आपल्याकडे मोसमी स्वरूपाचा पाऊस आणि मर्यादित सिंचन क्षमता यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आíथक प्राप्ती होते. सेंद्रिय खताच्या वापराने मिळणारा भाजीपाला, फळे, धान्ये यांना भविष्यकाळात महत्त्व प्राप्त होत आहे. गायी/ म्हशींच्या संगोपनाने मिळणारे शेणखत सेंद्रिय खताचा प्रमुख घटक आहे. गोबर गॅस यंत्राच्या वापराने अमूल्य शेणखत आणि उपयुक्त इंधन मिळते. शेणखताच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो व धान्य उत्पादन वाढते.
आबालवृद्धांसाठी दूध पोषक आहार मानला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाना वाढती मागणी राहणार आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला आíथक मंदीची भीती नाही. या व्यवसायातून पाच गाई अथवा म्हशींच्या संगोपनाने दरमहा तीन हजार रुपयांची प्राप्ती ग्रामीण भागात होऊ शकते. गेल्या दशकापासून आपला देश दूध उत्पादनात जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर आहे. राष्ट्रीय पातळीवर गहू, तांदूळ, साखर या पिकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न दूध व्यवसायातून मिळते. या व्यवसायातील आधुनिकीकरण प्रक्रियेमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची संख्यात्मक तसेच गुणात्मक वाढ होत आहे.
देशी गाई सरासरी एक हजार लिटर दूध एका वेतामध्ये देतात. विदेशी जातीच्या गाई एका वेतात आठ हजार लिटर दूध देतात. देशी गाईंचा विदेशी जातीच्या वळूंच्या वीर्यमात्रेद्वारे रेतनक्रिया करून संकरित गाईंची पदास करता येते. संकरित गाई एका वेतात सरासरी तीन हजार लिटर दूध देतात. त्यामुळे अल्प भूधारक शेतकऱ्यांना तसेच भूमिहीन लोकांना दुग्ध व्यवसायाद्वारे ग्रामीण भागात रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. या व्यवसायाला चालना देण्यासाठी संकरित गाईंची संख्या वाढवणे, गायी/ म्हशींचे रोग व आजार लसीकरण प्रक्रियेद्वारे टाळणे, गुरांना सकस खाद्य देणे, उत्पादकांना गुरांच्या संगोपनाबाबत प्रशिक्षण देणे, दूध संकलन आणि दूध प्रक्रिया सुविधा वाढवणे या उपाययोजनांची आवश्यकता आहे. दूध उत्पादकाला दूध खुल्या बाजारात विक्री करणे अथवा सहकारी संघाला देणे असे पर्याय उपलब्ध आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा