ही १८६० सुमारातील गोष्ट आहे. त्या वेळी, पेट्रोलियम खनिज तेलाचा शोध नुकताच लागला होता. पण, माणसाला त्याचा फारसा उपयोग नव्हता. तेव्हा युरोपमध्ये लोक प्रकाश मिळविण्यासाठी दिव्यामध्ये व्हेल माशाचे तेल वापरीत. ते खूप खíचक असे. त्याच वेळी खनिजतेलातून केरोसिन म्हणजे घासलेट तेलाचे उत्पादन सुरू झाले. अगदी दुसऱ्या वर्षांपासून त्याची जगात इतरत्र निर्यात सुरू झाली. आपल्या भारत देशात बर्माशेल कंपनीने १९०२ साली हे घासलेट तेल आणले होते. तत्काळी, केरोसिन हे सुरक्षित इंधन व्हावे, यासाठी त्यातील पेट्रोलसारखा पातळ द्रव काढून फेकून देत. आज पेट्रोलमध्ये केरोसिनची भेसळ होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी लागते.
आज सर्वत्र विजेच्या दिव्यांची रोषणाई असली तरी केरोसिन हे इंधन गरिबांच्या गरजेची वस्तू बनून आहे. केरोसिन हे इंधन १२५ अंश सेल्सिअस ते ३०० अंश सेल्सिअस या तापमानादरम्यान उकळते. चांगले केरोसिन दिव्यात किंवा स्टोव्हमध्ये जळताना कमी धूर येत असतो. त्यामुळे, कंदिलाची काच पटकन धुरकट होत नाही. केरोसिनचा वापर स्वयंपाकघरातदेखील होतो. केरोसिन जळताना प्रदूषण होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. यासाठी त्यात गंधकाचे प्रमाण कमीतकमी असावे याची काळजी घेतात. याशिवाय, त्यातील धूर ओकणाऱ्या सेंद्रिय रसायनांचे प्रमाण कमी ठेवावे लागते. या इंधनातील एरोमॅटिक्स वर्गातली हायड्रोकार्बन रसायनांमुळे, ते जळताना धूर येतो खरा, पण ही धूरओकू संयुगे त्यातून संपूर्णतया निपटून काढता येत नाहीत. कारण हीच रसायने जळताना वातीच्या ज्योतीला प्रकाशमान करतात. अर्थातच, जास्त उजेड मिळण्यासाठी काही प्रमाणात या एरोमॅटिक्स रसायनांचे अस्तित्व गरजेचे असते. केरोसिन स्टोव्हमध्ये पंप करताना स्फोट होऊ नये म्हणून त्यात पेट्रोल-नॅफ्थासारखी पातळ इंधने मिसळणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागते. त्यासाठी त्याचा भडका िबदू (फ्लॅश पॉइंट) कमीत कमी ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राखावा लागतो. या एकूण खबरदारीमुळे या इंधनाला ‘सुपिरियर केरोसिन ऑइल’ (एस.के.ओ.) या नावाने संबोधिले जाते.
प्रबोधन पर्व: अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा शिंदे यांनी केलेला अभ्यास
‘‘अस्पृश्यांचे राजकारण किंवा त्याच्यासंबंधी स्पृश्यांचे राजकारण म्हणजे काही नुसती आजकालची धामधूम आहे अशातला मुळीच अर्थ नव्हे. हे राजकारण अस्पृश्यते-इतकेच पुरातन आहे, असे म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती होणार नाही. माझी तर स्वतची अशी खात्री होऊन चुकली आहे की, हिंदूंतील अस्पृश्यता म्हणजे त्यांच्या दूषित राजकारणाचा एक मासला होय.. अस्पृश्यता म्हणजे स्पृश्यांच्या दूषित राजकारणाचे एक दृढमूल झालेले जाळे आहे. अस्पृश्यांमध्ये आता जो हीनपणा आलेला आहे त्यामुळेच अस्पृश्यता उदय पावली, असे म्हणण्याने कार्यकारणांचा विपर्यास हल्लीच्या काळीसुद्धा जाणत्या लोकांकडून होत आहे, ही एक करमणुकीची गोष्ट. समाजशास्त्राचे निरपेक्ष अवलोकन केल्यावर जातीय अस्पृश्यता ही हीनतेचे कार्य (कार्यामुळे) नसून उलट ती दीनतेचे कारण आहे असे दिसून येते.’’
– महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नावरील लेख १९०४ पासून लिहावयास सुरुवात केली आणि त्यातून ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था १९०६ साली स्थापन झाली. सामाजिक प्रश्नाचा अभ्यास कसा करावा, याचा वस्तुपाठ शिंदे यांच्या या लेखांतून दिसतो-
‘‘प्राचीन ग्रामसंस्थेचे दृश्य जितके अद्यापि महाराष्ट्रातील खेडय़ांत स्पष्ट दिसते, त्याहून अधिक स्पष्ट हिंदुस्थानात किंबहुना सर्व जगात कोठे आढळणार नाही.. ग्रामसंस्थेमुळे चार वर्णापैकी समजले जाणाऱ्या सर्व ग्रामस्थांचा योगक्षेम नीट चालून ग्रामबाह्यांच्या मात्र उन्नतीच्या सर्वही वाटा बंद झाल्या आहेत.. परजातिद्वेष हे राजकीय अथवा सामाजिक कारण जितके ह्या अस्पृश्यतेच्या मुळाशी व वाढीशी संबद्ध आहे, त्याहून जास्त स्वकीय वृत्तीचा लोभ आणि परकीयांचा मत्सर हे आर्थिक कारण भारतीय अस्पृश्यतेच्या मुळाशी, विशेषत दक्षिण भारतातील अस्पृश्यतेच्या वाढीशी व दृढतेशी गुंतलेले आहे, असे दिसते. जेथे जेथे उपऱ्या नेत्यांनी तद्देशीयांच्या जमिनी व राज्ये बळकावली आहेत, तेथे तेथे असल्या ग्रामसंस्था ऊर्फ मालकी व बलुत्यांचे विपरीत संबंध निर्माण झाले आहेत’’
मनमोराचा पिसारा: गुरु देवो महेश्वर
लहानपणी शाळेत आणि घरी घोकून घेतलेल्या श्लोकांची आठवण येते नि अस्वस्थ वाटतं. पाढय़ांचं आणि कवितांचं पाठांतर न झाल्याने नि वांडपणा केल्याबद्दल हातावर पडलेल्या छडय़ा आठवतात. शिकवण्याचे कमी मानहानीकारक मार्ग आणि पद्धती शिक्षकांनी वापरल्या असत्या तर शालेय शिक्षणाविषयी इतकी अप्रीती निर्माण झाली नसती.
सुदैवानं स्पिरिच्युअल मार्गदर्शनासाठी भन्ते ओलान्द आनंद भेटले आणि विपश्यनेनं स्वत:ला शोधण्याचा राजरस्ता गाठून दिला. ‘गुरु’वंदनेविषयी कुतूहल आणि आदर वाटू लागला.
अध्यात्मविचारात तर ‘गुरू’ला पर्याय नाही. गुरुमाहात्म्य अगाध आहे याची कबिरांपासून ते श्रीज्ञानेश्वरांपर्यंत सर्वानी ग्वाही दिली आहे. त्या परंपरेतील हा श्लोक –
गुरु: ब्रह्मा, गुरु: विष्णू
गुरु: देवो महेश्वर:
गुरु: साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नम:
महाशिवरात्रीला श्रीमहेश्वरांची हमखास आठवण येते आणि शिवशंकरांना वंदन करावंसं वाटलं तरी मनात भन्ते आनंद यांनी दिलेला प्रश्न घोळू लागला. ‘अनुभव हा गुरू. स्वानुभवानं शिकता येतं, ते ज्ञान आणि नष्ट होते ‘अविज्जा’.
ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीमध्ये ब्रह्मा आणि विष्णू यांचं स्थान मनाला लगेच भावतं. जन्म, लालनपालन आणि विकास यांसाठी कल्पिलेल्या या देवता मनाला आश्वस्तपणा देतात. त्यांच्या प्रतिमांमध्ये आनंदमय प्रसन्नता दृग्गोचर होते. महेश्वर शंकर मात्र रूपाने रौद्र भासतात. विस्मयित करतात. त्यांचं संहारक रूप मनात आपोआप साकार होतं. मग लक्षात आलं की उत्पत्ती, विकास आणि लय अशा या त्रिमूर्ती आहेत. त्यात ‘लया’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे शंकर आपल्या मनातलं अज्ञान नष्ट करतात. अज्ञानाचा आणि अविद्येचा संहार करणं उत्पत्ती आणि विकासाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक.
ते मनाला पटलं आणि पूर्णपणे भावलं, ते नंतर कधी तरी. संगणकशास्त्रातल्या एका विद्वान प्राध्यापकाशी गप्पा मारताना! ते म्हणाले, ‘नव्या काळातली मुलं खूप पटापट शिकतात. त्यांना ज्ञानाप्रमाणे कौशल्याविषयी जिज्ञासा वाटते. म्हणून ती प्रौढ पिढीपेक्षा अधिक तरबेज होतात.’ मग थबकून म्हणाले : ‘प्रश्न फक्त नवं शिकण्याचा नसतो. प्रौढ पिढीला जुनं शिकलेलं विसरता येत नाही. दे डोण्ट ‘अनलर्न.’ ते जुन्या कालबाह्य झालेल्या तथाकथित ज्ञानाला संपवून टाकत नाहीत. मला शिक्षक म्हणून आधी ‘अनलर्न’ करून घ्यावं लागतं, तेव्हा कुठे पुढे जाता येतं..’
तो साक्षात्कारी क्षण होता. मला ‘गुरु: देवो महेश्वरा’चा अर्थ आता भावला. जुन्या निर्थक ठरलेल्या ‘ज्ञाना’ची आणि विशेषकरून वृत्ती-प्रवृत्तीची पाळंमुळं उखडून टाकणं ही संहारक भूमिका गुरूनं पार पाडावी लागते. मनात थैमान घालणाऱ्या कालबाहय़ डेटाला डिलीट करावं लागतं, तरच नव्या ज्ञानाला स्पेस मिळते ..
अशा गुरूंना महाशिवरात्रीनिमित्त त्रिवार वंदन..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com