पूर्णपणे संश्लेषित असलेला नायलॉन हा जगातील पहिला तंतू आहे. नायलॉन तंतूंचा विकास हे वस्त्रोद्योगच नव्हे तर रासायनिक उद्योगातील मूलभूत संशोधनातील अगदी सुरुवातीच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचे यश होते. डम्य़ू पॉन्ट या अमेरिकन कंपनीमध्ये हे संशोधन झाले. वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली त्याच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केले. या संशोधनातून तीन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. पूर्वी बहुवारिक (पॉलिमर) म्हणजे काय हे माहीत झाले होते. परंतु शास्त्रज्ञांचा असा ग्रह होता की बहुवारिक म्हणजे ते तयार करणाऱ्या रेणूंचा एक समूह असतो व त्यातील रेणू हे एका अनामिक बलाच्या साहाय्याने किंवा अनामिक बंधांनी जोडलेले असतात. परंतु वॅलेस कॅरोथर्स व त्याच्या सहकाऱ्यांनी हे सिद्ध केले की बहुवारिकामध्ये त्यातील रेणू समूहाच्या रूपात नसून ते एकमेकांशी रासायनिक किंवा इतर बंधांनी साखळीसारखे जोडलेले असतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॅलेस कॅरोथर्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मोठय़ा लांबीच्या बहुवारिकाची निर्मिती करण्याची प्रक्रिया विकसित केली. त्या पूर्वी प्रयोगशाळेत बहुवारिके बनविण्याची कला शास्त्रज्ञांनी विकसित केली होती, परंतु ही बहुवारिके अल्प लांबीची किंवा कमी रेणुभार (मोलेक्युलर वेट) असलेली अशी होती. वॅलेस कॅरोथर्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रथमच ४००० किंवा अधिक रेणुभार असलेले बहुवारिक तयार करण्यात यश मिळवले, जे त्यापूर्वी अशक्यप्राय वाटत होते. याच संशोधनादरम्यान त्यांनी एकरेषीय पॉली कंडनसेशन ही बहुवारिक बनविण्याची प्रक्रिया विकसित केली आणि त्याचे पेटंटही घेतले. पॉली कंडनसेशन प्रक्रियेने त्यांनी २५००० पेक्षा अधिक रेणुभार असलेले बहुवारिक प्रयोगशाळेत तयार करण्यात यश मिळविले. या बहुवारिकास त्यांनी उच्च बहुवारिक (सुपर पॉलिमर) असे नाव ठेवले. यालाच महारेणू (मॅक्रो मोलेक्युल) असेही म्हटले जाते. डायबेसिक आम्ल आणि ग्लायकॉल ही रसायने वापरून त्यांनी सुरुवातीला ईस्टरचा रेणू बनविला आणि त्यांचे बहुवारिकीकरण करून २५००० रेणुभारापर्यंत लांबी असलेले पॉलिस्टरचे बहुवारिक तयार केले. हे बहुवारिक घनरूपात कठीण, अपारदर्शक असते आणि तापविल्यावर त्याचे पारदर्शक, चिकट अशा द्रवात रूपांतर होते.
संस्थानांची बखर: कपूरथाळाची संगीत परंपरा
भारतीय अभिजात संगीताच्या (किंवा ‘हिंदुस्तानी क्लासिकल’) परंपरेत कपूरथाळा संस्थानाचे महत्त्वाचे योगदान आहे. कपूरथाळा आणि जलंधर ही शास्त्रोक्त संगीताची महत्त्वाची केंद्रे झाली. याची सुरुवात झाली कुंवर विक्रमसिंग आणि राजा सर दलजीतसिंग यांच्यापासून. दोघांनी मियाँ तानसेनचा एक वारस आणि शिष्याला राज्यात पाचारण करून संगीताची मुहूर्तमेढ रोवली. विख्यात संगीतज्ञ आणि ध्रुपदगायक स्वामी संत हरिदासजी हे कपूरथाळ्याचेच.
बजू, तानसेन, मदनलाल, दिवाकर पंडित, सोमनाथ पंडित हे हरिदासांचे विख्यात शिष्य. दिवाकर पंडित व सुधाकर पंडित हे शिष्य पुढे कपूरथाळा संस्थानातल्या जलंधर येथे स्थायिक होऊन त्यांनी ध्रुपद गायकीची तलवंडी, शाम चौरासी, कपूरथाळा, हरियाणा ही चार घराणी स्थापन केली. गुरुनानक यांच्या काळापासून शीख कीर्तने आणि गुरुशब्द शास्त्रोक्त ध्रुपद गायकीत म्हणण्याची प्रथा होती. त्यामुळे शीख कीर्तनांचा ध्रुपद धमार गायकी लोकाभिमुख करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. कपूरथाळा घराण्याची ध्रुपद गायकी विशेष लोकप्रिय झाली.
सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत तबला हे वाद्य सध्यासारखे लोकप्रिय नव्हते. ध्रुपद धमार शैलीच्या गायकीच्या साथीला तबला अयोग्य व पखवाजच योग्य समजला जाई. सोळाव्या सतराव्या शतकात ख्याल, टप्पा हे गायनाचे प्रकार प्रचलित झाल्यावर तबल्याने पखवाजाची जागा घेतली. पंजाब घराण्यातील पखवाजावरचे ‘खुले बोल’ हे तबल्यावर ‘बंद बोल’ म्हणून प्रचलित झाले. पंजाबात कपूरथाळा संस्थानात प्रथम तीन घराणा शैलीत तबलावादन होत असे. लाहोर घराणे, कसूर घराणे आणि अमृतसर घराणे. कपूरथाळ्याने भारतीय संगीताला काही नवीन राग दिले. त्यापकी सिंधुरा, मुलतानी, जयजयवंती, कसुरी भरवी, जोगिया, असा काफी आणि पाहरी हे राग विशेष लोकप्रिय झाले. कपूरथाळा संस्थानातील जलंधरात भारतातील सर्वात जुना, १२७ वर्षांचा हरवल्लभ संगीत समारोह दरवर्षी मोठय़ा उत्साहाने भरविला जातो.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com