लॉयोसेल हा व्हिस्कोजच्या तिसऱ्या पिढीतील तंतू आहे. हा तंतू सर्वसामान्यपणे आखूड तंतूच्या स्वरूपात बनविला जातो. पहिल्या पिढीतील व्हिस्कोज रेयॉन आणि दुसऱ्या पिढीतील मोडाल तंतूंपेक्षा लॉयोसेल तंतूचे गुणधर्म अधिक चांगले असतात. लॉयोसेल तंतू १९८० मध्ये इंग्लंडमधील कॉवेन्ट्री परगण्यातील कोर्टाउल्ड्स कंपनीने सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर विकसित केला आणि त्याला ‘टेन्सेल’ असे नाव दिले. पुढे १९९० मध्ये कोर्टाउल्ड्सने त्यांच्या अमेरिकेमधील अल्बाम येथील त्यांच्या रेयॉनच्या कारखान्यात तंतूचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन सुरू केले. ही कंपनी नंतर अॅक्झो नोबेल या कंपनीने विकत घेतली आणि अॅक्झो नोबेल कंपनी त्या पुढच्या काळात लेन्झिग ए.जी. या कंपनीने ताब्यात घेतली. लेन्झिग कंपनीने लॉयोसेल तंतूचे ब्रँड नाव टेन्सेल हेच कायम ठेवले. आजही लेन्झिग ही लॉयोसेल तंतू बनविणारी जगातील प्रमुख कंपनी आहे.
या तंतूंच्या उत्पादन प्रक्रियेत सर्वप्रथम कठीण अशा लाकडाची निवड केली जाते. नंतर अशा लाकडाचे पोस्टाच्या तिकिटाच्या आकाराएवढे चौरस आकाराचे तुकडे केले जातात. हे तुकडे रसायनामध्ये बुडवून ठेवून त्यामधील लिग्निनसारख्या रासायनिक अशुद्धता काढून हे तुकडे मऊ केले जातात, ज्यामुळे या तुकडय़ांपासून लगदा करणे सोपे जाते. लाकडांच्या तुकडय़ांचा लगदा करून त्याचे विरंजन (ब्लिचिंग) केले जाते. हा विरंजित लगदा वाळवून त्याचे पोस्टर बोर्ड एवढय़ा जाडीचे शीट बनवून ते गुंडाळून रोल बनविले जातात. हे रोल लॉयोसेल तंतू बनविणाऱ्या कारखान्यात आणून या शीटचे एक चौरस इंच आकाराचे तुकडे केले जातात. हे तुकडे एन- मिथाइलमॉरफोलीन एन – ऑक्साइड या रसायनामध्ये विरघळवले जातात. याप्रमाणे ज्यापासून तंतूंची कताई करावयाची ते द्रावण तयार होते, याला इंग्रजीमध्ये डोप असे म्हणतात. हे द्रावण चांगल्यारीतीने गाळून घेऊन, तनित्रामधून दाबाने बाहेर पाठविले जाते आणि तनित्राच्या सूक्ष्म छिद्रांतून बाहेर पडणारे हे द्रावण शॉवरमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या धारांसारखे दिसते. या तंतूंच्या धारा सौम्य अमाईन ऑक्साइडमध्ये बुडविल्या जातात, ज्यामुळे तंतूंचे घनीकरण होते. पुढे हे ओल्या स्थितीतील तंतू पाण्याच्या सह्य़ाने धुतले जातात आणि नंतर वाळवले जातात. हे तंतू नंतर छाटून त्यापासून लॉयोसेलचे आखूड तंतू बनविले जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा