्लांच्या मिश्रणाने बनलेला असतो. ज्या पदार्थामध्ये संपृक्त मेदाम्लांचे प्रमाण खूप असते असे स्निग्ध पदार्थ घट्ट असतात. लोणी, मार्गारिन, वनस्पती तूप आणि प्राण्यांमधली चरबी ही अशा स्निग्ध पदार्थाची उदाहरणे आहेत. ज्यामध्ये मोनो किंवा पॉली असंपृक्त मेदाम्लांचे प्रमाण जास्त असते असे स्निग्ध पदार्थ द्रव्य स्वरूपात म्हणजे तेल या स्वरूपात असतात. मोनोचे प्रमाण खूप असलेली तेले म्हणजे शेंगदाणा, तीळ, मोहरी, ऑलिव्ह आणि राइस ब्रॅन यांची तेले. पॉलीचे प्रमाण जास्त असलेली तेले म्हणजे करडई, जवस, मका, सोयाबीन, सूर्यफुलाच्या बिया आणि सरकी यांची तेले.
प्रबोधन पर्व: स्वातंत्र्य म्हणजे जोखीम, जबाबदारी
‘‘स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेताना ही गोष्ट अगोदर ओळखली पाहिजे, की आपल्या अुत्कर्षांची व प्रगतीची वाट ज्या ब्रिटिश सत्तेने बंद केली होती ती आता आपल्या मार्गातून दूर झाली आहे.. आपला देश सुखी, समृद्ध व सामथ्र्यवान करण्याची किल्ली आता आपल्याच हाती आली आहे. या संधीचा आपण कसा अुपयोग करणार यावरच आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा खरा लाभ अवलंबून राहील.. या वेळी अेक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे, की निव्वळ स्वातंत्र्याचा माणसाला काडीअितकाही उपयोग नाही! कारण स्वातंत्र्य म्हणजे काही यक्षिणीची कांडी थोडीच आहे, की जी फिरवताच देशाचे क्षणात नंदनवन बनून जाईल?.. स्वातंत्र्याने आपणास बंद असलेला दरवाजा अुघडून दिला; पण आता नव्या युगात पाऊल टाकल्यावर आपण स्वत: जितकी बुद्धी वापरू, घाम गाळू, तेवढीच आपली प्रगती होईल व स्वातंत्र्याचा तितकाच अुपयोग होईल हे विसरता कामा नये.. तरवारीने राज्य मिळाले तरी ते श्रमांनीच टिकवावे लागते.’’
शंकरराव किलरेस्कर (जन्म १८९१-मृत्यू : १९७५) यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी स्वातंत्र्याचा अर्थ आणि आपली जबाबदारी याविषयी व्यक्त केलेले विचार आजही तितकेच समर्पक ठरतात –
‘‘असे श्रम करण्यासाठी आपल्या स्वत:च्या विचारात अगोदर क्रांती केली पाहिजे. पारतंत्र्याच्या काळातील क्षुद्र, कुत्सित व आकुंचित विचारांना यापुढे क्षणभरही आपल्या मनात थारा देता कामा नये. यापुढे अेका नव्या विशाल दृष्टीने आपल्या समाजाकडे व राष्ट्राकडे पाहून वागण्यास आपण शिकले पाहिजे. आपल्या खुळ्या, घाणेरडय़ा व आचरट सवयी टाकून दिल्या नाहीत तर जगाच्या बाजारात आम्हाला कोण विचारील व आमच्या तिरंगी झेंडय़ाचा मुलाहिजा तरी कोण ठेवील? देशातील प्रत्येक व्यक्तिमात्राने आपल्यावरील जबाबदारी ओळखून, आपली पात्रता व कार्यक्षमता त्यासाठी वाढविली पाहिजे. हे काम आपल्या पुढाऱ्यांवर सोपवून चालणार नाही, तर ती जोखीम आपण स्वत:च अुचलली पाहिजे.’’
मनमोराचा पिसारा: वाचून तर पाहा..
महाभारतामधील मयसभेत दुर्योधनाची फजिती कशी झाली, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. दुर्योधन फसला, इतकंच नाही तर मानी द्रौपदीने त्याला ‘आंधळ्याची आंधळी मुलं’ असा टोमणा मारला आणि सूडमालिकेचा प्रवास मागील पानावरून पुढे चालू झाला.
खरं सांगायचं, तर आंधळेपणाची बाधा दुर्योधनालाच झाली असं नाही, तर समस्त मानवजातीलाच बाधलीय असं मानसशास्त्र म्हणतं. व्यासांनी गोष्टीरूपानं जे सांगितलं, त्याचा पडताळा आधुनिक मानसशास्त्र प्रयोगशाळेत घेतं.
मित्रा, इथे तुला तीन चौकटींतला काही मजकूर दिसेल. नो, नो प्लीज, हा चकवा नाहीये. फक्त दिसता क्षणीच वाच. जरा मोठय़ाने तो मजकूर वाच. वाचून झालं की, आणखी कोणाला तरी बोलावून चौकटीतला मजकूर मोठय़ाने वाचायला सांग..हा वाचण्याचा प्रयोग करून झाल्यानंतरच पुढचा लेख वाच..
काही विशेष वाटलं नाही, असंच ना! वाचायला बोलावलेली व्यक्ती कदाचित उगीच टाइमपास करायला मला वेळ नाही असा लूक देऊन पसार होईल. जाऊ दे..
आता काय वाचलंस ते सांगतो. सोपंय. मुळात हे कोडं नाही. एबीसी असं पहिल्या चौकटीत, अॅन अॅप्रोच्ड द बँक आणि तिसऱ्या चौकटीत बारा, तेरा, चौदा असं लिहिलंय. आता अॅन बँकवर पोचल्यावर काय करेल असं वाटतं? एबीसी हे काय? बारा तेरा, चौदा हा अॅनचा अकाऊंट नंबर असावा आणि एबीसी? कदाचित बँकेचं नाव किंवा अकाऊंट नंबरच्या ‘कोड’मधली अक्षरं असावीत! किंवा असंच काही तरी! होय, असंच वाटलं ना!!
यात चूक काय? चूक किंवा बरोबर असा प्रश्न नाहीये. तरी तितकाच अर्थ निष्पन्न झाला का? आता चौकटीतल्या मजकुराकडे नीट पाहा म्हणजे लक्षात येईल की, ‘ए’नंतर ‘बी’ हे अक्षर आणि ‘बारा’नंतरचा ‘तेरा’ आकडा अगदी सारखेच आहेत. (म्हणजे कॉपी पेस्ट आहेत) तरी आधी ‘ए’ अक्षर असल्यानं आणि अखेर ‘सी’ असल्यानं तू मधलं अक्षर ‘बी’ असं वाचलंस, तर ‘बारा’ आणि ‘चौदा’मध्ये त्या ‘बी’ला ‘तेरा’ म्हटलंस.
इतकंच काय, ‘अॅन अॅप्रोच्ड द बँक’ हे वाचून ‘एबीसी’ आणि ‘बारा तेरा चौदा’ ही संख्या एक लाख एकवीस हजार तीनशे चौदा हा अकाऊंट नंबर आहे असं वाटलं. मग ‘एबीसी’ ही कोड अक्षरं आहेत असं म्हणून ते बँकेचं नावबिव असेल असं वाटलं. अशा प्रकारे ‘उडी मारून निष्कर्ष’ काढण्यात काही चुकलंय असं नाही. गंमत अशीच की, हा निष्कर्ष काढून थांबलास. आणखी कोणी तरी असाच अर्थ लावून झाल्यावर ते प्रकरण तू पूर्ण केलस. मित्रा, ‘अॅन’ ही नदी पोहत होती आणि नदीच्या काठावर पोहोचली (बँक) असाही अर्थ होऊ शकतो, पण ज्या अनुक्रमाने मजकुराची मांडणी केली त्यावरून एक विशिष्ट अनुमान काढून थांबलास आणि थांबलास म्हणजेच त्या शब्द मायाजालात अडकलास!
माया, माया म्हणतात, ती हीच बरं!! त्या मायेपलीकडे असतं ते सत्य. आपण चकतो हेच ते सत्य.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com