पीटीए (प्युरिफाइड टेरेप्थॅलिक अॅसिड) पद्धत : पॉलिस्टर तंतू बनविण्यासाठी लागणाऱ्या शुद्धतेचे आणि दर्जाचे टेरेप्थॅलिक अॅसिड बनविण्याचे प्रयत्न १९५३ पासूनच सुरू झाले होते, परंतु त्यांना यश आले नाही. डेल मायर या संशोधकाने १९६३ साली तंतू बनविण्यासाठी लागणाऱ्या दर्जाचे शुद्ध टेरेप्थॅलिक अॅसिड बनविण्याची प्रक्रिया विकसित केली. त्यानंतर लवकरच पॉलिस्टर तंतू बनविण्यासाठी डीएमटीऐवजी शुद्ध टेरेप्थॅलिक अॅसिडचा वापर लोकप्रिय होत गेला. १९६५ मध्ये डायनामाइट नोबल या कंपनीने शुद्ध टेरेप्थॅलिक अॅसिड बनविण्याची अशा प्रकारची प्रक्रिया विकसित केली की, ज्यामुळे डीएमटी पद्धतीतील यंत्रसामग्री थोडासा बदल करून पीटीए पद्धतीसाठी वापरता येईल. १९८० नंतर जगभर पॉलिस्टर तंतूंच्या निर्मितीसाठी पीटीए पद्धत सर्वमान्य झाली आणि डीएमटी पद्धतीचा वापर हळूहळू कमी होत गेला. कच्चा माल म्हणून डीएमटीऐवजी पीटीटीएला प्राधान्य मिळण्याची अनेक कारणे आहेत त्यापकी दर्जा, गुणवत्ता आणि तंतूचा उत्पादन खर्च ही मुख्य होती.
पॉलिस्टर तंतू तयार करताना पीटीएमुळे कच्च्या मालाच्या खर्चात १५%ची बचत होते. पीटीएची घनता डीएमटीपेक्षा जास्त असल्याने वाहतूक खर्चात बचत होते आणि साठविण्यासाठी कमी जागा लागते. पीटीएचे ईस्टरीकरण करण्यासाठी कोणत्याही साहाय्यकाची (उत्प्रेरक) गरज नसते. पण डीएमटीचे ईस्टरीकरण करण्यासाठी साहाय्यकाची गरज असते. पीटीए पद्धतीमध्ये ईस्टरीकरणाची पातळी समान राखणे सोपे असते. परंतु डीएमटी पद्धतीमध्ये ईस्टरीकरण प्रक्रिया कच्च्या मालाच्या दर्जातील बदल तसेच प्रक्रियेदरम्यान होणारे बदल यास खूप संवेदनशील असते.
पीटीएमध्ये पाणी हे उपउत्पादन म्हणून बनते. तर डीएमटी पद्धतीत मिथेनॉल हे उपउत्पादन म्हणून बनते आणि ते हाताळणे अतिशय जिकिरीचे असते. एकूणच पीटीए पद्धतीने बनविलेल्या तंतूंचा दर्जा अधिक चांगला आणि उत्पादन खर्च खूपच कमी असतो. या सर्वामुळे ही पद्धत अतिशय लोकप्रिय झाली आणि आज जगभर पॉलिस्टर तंतूंच्या निर्मितीसाठी हीच पद्धत अवलंबली जाते.
पीटीए पद्धतीमध्ये शुद्ध टेरेप्थॅलिक अॅसिडबरोबर इथिलिन ग्लायकॉलची रासायनिक प्रक्रिया करून इथिलिन टेरेप्थॅलेट हे ईस्टर प्रथम बनविले जाते आणि नंतर या ईस्टरचे बहुवारिकीकरण करून पॉली इथिलिन टेरेप्थॅलेट हे बहुवारिक बनविले जाते. या बहुवारिकापासून वितळ कताई पद्धतीने पॉलिस्टर तंतूंची निर्मिती केली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा