पूर्णपणे संश्लेषित असलेला नायलॉन हा जगातील पहिला तंतू आहे. नायलॉन तंतूंचा विकास हे वस्त्रोद्योगच नव्हे तर रासायनिक उद्योगातील मूलभूत संशोधनातील अगदी सुरुवातीच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचे यश होते. डम्य़ू पॉन्ट या अमेरिकन कंपनीमध्ये हे संशोधन झाले. वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली त्याच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केले. या संशोधनातून तीन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. पूर्वी बहुवारिक (पॉलिमर) म्हणजे काय हे माहीत झाले होते. परंतु शास्त्रज्ञांचा असा ग्रह होता की बहुवारिक म्हणजे ते तयार करणाऱ्या रेणूंचा एक समूह असतो व त्यातील रेणू हे एका अनामिक बलाच्या साहाय्याने किंवा अनामिक बंधांनी जोडलेले असतात. परंतु वॅलेस कॅरोथर्स व त्याच्या सहकाऱ्यांनी हे सिद्ध केले की बहुवारिकामध्ये त्यातील रेणू समूहाच्या रूपात नसून ते एकमेकांशी रासायनिक किंवा इतर बंधांनी साखळीसारखे जोडलेले असतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॅलेस कॅरोथर्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मोठय़ा लांबीच्या बहुवारिकाची निर्मिती करण्याची प्रक्रिया विकसित केली. त्या पूर्वी प्रयोगशाळेत बहुवारिके बनविण्याची कला शास्त्रज्ञांनी विकसित केली होती, परंतु ही बहुवारिके अल्प लांबीची किंवा कमी रेणुभार (मोलेक्युलर वेट) असलेली अशी होती. वॅलेस कॅरोथर्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रथमच ४००० किंवा अधिक रेणुभार असलेले बहुवारिक तयार करण्यात यश मिळवले, जे त्यापूर्वी अशक्यप्राय वाटत होते. याच संशोधनादरम्यान त्यांनी एकरेषीय पॉली कंडनसेशन ही बहुवारिक बनविण्याची प्रक्रिया विकसित केली आणि त्याचे पेटंटही घेतले. पॉली कंडनसेशन प्रक्रियेने त्यांनी २५००० पेक्षा अधिक रेणुभार असलेले बहुवारिक प्रयोगशाळेत तयार करण्यात यश मिळविले. या बहुवारिकास त्यांनी उच्च बहुवारिक (सुपर पॉलिमर) असे नाव ठेवले. यालाच महारेणू (मॅक्रो मोलेक्युल) असेही म्हटले जाते. डायबेसिक आम्ल आणि ग्लायकॉल ही रसायने वापरून त्यांनी सुरुवातीला ईस्टरचा रेणू बनविला आणि त्यांचे बहुवारिकीकरण करून २५००० रेणुभारापर्यंत लांबी असलेले पॉलिस्टरचे बहुवारिक तयार केले. हे बहुवारिक घनरूपात कठीण, अपारदर्शक असते आणि तापविल्यावर त्याचे पारदर्शक, चिकट अशा द्रवात रूपांतर होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा