भारतातील बहुतेक शेती कोरडवाहू आहे. अशा शेतीत रासायनिक खते इत्यादींचा वापर किमान केला जातो, हे आपण पाहिले. म्हणजेच कापूस, हापूस आंबा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला सोडून इतर उत्पादने बहुतेकदा सेंद्रियच असतात. पण आपण सेंद्रिय शेती करत आहोत, हे त्या शेतकऱ्यालाही ठाऊक नसते. पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या पद्धतींचा वापर तो निष्ठेने करतो, परंतु त्यामागील शास्त्र, कार्यकारणभाव त्याला ठाऊक नसतात. तसेच योग्य (रासायनिक वा सेंद्रिय) पद्धतींचा वापर केल्यास एकरी जास्तीत जास्त किती उत्पादन मिळू शकते, याचीही त्याला कल्पना नसते.
परंपरागत पद्धतींमध्ये उत्पादन कमी मिळते, पण खर्चही कमी येतो. जमिनीचा कसही टिकून राहातो. सेंद्रिय शेती डोळसपणे, प्रयोगशीलतेने केली, तर जमिनीचा कस व उत्पादन सुयोग्य पातळीवर टिकून राहतात. अशा मालाचा सातत्याने पुरवठा झाला तर दरही उत्तम मिळतो.
पण अस्मानी सुलतानीमुळे आपल्या शेतकऱ्यांची वेगळे काही करून पाहण्याची मानसिक व आíथक शक्ती नाहीशी झाली आहे. तसेच सेंद्रिय शेतीमध्ये सातत्याने कमाल उत्पादन घेणे, ही गोष्ट कठीण आहे. रासायनिक शेतीसारखे सरळ ठोकताळे त्यात मांडता येत नाहीत. त्यासाठी जमिनीचे गुणधर्म, हवामान व उत्पन्न घ्यायचे आहे ती वनस्पती, यांसंबंधी किमान काहीसे तपशील मिळवावे लागतात. कोणत्याही दोन दिवसांचे हवामान पूर्णत: सारखे नसते. तसेच जमिनीचे कोणतेही दोन तुकडे शंभर टक्केसारखे नसतात, हे लक्षात घेतल्यावर हा अभ्यास किती गहन आहे, हे समजू शकते.
म्हणजेच सेंद्रिय मालाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा व्हायचा असेल तर १. सेंद्रिय शेतीचे पर्यावरणीय व आíथक महत्त्व शेतकऱ्यांच्या लक्षात येणे, २. त्यातून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्याला किफायतशीर ठरावे, यांसाठी आवश्यक त्या पद्धती स्थानिक पातळीवर विकसित करणे, ३. खऱ्याखुऱ्या सेंद्रिय उत्पादनांविषयी ग्राहकांचे प्रबोधन करणे व पुरवठा यंत्रणा विकसित करणे या किमान आवश्यकता आहेत. यादृष्टीने, शेतकऱ्यांचे एकूण हित साधण्यात सरकारी, निमसरकारी, सहकारी यंत्रणा (मार्केट यार्ड, बहुतेक सहकारी कारखाने, दूध महासंघ) अयशस्वी ठरले आहेत, हे दिसून येते.
श्रीनिवास पंडित (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
जे देखे रवी.. लढा- ५ (पत्रकार)
त्या काळात जेव्हा या भूखंडाची चळवळ जोरात होती तेव्हा स्कॉटिश शाळेत शेजार-पाजाऱ्यांची एक बऱ्यापैकी मोठी सभा घेतली गेली. त्याचा पुढाकार त्या काळचे पदार्थविज्ञानाचे एल्फिन्स्टन महाविद्यालयातले नामवंत प्रा. कामत यांनी घेतला होता. ते माझ्यापेक्षा खूपच मोठे होते, पण समाजवादाचा स्पर्श असलेल्या या विद्वानाने मला पुढारीपण बहाल केले. सरकारी नोकरी केलेल्या माणसाचा मी मुलगा बहुतांशी अनुदानित शाळांमध्ये मराठीत शिकलेला. तेव्हा शाळेत ही सभा घेतली जावी याने मी बुचकळ्यात पडलो. तेव्हा स्कॉटिश शाळेचे प्राचार्य मला म्हणाले, तू चळवळ करू शकतोस, तर माझी शाळाही मागे हटणार नाही. आम्ही सरकारवर विसंबून नाही. सभा गाजली. माझ्या सासूबाई आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात कौतुक आणि मुलीबद्दल काळजी अशा दोन्ही भावना उमटल्या. माझी बहीण मला म्हणाली, कशाला जीवाचे रान करतोस ? कोणीतरी डूक धरेल. पण माझ्या पत्नाने मात्र कधीच एकदाही विरोध केला नाही. त्या सभेला आलेली तेव्हाची सगळी माणसे आता सत्तरी ऐंशीच्या पुढे आहेत. त्यातली बरीच त्या भूखंडावरच्या आम्ही केलेल्या बागेत हातात काठी घेऊन फिरतात. आम्ही आठवणींना उजाळा देत कधी तरी गप्पा मारतो. त्या उद्यानाचे नंतर नामकरण झाले ते डॉ. धोटे यांच्या नावाने. महाराष्ट्रातले एक जुने उद्योजक, या भागातले रहिवासी. अॅस्पिरिन हे औषध त्यांनी प्रथम भारतात आणून त्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन केले. स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतलेले आणि संयुक्त महाराष्ट्राचे कडवे आणि प्रबळ समर्थक. हे नामकरण झाले तेव्हा मला हायसे झाले. मला भीती वाटायची की कोणी नेहरू, गांधी किंवा तत्सम पुढाऱ्यांचे नाव ठेवील. त्या सभेला कसा कोणास ठाऊक एका इंग्रजी वृत्तपत्राचा वार्ताहर आला होता. त्याने बातमी छापली. एका मराठी पत्रकाराने ‘माहीममधील भूखंडावर कुऱ्हाड’ असा मथळा देऊन बातमी दिली. पर्यावरण मुळी त्या काळच्या वर्तमानपत्राचा भागच नसे आणि मुंबईतील नव्हे तर कदाचित भारतातील ही पर्यावरणाची शहरातली पहिली लढाई होती, याचे आम्हाला कोणालाच भान नव्हते. हल्ली हल्ली या प्रकरणाला थोडे विपरीत वळण लागले. नंतर ‘लोकसत्ता’चे संदीप आचार्य यांच्याकडे हे प्रकरण गेले. त्यानेही मोठय़ा हिरिरीने हे प्रकरण लावून धरले. या चळवळीच्या काळात एक अजब व्यक्तिमत्त्व भेटले. ते म्हणजे अब्दुल रहमान अंतुले. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री. या माणसाने एक घाव दोन तुकडे या न्यायाने त्या प्रकरणाचा निपटारा केला आणि जनतेला तो भूखंड परत केला. त्याची माहिती पुढच्या लेखात.
रविन मायदेव थत्ते
वॉर अँड पीस: हाडांचे विकार – श्रेयनामावली भाग ५
सुधा किंवा चुना गटांतील नाना तऱ्हेची द्रव्ये आयुर्वेदीयांच्या वापरांत आहेत. मोत्यापासून शंख, शिंपा, कासवाची पाठ इत्यादी अनेक पदार्थ रोग, स्थान, अवस्थापरत्वे वापरले जातात. कोंबडीच्या अंडय़ाच्या टरफलाचे भस्म ही आयुर्वेदीय औषधांत नवीन भर आहे. काही वेळेस कोंबडय़ांची अंडी टरफलाशिवाय जन्मतात. त्या कोंबडय़ांना टरफलासकट त्यांचे खाद्य दिले, की त्यांचा हा विकार सुधारतो.
टरफले मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून त्यातील पातळ आवरण काढावे, सुकवावी. नंतर तापलेल्या तव्यावर चांगली परतावी. टरारून फुगतात. त्यावर बारा तास झाकण ठेवावे. नंतर काढून, खलून, बारीक करून वापरावे. इतर भस्मांप्रमाणेच कोरफडीच्या गरात खलून, टिकल्या करून वाळवाव्या. नेहमीच्या पद्धतीने संपुटात बंद करून, वाळवून अग्नि द्यावा, उत्तम भस्म होते.
अपुरी वाढ झालेली बालके, मुडदूस, पांडू, वृद्धांची हाडे ठिसूळ, आक्रसणे या विकारात मधतुपाबरोबर द्यावे. दमा, खोकला, श्वेतप्रदर, थुंकीतून रक्त पडणे, उर:क्षत, अतिसार, प्रमेह इ. विकारात उत्तम लाभ होतो. मात्रा एक ग्रॅम दोन वेळा.
चोपचिनी, द्वीपान्तखचा, चोबचिनी, शूकचिनी या नावाचे कंद चीनमधून येतात. तांबट बटाटय़ासारखे, खडबडीत, गुलाबी रंगाचे, गंधरहित चवीने पिठुळ हे जुनावले म्हणजे त्यांचा रंग गहिरा होतो. कीड लागते. कीड लागलेले निरुपयोगी असतात. गुलाबी, जड, कठीण गाठी नसलेले कंद घ्यावेत. चोपचिनी किंचित कडू, उष्ण, अग्निदीपक, मलमूत्र साफ करणारी स्निग्ध, वातहर, वेदनास्थापक, रक्तशुद्धिकर, पौष्टिक व रसायन आहे. गरमी परमा, दात किडणे, उन्माद, अपस्मार, शरीरपीडा, फिरंगोपदंश यामुळे उत्पन्न झालेले सांध्याचे विकार, सुजेकरिता उपयुक्त आहे. ‘चोपचिन्यादि चूर्ण’ हा पाठ उपदंश, लहान मुलांचे किडके दात यावर उपयुक्त बल्यपाक आहे. चौगुण चूर्ण स्त्रिया, कमजोर पुरुष यांच्याकरिता वरदान! त्यात आस्कंद, वाकेरी, भुईकोहळा, चोपाचिनी, शतावरी अशी पाच औषधे आहेत.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत ६ जुलै
१८३७> प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ आणि प्रकांड संस्कृतपंडित रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म. त्यांनी तयार केलेल्या संस्कृतच्या पाठय़पुस्तकांनी अगणित विद्यार्थ्यांना अनेक वर्षे उत्तमप्रकारे पाठ दिले.
लंडन येथे भरलेल्या प्राच्यविद्या परिषदेत ‘नाशिक येथील शिलालेख’ हा निबंध त्यांनी वाचला. ‘रामकृष्ण भांडारकर यांनी धर्मपर लेख’ व दख्खनचा प्राचीन इतिहास ही पुस्तके लिहिली.
१९८१> संतकवी, एक थोर सत्पुरुष गुलाबराव महाराज यांचा जन्म. काही महिन्यांत अंधत्व आले. तरीही अनेक ग्रंथांचे लेखन. सांख्य, योग, वेदांत आदी विषयांवर प्रवचने तसेच हजारो प्रासादिक अभंग, ओव्या, पदे, लावण्या इ. काव्यरचना. अवघ्या ३४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
१९२७> कथा, कादंबरीकार, नाटककार व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म. उंबरठा, काळी आई, वारी असे अनेक कथासंग्रह. वावटळ, कोवळे दिवस या कादंबऱ्या. त्यांच्या ‘सत्तांतर’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार. ‘तू वेडा कुंभार’, ‘बिकट वाट वहिवाट’ मिळून १० नाटके. चित्रदर्शी प्रसंग चित्रणे, जिवंत व्यक्तिचित्रणे, झाडे, पशू-पक्षी, माणसे या साऱ्यांनी त्यांचे लेखन समृद्ध केले.
संजय वझरेकर