कृत्रिम तंतू तयार करण्यासाठी एकरेषीय बहुवारिकाची गरज असते. यासाठी तंतू तयार करताना प्रथम बहुवारिक एकरेषीय बनवावे लागते. पुनर्निर्मित तंतूंच्या बाबतीत निसर्गात इतर स्वरूपात उपलब्ध असलेले बहुवारिक घेऊन त्याचे रूपांतर एकरेषीय बहुवारिकामध्ये केले जाते. संश्लेषित तंतूंच्या बाबतीत बहुवारिकाचा मूळ रेणू आणि त्या रेणूपासून एकरेषीय बहुवारिक कारखान्यातच तयार केले जाते.
या दोन्ही रीतीने मिळवलेले बहुवारिक हे द्रावण स्वरूपात किंवा वितळलेल्या द्रव स्वरूपात असते. असे जड व चिकट अशा द्रव स्वरूपातील बहुवारिक एका सूक्ष्म छिद्रे असलेल्या लहान चाळणीतून ज्याला तनित्र (स्पिनरेट) म्हणतात, त्यातून मोठय़ा दाबाने (ज्याप्रमाणे चकलीच्या साच्यातून चकली केली जाते) लहान लहान धारांच्या स्वरूपात बाहेर ढकलले जाते. तनित्रातून द्रव धारांच्या स्वरूपातील बहुवारिकाचे वेगवेगळ्या पद्धतीने घनीकरण (सॉलिडिफिकेशन) केले जाते. घनीकरणाच्या पद्धतीवरून कृत्रिम तंतू तयार करण्याच्या प्रक्रियांचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते.
१. आद्र्र कताई (वेट स्पििनग) :
या पद्धतीमध्ये बहुवारिक हे द्रावणाच्या स्वरूपात असते आणि हे बहुवारिकयुक्त द्रावण तनित्रातून बाहेर आल्याबरोबर त्याची प्रक्रिया एका विशिष्ट रसायनाशी होते. हे रसायन द्रावणातील द्रवकाशी रासायनिक प्रक्रिया करते आणि बहुवारिक साक्याच्या (प्रेसिपिटेट) स्वरूपात घनीकरण होऊन बाहेर पडते. साक्याच्या स्वरूपातील हे धागे नंतर वाळवले जातात.
२. शुष्क कताई (ड्राय स्पििनग) :
या पद्धतीमध्येसुद्धा बहुवारिक हे द्रावणाच्या स्वरूपात असते. यातील द्रावक हा चटकन उडून जाऊ शकणाऱ्या द्रवाच्या स्वरूपात असतो.
हे द्रावण तनित्राच्या बाहेर पडल्याबरोबर त्यास उष्णता दिली जाते आणि त्यामुळे द्रावक उडून जातो आणि द्रव्याच्या रूपातील बहुवारिकाचे घनीकरण होते.
३. वितळ कताई (मेल्ट स्पििनग) :
या पद्धतीमध्ये तंतूचे बहुवारिक हे वितळलेल्या द्रवाच्या स्वरूपात असते.
हा वितळलेला द्रव तनित्राच्या बाहेर आल्याबरोबर त्याला थंड हवेच्या साहाय्याने थंड केले जाते आणि या पद्धतीने बहुवारिकाचे घनीकरण होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा