आपल्याकडे मोसमी स्वरूपाचा पाऊस आणि मर्यादित सिंचन क्षमता यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आíथक प्राप्ती होते. सेंद्रिय खताच्या वापराने मिळणारा भाजीपाला, फळे, धान्ये यांना भविष्यकाळात महत्त्व प्राप्त होत आहे. गायी/ म्हशींच्या संगोपनाने मिळणारे शेणखत सेंद्रिय खताचा प्रमुख घटक आहे. गोबर गॅस यंत्राच्या वापराने अमूल्य शेणखत आणि उपयुक्त इंधन मिळते. शेणखताच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो व धान्य उत्पादन वाढते.
आबालवृद्धांसाठी दूध पोषक आहार मानला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाना वाढती मागणी राहणार आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला आíथक मंदीची भीती नाही. या व्यवसायातून पाच गाई अथवा म्हशींच्या संगोपनाने दरमहा तीन हजार रुपयांची प्राप्ती ग्रामीण भागात होऊ शकते. गेल्या दशकापासून आपला देश दूध उत्पादनात जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर आहे. राष्ट्रीय पातळीवर गहू, तांदूळ, साखर या पिकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न दूध व्यवसायातून मिळते. या व्यवसायातील आधुनिकीकरण प्रक्रियेमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची संख्यात्मक तसेच गुणात्मक वाढ होत आहे.
देशी गाई सरासरी एक हजार लिटर दूध एका वेतामध्ये देतात. विदेशी जातीच्या गाई एका वेतात आठ हजार लिटर दूध देतात. देशी गाईंचा विदेशी जातीच्या वळूंच्या वीर्यमात्रेद्वारे रेतनक्रिया करून संकरित गाईंची पदास करता येते. संकरित गाई एका वेतात सरासरी तीन हजार लिटर दूध देतात. त्यामुळे अल्प भूधारक शेतकऱ्यांना तसेच भूमिहीन लोकांना दुग्ध व्यवसायाद्वारे ग्रामीण भागात रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. या व्यवसायाला चालना देण्यासाठी संकरित गाईंची संख्या वाढवणे, गायी/ म्हशींचे रोग व आजार लसीकरण प्रक्रियेद्वारे टाळणे, गुरांना सकस खाद्य देणे, उत्पादकांना गुरांच्या संगोपनाबाबत प्रशिक्षण देणे, दूध संकलन आणि दूध प्रक्रिया सुविधा वाढवणे या उपाययोजनांची आवश्यकता आहे. दूध उत्पादकाला दूध खुल्या बाजारात विक्री करणे अथवा सहकारी संघाला देणे असे पर्याय उपलब्ध आहेत.

वॉर अँड पीस: गुप्तरोग : पुरुषांचा आजार – भाग १
मी भारतीय विमानदलात १९५१ साली दाखल झालो. वैद्यकीय आवश्यक तपासणीकरिता पुण्यातील मिलिटरी रुग्णालयात दोन दिवस राहावे लागले. शेजारच्याच वॉर्डमध्ये आम्हाला जायला बंदी होती. मी नर्सकडे चौकशी केली, तेव्हा पुरुषांच्या सिफिलिस, हरपिस गुप्तरोगाची वरवर माहिती मिळाली. पुढे १९५६-५७ कानपूर येथे माझे बरोबर असणाऱ्या एका वायूपुत्राला हा विकार जडल्यावर तो किती भोगत होता, तळमळत होता., पेनिसिलीनमुळे कसा हळूहळू बरा होत होता हे अजूनही आठवते. त्या काळात कानपूर हे देशातील क्षय, गुप्तरोग विकारांचे एक क्रमांकाचे म्हणून प्रसिद्ध होते. १९६८ साली मी कर्ममहर्षी वैद्यराज पराडकरांचे साहाय्याने मअपपं. रुग्णालय सुरू केले. इतर अनेक कष्टसाध्य रुग्णांबरोबर उपदंश-गुप्तरोगाचे रुग्ण; पेनिसिलीनच्या स्ट्रँाग औषधाला कंटाळलेले येऊ लागले. आयुर्वेदाने ‘दर्शनस्पर्शनप्रश्नै: परीक्षेतार्थ रोगिणम्।’
अशी प्रत्येक रुग्णाची परीक्षा करावयाचा सांगावा दिला आहे. या दुर्दैवी पुरुष रुग्णांच्या लिंगावरची चामडी बाजूला करून तपासत गेलो. तपासत असताना त्यांच्या अतीअती, असह्य़ वेदना कळल्या. ही मंडळी केल्या पापांची किंमत बराच काळ मोजत आलेली होती व मोजणार होती. अ.ह.सू.१५/४३ श्लोकातील सांगाव्याप्रमाणे एलादितेल वापरले.  त्रिफळा काढय़ाने अशा उपदंशग्रस्तांची जखम   धुवत राहिलो. कापसाने पुसून एलादितेलाचे दोन थेंब प्रथम लावून व मग शतधौतघृत घरी लावावयास सांगत गेलो. ही मंडळी पूर्वी डेटॉल, विविध व्हॅसलिन सारखी मलमे लावत होती. पण तितकासा गुण नव्हता. या रुग्णांना मीठ पूर्णपणे वज्र्य करून, उकडलेल्या भाज्या, फिके ‘घरचे जेवण’ व धूम्रपान, मद्यपान अशी व्यसने बंद करावयाचा कडक सांगावा दिला. महातिक्तघृताबरोबर आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि, लाभादि, त्रिफळा गुग्गुळ, चंद्रप्रभा, प्रवाळ, कामदुधा अशी औषधे देत राहिलो. बहुतेक रुग्णांना महिनाभरातच बराचसा दिलासा मिळाला. कडक पथ्यपाणी सांगणाऱ्या आयुर्वेदशास्त्राला  प्रणाम!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      सरस्वती
ज्ञानेश्वरीत सरस्वतीला शारदा म्हटले आहे.
मंडनमिश्र या विद्वानाची शारदा ही विद्वान बायको. एकदा मंडनमिश्र आणि शंकराचार्य हे आपापल्या तत्त्वज्ञानाबद्दल स्पर्धात्मक चर्चेला उभे ठाकले तेव्हा तेवढय़ाच तोलामोलाचा पंच किंवा न्यायाधीश हवा म्हणून हिच्या म्हणजे शारदेच्या विद्वत्तेमुळे तिची नेमणूक करण्यात आली होती. मुळात कला, वाचा, क्रीडा, भाषा या गोष्टी स्त्रीलिंगी तसेच विद्या हा शब्दही स्त्रीलिंगी आहे. या सगळ्या कुठे जन्मल्या तर सरस्वती नदीच्या खोऱ्यात. ही नदी दिसते मग गुप्त होते मग परत दिसते असे उल्लेख सापडतात. या खोऱ्यात नदीने आणलेल्या गाळमातीमुळे वस्ती/ शेती तगली मग संस्कृती जन्मली. त्यात विद्या पसरली म्हणून सरस्वती किंवा शारदा यांचे वर्णन अभिनव वागविलासिनी चातुर्य अर्थ कला कामिनी असे केले आहे. शिवाय ब्रह्माची ही सहचारिणी अशी कल्पना आहे. ब्रह्म खरेतर नपुंसक असते, (ते ब्रह्म) पण याच्या केवळ सान्निध्याने शारदा/ सरस्वती अक्षर शब्द व्याकरण विचार गद्य पद्य तत्त्वज्ञान पुराणे श्रुति स्मृति प्रसवते अशी कल्पना आहे.
सरस्वती लक्ष्मीहून मोठी. ही विदुषी समुद्रमंथनातून लक्ष्मी बाहेर आली तेव्हा तिचे स्वागत करण्यास हजर होती. सरस्वती या शब्दात सृ हा धातू आहे. त्याचा अर्थ सरकणे (वाहणे, हलणे) असा आहे म्हणून ही प्रवाही ठरते. सरसमध्ये रस हा शब्द आहे (द्रवरूप). रसपूर्णतेने वाहणारी ती सरस्वती. सरस्वती विद्येची देवता म्हणून तिच्या हातात पुस्तक आहे. संगीताची निर्मिती म्हणून एका हातात वीणा. वीणा हे जगाच्या इतिहासातले सर्वात जुने तंतुवाद्य आहे. ही पाण्याशी संबंधित म्हणून हिचे वाहन हंस आहे. वैभव किंवा श्रीमंतीचे हिला तसे वावडेच म्हणून ही पांढरी शुभ्र वस्त्रे नेसते आणि श्रीमंत नाही म्हणून तिच्या हातात कमंडलू दान घेण्यासाठी म्हणून दिले आहे. एका हातात नामस्मरणासाठी माळ आहे.
 ज्ञानेश्वरी सांगताना मी भाष्यकारांना वाट पुसत (विचारत) हे निवेदन करत आहे असा उल्लेख ज्ञानेश्वरांनी केला आहे. याच्यातले मूळ भाष्यकार शंकराचार्य आणि त्यांची विद्वत्ता तपासण्याचे काम शारदेने केले म्हणून कौतुकाने शारदा हेच नाव सरस्वतीऐवजी वापरले.
शरद ऋतू सौम्यपणाचा आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. पाऊस सरलेला असतो. धनधान्य पिकून, कापून, जमवून ठेवलेले असते. हवेत किंचितसा गारठा असतो आणि या ऋतूत चंद्र मोठा स्वच्छ दिसतो.
ऋतु बरवा शारदु। शारदि पुडुती चंद्रु।
चंद्रि जैसा संबंधु। पूर्णिमेचा तो।।
असा मोठा आल्हाददायक योग ज्ञानेश्वरांनी सांगितला आहे.
सरस्वती काही वर्षांपूर्वी एका गोंधळात अडकली त्याबद्दल उद्या.

रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
१८६०> संगीतज्ञ, संगीतकार आणि संगीतशास्त्राचे इतिहासकार विष्णु नारायण भातखंडे यांचा जन्म. १५ वर्षे देशभर फिरून, मौखिक व हस्तलिखित साधनांच्या आधारे त्यांनी ‘हिंदुस्थनी संगीत पद्धति’ हा ग्रंथ (चार खंडांत) सिद्ध केला. याखेरीज चतरुदडप्रकाशिका, रागतत्त्वबोध, रागतरंगिणी, रागलक्षण, सारामृत आणि नव रागमंजिरी ही पुस्तकेही त्यांची.
१८९८ > ‘गीता बीज’ आणि ‘गीतार्थचर्चा’ ही पुस्तके, तसेच ‘हिंदुत्वाची राष्ट्रीय मीमांसा’ या पुस्तकासह अनेक छोटेखानी चरित्रपुस्तके लिहिणारे सावरकरवादी विज्ञाननिष्ठ  पत्रकार गजानन विश्वनाथ केतकर यांचा जन्म.

१९१३> भाषाशास्त्रज्ञ, प्राकृत व संस्कृतचे राष्ट्रीय पंडित डॉ. अमृत माधव घाटगे यांचा जन्म. ‘संस्कृत महाकोश’ आणि ‘प्राकृत महाकोश’चे संपादन त्यांनी केले होते.
१९२४> अंधारातील किरण, ऋ,णानुबंध आदी कादंबऱ्या, तीन लघुकथासंग्रह व बालसाहित्य लिहिणारे राम कृ. जोशी यांचा जन्म.
१९७७ > ध्येयवादी कीर्तनकार, कवी वासुदेव शिवराम कोल्हटकर यांचे निधन. ‘कीर्तन : कला आणि शास्त्र’ हे कीर्तनकलेची नव्या दृष्टीने चिकित्सा करणारे पुस्तक त्यांनी लिहिले होते.
संजय वझरेकर