लॉयोसेल तंतूचे गुणधर्म कापूस, लिनन, रेशीम यांसारख्या नसíगक तंतूंच्या बरोबरीने असतात. हा तंतू कापसाच्या तंतूच्या सर्वात जवळ जाणारा तंतू आहे. शिवाय या तंतूंचा स्पर्श मऊ असतो आणि त्यांची बाष्प धारण करण्याची क्षमता अधिक असते. लॉयोसेल तंतूंपासून तयार केलेले कपडे सहजपणे चुरगळत नाहीत आणि ते यंत्राच्या साहाय्याने धुता येतात किंवा ड्रायक्लीनसुद्धा करता येतात. या तंतूपासून बनविलेले कपडे वापरण्यास खूपच आरामदायी असतात.
या तंतूपासून तयार केलेल्या कपडय़ांना अत्यंत आकर्षक रंग देता येतात आणि हे कपडे रेशीम किंवा कृत्रिम चामडे यांसारखे दिसतात. या तंतूची ताकद चांगली असल्याने त्यापासून कताई केलेल्या सुताची आणि त्यापासून विणलेल्या कापडाची मजबुती सुती कापडापेक्षा २५ टक्के तरी अधिक असते. या कापडाचा स्पर्श वैशिष्टय़पूर्ण आणि इतर तंतूंपेक्षा बराच वेगळा असतो. त्यामुळे यात काही बदल करून पुष्कळ विविधताही आणता येते. पूर्वी या तंतूचे उत्पादन आखूड तंतूच्या कताई यंत्रणेवर कताई करण्यास योग्य होईल, अशा स्वरूपात केले जात होते. आता यासोबतच इतर विविध तंतू लांबीतही त्याचे उत्पादन केले जाते. लोकर किंवा कॅश्मिर तंतूसोबत मिश्रण करण्यास योग्य होईल, अशा लांबीतही या तंतूचे उत्पादन घेतले जाते.
या तंतूंच्या सुरुवातीच्या काळात उच्च वर्गातील डिझाइनर कपडय़ांसाठी या तंतूंचा वापर होत असे. सुरुवातीच्या काळात या तंतूंचा उत्पादन खर्च कापसापेक्षा जास्त होता आणि त्यामुळे महागडे कपडे तयार करण्यासाठीच या तंतूंचा उपयोग केला जात असे, परंतु लॉयोसेल तंतूंचे उत्पादन जसे वाढले तशी त्यांची किंमत कमी होत गेली आणि मध्यम किमतीच्या कपडय़ांसाठीसुद्धा या तंतूंचा वापर होऊ लागला. या तंतूंपासून तयार केलेल्या कपडय़ांचा आकर्षकपणा आणि शोभिवंतपणा यामुळे या तंतूंचा उपयोग प्रामुख्याने स्त्रियांचे फॅशनेबल कपडे, पुरुषांचे शर्ट याबरोबरच परंपरेने रेशमापासून बनणारे कपडे तयार करण्यासाठी होतो. आरामदायी, हवेशीरपणा आणि उत्तम बाष्प शोषणक्षमता या गुणांमुळे या तंतूंचा उपयोग क्रीडापटूंसाठी कपडे तयार करण्यासाठी केला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा