पॉलिस्टर तंतूच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये बहुवारिकीकरण ही अतिशय महत्त्वाची पायरी आहे. याचे कारण म्हणजे, बहुवारिकाची लांबी, जी बहुवारिकीकरणाची कोटी (डिग्री ऑफ पॉलिमराझेशन) किंवा बहुवारिकाचा अणुभार (मोलेक्युलर वेट) या प्रमाणांमध्ये मोजली जाते, ती निर्माण होणाऱ्या तंतूंच्या गुणधर्माच्या दृष्टीने, मुख्यत: तंतूच्या ताकदीच्या दृष्टीने, अत्यंत महत्त्वाची असते.
बहुवारिकाची लांबी जितकी अधिक तितकी त्यापासून तयार होणाऱ्या तंतूची ताकद जास्त असा सर्वसाधारण नियम आहे. पॉलिस्टरचे तंतू त्याच्या ताकदीच्या बाबतीत तीन प्रकारचे बनविले जातात. पहिला सामान्य ताकदीचा, दुसरा उच्च ताकदीचा आणि तिसरा अतिउच्च ताकदीचा. या तीनही प्रकारांसाठी लागणारी बहुवारिकाची लांबी वेगवेगळी असते. सामान्य ताकदीच्या पॉलिस्टर तंतूसाठी बहुवारिकाची लांबी तुलनेने कमी लागते. यासाठी बहुवारिकाचा अणुभार हा साधारणपणे २२००० ते २५००० इतका ठेवला जातो. उच्च ताकदीच्या तंतूमध्ये तो ३५००० ते ४०००० इतका असतो आणि अतिउच्च ताकदीच्या तंतूसाठी हा अणुभार ४०००० पेक्षा बराच अधिक असतो. त्यामुळे पॉलिस्टर तंतूसाठी बहुवारिकीकरण करताना ज्या प्रकारचा तंतू बनवायचा आहे त्याप्रमाणे बहुवारिकाची लांबी नियंत्रित करावी लागते.
बहुवारिक तयार झाल्यावर त्यामध्ये गरजेनुसार इतर रसायने मिसळली जातात. उदा. तंतूची चकाकी कमी करण्यासाठी टायटॅनियम डायऑक्साइड मिसळतात, तर तंतूला आकर्षक बनविण्यासाठी किंवा तंतूची रंगाई सहज व्हावी म्हणूनसुद्धा काही रसायने वितळलेल्या बहुवारिकामध्ये मिसळली जातात.
पॉलिस्टर तंतूच्या उत्पादन प्रक्रियेमधील दुसरी पायरी म्हणजे बहुवारिक वाळविण्याची प्रक्रिया. बहुवारिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर बहुवारिकाच्या वितळलेल्या स्थितीतील लांब फिती तयार होतात. या फितींना थंड होऊ दिले जाते. थंड झाल्यावर त्या ठिसूळ होतात. नंतर त्यांचे लहान तुकडे केले जातात, त्यांना इंग्रजीमध्ये ‘चिप’ असे म्हणतात. या चिप्स त्यानंतर एका भट्टीमध्ये पूर्णपणे वाळविल्या जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा