समाजामध्ये दिवसेंदिवस पर्यावरणविषयक जागृती वाढत आहे, त्याप्रमाणे सेंद्रिय पदार्थाची मागणीसुद्धा वाढत आहे. उत्पादक शेतकरी, उपभोक्ता व पर्यावरण या सर्वासाठी ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये काही गमतीदार विरोधाभासही दिसून येतात. उदा. सेंद्रिय पदार्थाची मागणी व वापर करणाऱ्या वर्गालाच मार्च महिन्यातील महागडा (व बहुतेक वेळा बेचव) आंबा हवा असतो. परदेशी महागडय़ा भाज्या, चीज या वर्गासाठीच आयात केले जातात.
 तसेच आपल्या इथे सेंद्रिय उत्पादनांसाठी विश्वसनीय प्रमाणीकरणाची पद्धतही तयार झालेली नाही. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती, पर्यावरण या विषयांतील तज्ज्ञ मंडळी आपलीच बाजू हिरिरीने मांडत राहतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सहजपणे कोणते निकष वापरता येतील, याचा आपण विचार करू.
१. ताज्या भाज्या, फळे यांची उपयुक्तता सर्वानाच ठाऊक आहे. त्यांच्या चवीतील फरकही सहज लक्षात येतो. योग्य आहाराच्या दृष्टीने, आपल्या शंभर किमी परिसरात त्या त्या हंगामात तयार होणाऱ्या भाज्या, फळे खाणे असा सोपा निकष ठरवता येईल. खरा नसíगक हंगाम कोणता, आपल्या परिसरात कोणत्या गोष्टी पिकतात, याची माहिती मात्र करून घ्यावी लागेल.
२. शेतीमालातील ब्रँडेड पदार्थापासून (उदा. हापूस आंबा, दिल्ली राईस) सावध राहा. अशा पदार्थाना उत्तम दर मिळतो. त्यामुळे त्यांच्यासाठी खते, कीटकनाशके यांवर भरपूर खर्च करणे शक्य असते. त्यात फसवणुकीची शक्यताही जास्त असते. हापूस सर्वश्रेष्ठ मानता, सर्व जातींच्या आंब्यांची गोडी चाखून पाहिली पाहिजे.
 करवंदे, जांभळे इ. रानफळे निव्वळ गोळा केली जातात, तसेच कोरडवाहू तृणधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी, स्थानिक भात इ.) यांच्यासाठी खते आदींचा खर्च शेतकऱ्याला परवडतच नाही. पावसाळ्यामध्ये असंख्य रानभाज्या उपलब्ध असतात.
 थोडक्यात, स्वस्त समजले जाणारे बहुतेक अन्नपदार्थ पौष्टिक असून ते आरोग्यासाठीही उत्तम असतात. त्यांचा नवनवीन प्रकारे वापर करण्याची प्रयोगशीलता अंगी बाणवायलाच हवी. निसर्गचक्रात सारे सजीव, निर्जीव जोडले गेले आहेत. प्रत्येक ऋतूत शरीराला जे अन्नघटक आवश्यक असतात, ते निसर्ग त्या त्या वेळी देत असतो. त्याप्रमाणे आपला अन्नव्यवहार राखला पाहिजे.
श्रीनिवास पंडित (पुणे) office@mavipamumbai.org
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  

वॉर अँड पीस: हाडांचे विकार : भाग ४

९) हाडे पोकळ होणे – शतावरीघृत सकाळ सायंकाळी दोन चमचे; अमृतप्राशघृत मोठय़ा मात्रेने दोन वेळा घ्यावे. आस्कंदचूर्ण रात्रौ एक चमचा दुधाबरोबर किंवा अश्वगंधापाक दोन वेळा दोन चमचे घ्यावा. १०) वृद्धांची हाडे वाकणे – पाठ, छाती कंबर पायाची हाडे वाकल्यास, उपचारांची पराकाष्ठा लगेचच करावी. काही मर्यादेत उपयोग होतो. कुक्कुटांडत्वक् भस्म सकाळ-सायंकाळ एक ग्रॅम घ्यावे. सोबत लाक्षा, आस्कंद शतावरी व सुंठचूर्ण तारतम्याने तूप, मध किंवा दुधाबरोबर घ्यावे. भूक सुधारणे, अन्नपचनाकरिता अश्वगंधारिष्ट किंवा दशमूलारिष्ट दोन्ही जेवणानंतर चार चमचे पाण्याबरोबर घ्यावे. रुग्णालयीन उपचार – १) टाचेचे हाड वाढणे – नेमक्या जागी खूण करावी. लालबुंद तापलेल्या सळईचा डाग द्यावा व वर राख लावावी.  हाड वाढण्याची क्रियाच थांबते. २) मणक्यांचे व त्यांच्या चकत्यांचे दुखणे – कठीण अंथरुणावर अर्धा तास उताणे, शवासनांत झोपवून ठेवावे. कडू रसांच्या वनस्पतींच्या काढय़ांचा बस्ती (एनिमा) द्यावा. त्यामध्ये दूध, तूप अधिक मिसळावे. नेमक्या जागी लेपगोळीचा गरम, दाट लेप लावावा. घरी नेटाने लेप लावले जातेच असे नाही. ३) हाडय़ाव्रण – वरीलप्रमाणे बस्ती देणे. त्रिफळा काढय़ाने व्रण धुवून, एलादि तेलाची वात व्रणांत ठेवावी. असे व्रणोपचार रोज करावेत. ४) पायाच्या लांबीत कमी अधिकपणा – बालकांचा मुडदुस व वृद्धांचा अस्थिसंकोच व वाकडेपणा या विकारात तबीयतशीर बलदायी महानारायण तेलाने मसाज करावे. तेल जिरल्यावर सावकासपणे गरम पाण्यात मीठ टाकून सौम्य शेक घ्यावा. ५) हाडे पोकळ होणे – कडू रसांच्या वनस्पतींच्या काढय़ांमधे तेल किंवा तूप मिसळून त्यांचा बस्ती (एनिमा) घ्यावा.
उपचारांची दिशा – हाडे वाढली असल्यास कापून टाकणे हाच एक उपाय बहुधा राहतो. मात्र एकदा वाढून पुन्हा वाढले तर काय हा प्रश्न पुढे उभा राहतोच. वातवृद्धी, मांस, मेद व मज्जाक्षय अशामुळे हाडांचे विकार बळावले असतील तर तर्पण, बृहण, कफवर्धक, स्निग्ध, सिद्ध तूप, दूध व बस्ती असे उपचार करून पहावेत.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      लढा-४ (राजकारण)   

त्या भूखंडाच्या लढय़ाच्या निमित्ताने अनेक माणसे भेटली. त्यातले एक रामराव आदिक. मोठे देखणे आणि लोभस व्यक्तिमत्त्व होते. ते त्या काळात नगरविकास मंत्री होते. ती गाय तेव्हा एवढी दुभती नसणार. त्याकाळात काँग्रेस एकच पक्ष होता. चर्चेच्या ओघात स्कॉटिश शाळेने ही जागा आमची होती असे म्हणताच हसतमुख रामरावांनी त्यांना झिडकारले आणि डॉ. थत्ते यांचे म्हणणे काय आहे, हे समजून घेण्यासाठी हे निमंत्रण आहे असे एका बैठकीत निक्षून सांगितले.
बैठक संपल्यावर तिथला एक उपसचिव मला खुणावू लागला. मी जवळ गेल्यावर मला म्हणाला, दर सोमवारी मी तुम्हाला ही भानगड कशी शिजते आहे ते कळवत जाईन. वॉटरगेट या अमेरिकेत घडलेल्या प्रकरणात सरकारमधला एक अधिकारी वार्ताहरांना बातम्या पुरवत असे. त्याचे नाव ऊीस्र् ळँ१ं३ ठेवले गेले. हा उपसचिव पुढे माझा रें’’ Deep Throat ठरला. मला इतक्या बित्तंबातम्या पुरवत असे आणि मी त्या अशा तऱ्हेने वापरत असे की हिंदुजा आणि महानगरपालिका चकित होत असत. देखणे रामराव आदिक हौशी गडी होते. त्यामुळे त्याचे परिणाम थोडेफार त्यांना भोगावे लागले.
महानगरपालिकेतही एक उदयोन्मुख नेता भेटला. भूखंडाची कहाणी सांगितल्यावर त्याने मान हलवली, वळवली. एक हात हनुवटीवर ठेवून दुसऱ्या हाताने कणभर का होईना डोळे पुसले. याला काय घडले आहे ते कळत होते, पण याचे हात जणू बांधले गेले होते. पोटतिडिकीने राजकारणात शिरलेल्या अनेक व्यक्तिमत्त्वांची पोटतिडीक  गेली.  पुढे त्यांची पोटे सुटली. त्यांनी संस्था किंवा प्रतिष्ठाने उभी केली आणि या संस्थानांमधून मिळालेल्या सत्तेच्या जोरावर पुढे राजकारण केले.
 हा जो इतिहास घडला आणि त्यात पक्षांतरे झाली, त्याचे हा उदयोन्मुख उमदा नेता पुढे एक नामी उदाहरण ठरला. माणूस प्रवाहपतीत होतो आणि जेवढी ऊर्जा जास्त तेवढी वरखालीही जास्त होते असे जे म्हणतात ते खरेच आहे. त्या भूखंडाच्या निमित्ताने मला ही दर्शने घडली .पण ज्ञानेश्वरी वाचत असल्यामुळे राग, उद्वेग, चीड या भावनांचा कधीही स्पर्श झाला नाही. ‘चळे शुष्के वायुवसे’ अशी सुरुवात करत वाळलेले पान वाऱ्यावर कसे वरखाली होत भिरभिरते तसेच तुझे होत आहे किंवा रथावर आरूढ झालेल्या माणसाला शेवटी रथच पुढे मागे करतो. त्या ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा नाहीतरी थोडाफार परिणाम माझ्यावर झाला असणार.

रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत ५ जुलै

१९१२ > लेखक, पत्रकार आणि कथेचे विविध प्रकार मराठीत रुजविणारे दत्तात्रय पांडुरंग खांबेटे यांचा जन्म. चुरचुरीत विनोद आणि राजकीय विषयांवर मर्मवेधक लेखन करण्यात त्यांचा हातखंडा. ‘पोहिमा’, ‘येडछाप’, ‘उपहास’ आदी कथासंग्रह प्रकाशित. ‘भीतीच्या छाया’ हा त्यांचा भयकथासंग्रह गाजला.  विज्ञानकथा हा प्रकार मराठीत रुजवला तो खांबेटे यांनी.
१९२० > कथा-कादंबरीकार आणि संस्कृत व पौराणिक साहित्याचे अभ्यासक आत्माराम नीळकंठ साधले यांचा जन्म. ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ हा त्यांचा गाजलेला ललित ग्रंथ. याशिवाय ‘आनंदध्वजाच्या कथा’ या शृंगारिक वळणाच्या कथा, ‘महाराष्ट्र रामायण’ हे खंडकाव्य, ‘रुक्मिणी स्वयंवर’ हा अनुवाद, ‘लढाई संपल्यावर’ ही कादंबरी अशी ६० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
१९३३ >  लेखक आणि सूचीकार सुरेंद्र आत्माराम गावस्कर यांचा जन्म. ‘हस्तलिखितांची वर्णनात्मक नामावली’ही  उपयुक्त अशी सूची त्यांनी तयार केली.
१९६३ > अध्यात्मपर ग्रंथाचे लेखक, अनुवादक नागेश वासुदेव गुणाजी यांचे निधन. स्वामी रामकृष्ण परमहंस व रमण महर्षी यांची चरित्रे तसेच काही अनुवादित साहित्य त्यांच्या नावावर आहे.
 संजय वझरेकर

Story img Loader