नैसर्गिक तंतूमध्ये असलेला रेशीम हा प्राणिजन्य तंतू आहे. तुतीच्या पानावर पोसलेल्या किडय़ापासून मिळालेले रेशीम (तुती रेशीम) आणि वेगवेगळ्या जंगली झाडांच्या पानावर वाढवलेल्या किडय़ापासून मिळणारे रेशीम (जंगली रेशीम) असे दोन मुख्य प्रकार रेशमात आहेत. तुती रेशीम हे तलम असते तर जंगली रेशीम जाडेभरडे असते. तुती रेशमाबाबतीत किडय़ाचे फुलपाखरात रूपांतर होण्याआधी त्या कोशातून रेशीम मिळवतात. त्यामुळे सलग लांबी मिळते आणि तलम, मजबूत रेशमी धागा मिळतो. कोश फोडून पतंग बाहेर आल्यास त्या रेशमाचे तंतू तुटतात, तरी त्यापासून वेगळ्या पद्धतीने रेशीम धागा तयार करतात. पण मजबुतीच्या दृष्टीने तो डावा असतो. रेशीम धागा तयार करण्याची हीच पद्धत एरी रेशमासाठी वापरतात.
रेशमाची पाणी शोषून घेण्याची क्षमता चांगली असते. रेशमाच्या तंतूंना चमक असते. लोकरीपेक्षा कमी तापमानाला रेशमाची रंगाई करता येते. तसेच रेशमाची रंगाई आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी दोन्ही प्रकारच्या रंगांनी करता येते. रेशमाची रंग शोषून घेण्याची क्षमता चांगली असते. या सर्वामुळेच रेशमाला गडद आणि आकर्षक रंगात रंगवता येते.
रेशीम मुख्यत: फायब्रोईन आणि सेरिसिन या दोन प्रथिनांचे बनलेले असते. याखेरीज मेण, रंगद्रव्य, राख इ. इतर घटकांचा अंतर्भाव रेशमात अल्प प्रमाणात असतो. रेशमाच्या रासायनिक घटकांमुळे ते पाण्यात किंवा अल्कोहोल, बेन्झीन इ. द्रावकात विरघळत नाही. गरम अॅसेटिक आणि फॉर्मिक आम्लांच्या तसेच ऑक्झालिक, सायट्रिक आणि टार्टारिक इ. आम्लांचा रेशमावर सावकाश परिणाम होतो. रेशमाच्या या गुणधर्माचा विचार आपण रेशमी वस्त्रे धुताना करायला हवा.
जंगली रेशमाच्या टसर, मुगा व एरी या महत्त्वाच्या जाती आहेत. टसर रेशीम ओक वृक्षांच्या पानांवर वाढलेल्या किडय़ापासून मिळते. हे रेशीम बदामी, फिकट तपकिरी रंगाचे असते. ऐन व अर्जुन झाडांच्या पानावर वाढवलेल्या किडय़ापासून मिळालेले टसर रेशीम रुपेरी, पिवळसर, तपकिरी, हिरवट रंगाचे असते. टसर धाग्यात कॅल्शिअमयुक्त पदार्थ असल्याने उकळत्या सोडिअम काबरेनेटची प्रक्रिया करून तो काढून टाकावा लागतो. मुगा जातीचे रेशीम सोनेरी रंगाचे असल्याने त्याचा वापर जरीऐवजी करतात. एरी जातीचे रेशीम एरंडीच्या झाडाच्या पानावर पोसलेल्या किडय़ापासून मिळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा