पुदिन्याच्या पानांचा उपयोग स्वयंपाकात करतात, पण पुदिन्याचा औषध म्हणून उपयोग अनेक कारणांसाठी केला जातो. पुदिन्यातला खरा हिरो आहे मेंथॉल.
पुदिन्याच्या तेलातील मेंथॉल आणि मेंथाईल अॅसिटेट यांमुळे पुदिन्याला तीव्र वास येतो. मँगनीज, तांबे आणि जीवनसत्त्व ‘क’ यांचा पुदिना हा उत्तम स्रोत आहे. याशिवाय पुदिन्यात इतर बाष्पनशील तेलेही असतात. पुदिन्यामुळे कॅन्सरची, विशेषत: जठराच्या कॅन्सरची संभाव्यता कमी होते. मेंथॉल हे एक कार्बनी संयुग आहे. ते पाण्यात विरघळत नाही, पण अल्कोहोल आणि इथरमध्ये विरघळतं. पेपरिमट नावाची पुदिन्याची एक जात आहे, त्यात मेंथॉलचं प्रमाण ५० ते ६५टक्के असतं. तर जपानी पुदिन्यात त्याचं प्रमाण ७० ते ८५ टक्के असतं. मेंथॉलचे स्फटिक पांढरे, तीव्र वासाचे, जिभेला थंडावा देणारे, स्वादिष्ट असतात.
आपण पेपरिमटच्या गोळ्या खातो ना, त्यात मेंथॉलच असतं. मेंथॉलमुळेच पेपरिमटच्या गोळ्या गारेगार आणि चवीला छान लागतात. च्युईंगम, टूथपेस्ट, औषधे, गुळण्या करण्यासाठी असणारी द्रावणे, इत्यादींमध्ये स्वादासाठी मेंथॉलचा उपयोग केला जातो. मेंथॉलमुळे त्वचेतील थंड तापमानाची जाणीव करून देणाऱ्या चेतापेशी उद्दीपित होतात आणि मेंदूकडे संवेदना पाठवतात. म्हणूनच पुदिना तेलाचा स्पर्श त्वचेला होताच तेथे थंडावा जाणवतो.
पुदिन्यातील मेंथॉल वापरून काही औषधे तयार केली जातात. फार पूर्वीपासून पोटदुखीवर औषध म्हणून पुदिना वापरला जात आहे. पुदिन्यामुळे पोटाचे मृदू स्नायू शिथिल होतात; त्यामुळे पोटात मुरडा येत नाही. मेंथॉलमुळे पोटाला आराम तर मिळतोच, पण सूक्ष्म जिवांचीही वाढ होत नाही. याशिवाय डोकं दुखलं, की पेपरिमट तेल (पुदिन्याचं तेल) कपाळावर चोळतात. सर्दी झाली की श्वास घ्यायला त्रास होतो, त्या वेळी श्वसन करणं सुलभ व्हावं म्हणून पेपरिमट तेल नाकावर, गळ्यावर चोळतात. मेंथॉलमुळे घट्ट शेंबूड द्रवरूप होतो व बाजूला सारला जातो. चोंदलेलं नाक मोकळं होतं.
तोंडाची दरुगधी घालवण्यासाठी, टूथपेस्टमध्ये, माऊथवॉशमध्ये पेपरिमट तेल घातलेले असते. पुदिन्याचं तेल हे नसíगक कीडनाशक म्हणूनही वापरलं जातं. त्यातील प्युलगॉन (pulegone) व मेंथाल हे घटक विशेष प्रभावी आहेत.
मनमोराचा पिसारा: डिलबर्ट उवाच
जीवनाला यशस्वी वळण लावणारे काही नियम सरळ असतात, त्यामुळे त्यांना वळविणं कठीण होतं. काही निरीक्षणांमधून सत्याचं दर्शन होतं, पण ते डोळस नसल्याने तो आभास ठरतो. अशी काही अनुमाने, कन्फेशन आणि सुवचनांचा इथे लेखाजोखा मांडतोय. यातील मर्मदृष्टी अर्थातच अलिखित आहे..
१) मी मदिरेला नेहमी ‘नको, नको’ म्हणतो, पण ती बहिरी असल्यानं, तिला ऐकू येत नाही.
२) घटस्फोट होण्यामागे हे एकमेव कारण विवाह आहे.
३) आपण गाडी चालवीत असताना व समोरून विरुद्ध बाजूने गाडय़ा येत असल्यास आपण ‘राँग लेन’मध्ये गाडी चालवीत असण्याची बरीच शक्यता असते.
४) गडद काळोखी बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला दिसणारा उजेड समोरून वेगानं येणाऱ्या गाडीच्या दिव्याचाही असू शकतो.
५) आपण छत्री घेतल्यामुळे पाऊस थांबलाय, असं वाटून अनेक जण (छत्रीबाहेर) हात काढून निराश होतात.
६) जीवन क्षणभंगुर असतं, त्यामुळे जेवताना आपली आवडती डिश आधी खाऊन टाका.
७) आपल्या पायावर ठाम उभं राहिल्यामुळे पायात पँट कशी चढवावी हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.
८) वक्तशीर असण्यातील अडचण अशी की, ऑफिसात वेळेवर पोहोचल्यावर आपलं कौतुक करायला कोणी हजर नसतं.
९) ‘उद्या’ नावाचा दिवस कॅलेंडरवर कधी दिसत नाही.
१०) चुकणं हा माणसाचा स्वभाव असतो, माफ करणे देवाची सवय असते; परंतु तशी कोणत्याही कंपनीची ‘पॉलिसी’ नसते.
११) मला यशाची किल्ली सापडते तेव्हा नशिबानं कुलूप बदललेलं असतं.
१२) आपल्याला कर्जाची अजिबात गरज नाही, हे बँकेला पटलं तरच कर्ज मिळते.
१३) यशाचा रस्ता नेहमीच ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ असतो.
१४) स्वतंत्र देशात बोलणं ‘फ्री’ असतं, ध्वनिलहरी फोनद्वारे इकडून तिकडे हवेमधून पाठवायला पैसे मोजावे लागतात.
१५) चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवा, तुम्ही काय विचार करताय, याचं कोडं लोक सोडवत बसतील.
काही कानपिचक्या डिलबर्टच्या, तर काही अस्मादिकांच्या..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा