पॉलिस्टरच्या आखूड तंतूंची कताई पश्चात उत्पादन प्रक्रिया वितळ कताईपर्यंत अखंड तंतूंच्या उत्पादन प्रक्रियेसारखीच असते. परंतु आखूड तंतूंसाठी वापरण्यात येणाऱ्या तनित्रामध्ये शेकडो छिद्रे असतात. त्यामधून शेकडो तंतूंचा एकत्रितपणे मोठय़ा दोरखंडासारखा जाड असा जुडगा तयार होतो.
या जुडग्यावर पुढील प्रक्रिया केल्या जातात-
अ) खेंचण प्रक्रिया : वितळ प्रक्रियेनंतर तयार झालेला जुडगा थंड झाल्यावर एका उघडय़ा डब्यात साठविण्यात येतो. असे मोठय़ा लांबीचे अनेक जुडगे साठविल्यानंतर त्यांना वेगळ्या यंत्रावर तापविलेल्या रुळांच्या साहाय्याने मूळ लांबीच्या ३ ते ४ पट खेच दिला जातो. या यंत्राला खेंचण यंत्र असे म्हणतात.
ब) कुरळीकरण : खेचण प्रक्रियेनंतर तंतूंचा हा जुडगा एका बॉक्समध्ये दाबून भरण्यात येतो. या क्रियेमुळे सुरुवातीस सरळ असलेल्या तंतूंना घडय़ा पडतात आणि आकाराने ते कुरळे होतात. सर्वसाधारणपणे एका सेंटीमीटरमध्ये ४ ते ६ कुरळ्या होतील अशा रीतीने या यंत्राची गती ठेवलेली असते. या यंत्रास कुरळक यंत्र असे म्हणतात. आखूड तंतूंपासून सूत कताईची प्रक्रिया वापरून तंतूंना पीळ देऊन सूत बनविण्यात येते. पॉलिस्टरच्या तंतूंचा पृष्ठभाग मुळात अतिशय गुळगुळीत असतो. असे तंतू सुतामध्ये एकत्र राहणे अवघड असते म्हणून त्यांना कुरळे करून त्यांचा पृष्ठभाग थोडा घर्षणयुक्त केल्यामुळे हे तंतू सुतामध्ये एकत्र राहणे शक्य होते.
क) स्थिरीकरण : तंतू कुरळे केल्यानंतर या कुरळ्या कायम राहाव्यात यासाठी त्यांना २२०अं.सें. ते २४०अं.सें.पर्यंत उष्णता दिली जाते. यामुळे तंतू पूर्णपणे कोरडे होतात आणि त्यांना दिलेल्या कुरळ्यांचे स्थिरीकरण होते.
ड) कापणे : कुरळे केलेले तंतूंचे जुडगे नंतर तंतू कापण्याच्या यंत्रावर नेले जातात. या ठिकाणी या अखंड स्वरूपातील जुडग्यातील तंतू ठरावीक लांबीवर कापले जातात. या लांबीला आखूड तंतूंची लांबी असे म्हणतात. ही लांबी सर्वसाधारणपणे ३२ मि.मी., ३८ मि.मी., ५१ मि.मी., ६१ मि.मी. आणि १५ सें.मी. अशी असते. कापसाबरोबर मिश्रण करण्यासाठी शक्यतो कापसाच्या तंतूंच्या लांबीएवढी लांबी असणारे तंतू लागतात. म्हणून ३२ आणि ३८ मि.मी. लांबीच्या तंतूंचा उपयोग केला जातो. ५१ मि.मी. लांबीच्या तंतूंचा उपयोग इतर मानवनिर्मित धाग्यांबरोबर मिश्रण करण्यासाठी तर ६१ मि.मी. तंतूंचे मिश्रण लोकरीच्या तंतूंबरोबर आणि गालिचे बनविण्यासाठी १५ सें.मी.पर्यंत लांबीचे तंतू वापरले जातात.
संस्थानांची बखर: ‘कोहिनूर’ आला, पण परतही गेला..
महाराजा रणजितसिंगांनी काश्मीरचा सुभेदार अतामोहम्मद याच्या ताब्यातून काश्मीर मुक्त करण्याची मोहीम सुरू केली. अतामोहम्मदने पराजित अफगाण शासक शाह शुजा याला शेरगढच्या किल्ल्यात कैद ठेवले होते. शाह शुजाची पत्नी वफाबेगम हिने लाहोरला जाऊन रणजितसिंगांना विनंती केली की, माझ्या पतीची सुटका केल्यास आमच्या ताब्यातील कोहिनूर हिरा मी आपल्याला भेट देईन. रणजितसिंगांनी काश्मीरवर ताबा मिळवला, त्यांचा दिवाण मोहकमचंद याने शेरगढ किल्ल्यास वेढा घालून शाह शुजाला कैदमुक्त केले, लाहोरमार्गे वफाबेगमकडे पोहोचवले. पण हिरा देण्याचे आश्वासन न पाळता बेगम चालढकल करीत राहिली. पुढे तिने हिरा धाडला, परंतु रणजितसिंगांनी जवाहिऱ्याकडून तपासून घेतला असता तो अस्सल नसल्याचे स्पष्ट झाले.
मधल्या काळात शाह शुजाच्या राजगादीवर दुसऱ्यांनी कब्जा केल्यामुळे महाराजा रणजितसिंगांनी शाह शुजा व बेगम यांची राहण्याची व्यवस्था लाहोरात केली. हेरांकरवी मूळ कोहिनूर हिरा कुठे ठेवला आहे याची माहिती काढली. अस्सल हिरा शाह शुजाने आपल्या पगडीत दडविला होता! महाराजांनी मग शाह शुजाकडे जाऊन, गुरू ग्रंथसाहिबवर हात ठेवून प्रतिज्ञा केली की, मी तुला काबूलची तुझी राजगादी मिळवून देतो. त्यानंतर शीख रिवाजाप्रमाणे ‘पगडी बदल भाई’ हा (बंधुभाव प्रस्थापित झाल्याची खूण म्हणून पगडय़ांच्या अदलाबदलीचा) विधी पार पाडण्यात आला. अर्थातच कोहिनूर रणजितसिंगांकडे आला.
खजिन्यातील कोहिनूर हिरा ही रणजितसिंगांची प्रतिष्ठा समजली जात होती. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी त्वरेने रणजितसिंगांचे साम्राज्य उद्ध्वस्त केले आणि त्यांचा अल्पवयीन पुत्र दुलीपसिंगाला इंग्लंडमध्ये ठेवून, तो देश सोडण्यास मनाई केली. लाहोरातील कोहिनूर हिरा लॉर्ड हार्डिगने महाराणी व्हिक्टोरियाला खूश करण्यासाठी तिच्या सुपूर्द केला. काही इतिहासकारांच्या मते लंडनमध्येच असलेल्या दुलीपसिंग यांनीच हा हिरा राणीस दिला. काहीही असो, पण राणीने हा हिरा आपल्या मुकुटात बसविला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com