मिथेन हादेखील (कार्बन डायऑक्साइड प्रमाणे) एक हरितगृह वायू आहे. ऑक्सिजन वायूशिवाय जगणारे काही जिवाणू निसर्गात आढळतात. ते आपल्या जैविक प्रक्रियेद्वारे हा वायू हवेत सोडतात. वनस्पतीसुद्धा हा वायू उत्सर्जति करतात. कार्बनचा एक अणू आणि हायड्रोजनचे चार अणू मिळून तो तयार झालेला असतो. हा वायू पाणथळ, तेल खाणी, कोळसा खाणी आणि नसíगक भूक्षेत्रात सापडतो. पाणथळात वनस्पतीच्या कुजण्यातून (मिथेनोजिनेसिस प्रक्रियेतून) हा वायू उत्सर्जति होत असतो. हा हरितगृह वायू पृथ्वीला कार्बन वायूच्या २१ पटीने जास्त उष्मा देतो. पृथ्वीचे ‘ग्लोबल वाìमग’ होण्यास कारणीभूत ठरणारा तो एक खलनायक आहे. गेल्या १५० वर्षांत त्याचे वातावरणातील प्रमाण तिपटीने वाढले आहे. त्यातच वातावरण जितके तापते तेवढय़ा जास्त प्रमाणात हा वायू वनस्पतीद्वारे उत्सर्जति होतो. पेट्रोलियम इंधनांच्या भरमसाट वापरामुळे मोठय़ा प्रमाणात हा वायू वातावरणात मुक्त होत आहे, त्यामुळे हवामान बदलू लागले आहे.
त्याच वेळी, या वायूचे उपयुक्तता मूल्यसुद्धा उघडकीस आले आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (उठॅ) या नसíगक वायूत मोठय़ा प्रमाणात मिथेन असतो व तो इंधन म्हणून कामास येतो. वाहनासाठी आणि घरगुती वापरांसाठी (स्वयंपाकघरातले इंधन) त्याचा वापर होत आहे.
पृथ्वीवरच्या काही भागांत, हा वायू जमिनीतून बाहेर पडतो व पेटतो, तेव्हा अखंड ज्वालेच्या रूपात नजरेस पडतो. वायूची ही नसíगक गळती वातावरणातील या हरितगृह वायूची वाढ होण्यास कारणीभूत ठरते. या दुर्मीळतेने आढळणाऱ्या अक्षय ज्वाला दिसायला मोहक आणि आकर्षक असल्या तरी वातावरणाला हानी पोहोचवितात. म्हणून संशोधक त्यांचा ठिकठिकाणी छडा लावीत आहेत.
आता तर संशोधकांना आढळून आले आहे की, समुद्रात असलेल्या गाळात किंवा ध्रुव प्रदेशातील गोठलेल्या जमिनीखाली किंवा नद्यांच्या खोऱ्यात क्लाथ्रेटसच्या रूपात हा वायू दडलेला आहे. हे एक प्रकारचे बर्फाचे चिमुकले गोळे असतात व त्यात हा वायू दडलेला असतो. या क्लाथ्रेटसमधला मिथेन वायू जळतो, तेव्हा त्याला ‘जळता बर्फ’ असे संबोधिले जाते.
आपल्याकडे या वायूचा साठा कृष्णा-गोदावरीचे खोरे, महानदीचे खोरे, अंदमान बेटाजवळचा समुद्र या विभागांत विखुरला आहे.
प्रबोधन पर्व: स्वाभिमानाची लागवड
‘‘स्वाभिमान! स्व+अभिमान-स्वत:विषयी अभिमान, मानवी जीवनातील सर्व आशा आकांक्षांच्या उत्कर्षांचा हा पाया. व्यक्तींच्या काय किंवा देशाच्या काय, सर्वागीण उत्थानाचा पाया स्वाभिमानच. स्वाभिमानशून्य व्यक्तीला आणि समाजाला जगाच्या व्यवहारात मातीच्या मोलानेही कोणी विचारीत नाही. स्वाभिमानाचे क्षेत्र स्व-पुरतेच संकुचित नाही व नसते. त्याचा विस्तार स्वत:चे कुटुंब, घराणे, जन्मग्राम, जन्मस्थळ, स्वजाती, गावकरी, भगिनी, बांधव, गावातील पवित्र स्थाने, संस्था असा फोफावत जात जात स्व-राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र येथपर्यंत होत असतो. स्वाभिमानाच्या अस्सल जिव्हाळ्याने येथवर मजल मारल्यानंतरच भारत राष्ट्राविषयीचा जिव्हाळा (परिस्थिती तितकीच देवाण-घेवाणीची असेल तर) निर्माण होणे शक्य आहे.. ’’
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे १९६६ सालच्या निबंधात स्वाभिमानाच्या लागवडीचे मर्म सांगताना म्हणतात –
‘‘जात काय नि धर्म काय, यांचे अभिमान माणसाच्या जन्माबरोबरच जन्माला येत असतात. ‘आम्ही जातपात धर्म मानीत नाही,’ असे बरळणारे शिखण्डी हिंदुंतच फार सापडतात. आई, बाप, बायको मेल्यावर, पांढरी कॉलरवाले हे पांढरपेशे दाढीमिशा डोके भादरून, नासिकच्या रामकुंडावर मयतांची राख-हाडे मोक्षाला पोचविण्यासाठी मुकाटतोंडी जाताना कोणी पाहिलेच नाहीत? वाणी करणीचा व्यभिचार करणाऱ्या करंटय़ांना इतर जबरदस्तांची पायतणे चाटूनच जगण्याचा बांका बखत आला, तर त्यांची काय म्हणून कोणी कीव करावी? मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, बोहरी इत्यादी हिंद्वेतर जातीत असला कोडगेपणा आढळणार नाही. स्वाभिमानशून्यांनाच आपली जात नि धर्म ठणकावून सांगण्याची हिंमत होत नाही.. स्वाभिमान चांगला रसरशीत टरारलेला असला तरच त्याची भिंगरी स्व-पासून स्व-देशापर्यंत बिनधोक रोंरावत जाते. अभिमान शिकावा अगर शिकवावा लागत नाही. प्रत्येकाच्या जन्माबरोबरच तो स्वयंभू जन्माला येत असतो.’’
मनमोराचा पिसारा: सूर्योन्योक्ति
उन्हाची तलखी वाढते आहे, पारा तपमानमापक फोडून बाहेर सांडेल इतका उष्मा वाढला आहे. झाडं निपचित दिसतात आणि फांद्यांना बिलगून स्वत:चा बचाव करणारी पानं करपत आहेत. जमिनीला पडलेल्या भेगा पाहून मन तडफडत आहे. अशा धरतीला पाहून दयामाया न बाळगता सूर्य मात्र संतप्त होऊन आग ओकतोय असं वाटतं..
अशा वेळी मन शुष्क होतं, पण कविमनाला मात्र या क्षणी काव्यपंक्ती स्फुरतात. सूर्याच्या अति तळपण्यातली प्रतीकात्मकता भावते.
कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी शार्दूलविक्रीडित (त्यांच्या प्रिय वृत्तामध्ये) मध्ये मोजक्या पंक्तींमधून सूर्याला उद्देशून चार शब्द सुनावले आहेत. त्या काळातल्या शैलीनुसार नेमक्या आणि आता अपरिचित शब्दांमधून ही कविता फक्त सूर्याला उद्देशून लिहिलेली नाही, हे सुज्ञास सांगायला नको.
देखूनी उदया तुझ्या द्विजकुळे गाती अती हर्षुनी
शार्दूलादिक सर्व दुष्ट दडती र्गियतरी जाउनी
देशी ताप परी वरिवरी येशीं नभी, भास्करा,
अत्युच्चीं पदिं थोर ही बिघडतो हा बोल आहे खरा
(शार्दूलविक्रीडित)
ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळात देशामधली अंदाधुंदी, अराजकता काही प्रमाणात आटोक्यात आली. मोगलाईमधली क्रूर करपद्धती आणि दडपशाहीमुळे सगळे जण हैराण झाले होते. त्या परिस्थितीला काही काळ आळा बसला. ब्राह्मणादिकांना (द्विजकुळे) बरे दिवस आले. त्याचबरोबर जुलमी राजवटीमधली दुष्ट माणसं घाबरून दिसेनाशी झाली. अर्थात, ही व्यवस्था काही काळापुरतीच बरी वाटली. मग जसजसा या राजवटीचा अंमल सर्वत्र पसरला तेव्हा ब्रिटिश वसाहतवादामधली लूटमार लक्षात आली आणि एक काळ असा आला की या राजवटीचा ताप असह्य़ झाला, कारण त्या राजवटीत सूर्य मावळेनासा झाला. त्यामुळे, अशा रीतीने ही तथाकथित शिस्तप्रिय थोर राजवट असह्य झाली. अशा रीतीने अत्युच्च पदी पोहोचल्यावर थोरामोठय़ांची नियत बिघडते, असा इशारा शास्त्रीबुवांनी आपल्या वाचकांना दिला आहे.
अर्थात, या चार ओळींतल्या प्रत्येक शब्दाला उघड कळणारा अर्थ आहे (उदा. – ‘द्विजकुळे’चा एक अर्थ ‘पक्षीगण’ असाही होतो.), पण गर्भितार्थ अधिक गहिरा आहे.
पुन्हा मनाला धक्का बसतो आहे. या ओळी फक्त सूर्याला उद्देशून म्हटलेल्या आहेत. तत्कालीन राजव्यवस्थेकडे त्या कवितेचा रोख आहे असं सहज लक्षात येतं.
पण चिपळूणकर सरांनी दिलेला संदेश मात्र सार्वकालिक आहे. एकाधिकार सत्ता, अत्युच्च पदी बिघडणारे हिटलर, मुसोलिनी आणि स्टालिन जगात दिसू लागले. सगळ्यांच्या इतिहासात बरंच साम्य आहे.
यापासून फक्त कविता नाही तर धडा घेण्यासारखं बरंच आहे, अगदी आजसुद्धा!
डॉ.राजेंद्र बर्वे