गवत, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या हे कागद तयार करण्यासाठी लागणारे  मुख्य पदार्थ हे तंतुमय असतात. कागद म्हणजे तंतुमय पदार्थाची चटई. कागद तयार करताना तंतूंची भूमिका फार महत्त्वाची असते. गवत, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या या पदार्थातील महत्त्वाचा घटक म्हणजे सेल्युलोज. सेल्युलोजमुळे वनस्पती जमिनीवर ताठपणे उभ्या राहू शकतात. सेल्युलोज हे मुख्यत: वनस्पतींच्या पेशीभित्तिकांमध्ये असते. सेल्युलोज हा तंतुमय रासायनिक पदार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन आणि  कार्बन या मूलद्रव्यांनी तयार झालेला असतो. सेल्युलोजचे कण एकमेकांशी साखळीने जोडलेले असतात.
सेल्युलोजचे प्रमाण वनस्पतींच्या काही भागांत जास्त तर काही भागांत कमी असते. आपला नेहमीचा कापूस, शेवरीचा कापूस, सावरीचा कापूस यामध्ये बीच्या बाजूला, ज्यूट-अंबाडी यांच्या सालात तर गवत-बांबूच्या खोडात, केळीच्या पानात, नारळ-सुपारीच्या फळाभोवताच्या आवरणात सेल्युलोजचे तंतू जास्त असतात. कापसातील बोंडात सेल्युलोज तंतू सर्वात जास्त असतात. वनस्पतींमध्ये सेल्युलोजबरोबर पॅन्टाझोन, लिग्नीन रेझीन असे काही पदार्थसुद्धा असतात. यांची सेल्युलोजशी घट्ट मत्री असते. हे पदार्थ सेल्युलोजच्या तंतूंना चिकटलेले असतात. फाटलेल्या कागदाच्या कडेला आपल्याला जे बारीक बारीक तंतू दिसतात, ते तंतू कगदात किती प्रामाणात आहेत? त्यांचा आकार कसा आहे? हे तपासण्याची एक सोपी चाचणी आहे. कागदाचे बारीक बारीक तुकडे करून ते पाण्यात उकळले जातात. कागदातील सेल्युलोजचे तंतू पाण्यात विरघळत नाहीत. या पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवतात. ही काचपट्टी ओव्हनमधे ठेवतात. ओव्हनधील उच्च तापमानाला पाण्याची वाफ होते. कागदातील तंतू काचपट्टीवर चिकटून राहतात. सूक्ष्मदर्शकाखाली तंतूचा आकार कसा आहे ते समजते, त्यावरून तंतू किती मजबूत आहे ते कळू शकते. हे असे आहे कागदाच्या फाटलेल्या तंतूमय कडांचे रहस्य.
एकूण काय या  सेल्युलोजच्या तंतूमुळे कागद आहे. कागदामुळेच आपला संवाद आहे.
सुचेता भिडे, कर्जत

प्रबोधन पर्व: ‘बहुजनवादी राजकारणाचे शिल्पकार’ – महर्षी वि. रा. शिंदे
जातिव्यवस्थाविध्वंस आणि अस्पृश्यतानिवारण यांविषयी मूलगामी चिंतन करणाऱ्या आणि त्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या विठ्ठल रामजी शिंदे यांना ‘महर्षि’ ही पदवी दिली गेली आहे. शिंदे यांनी विसाव्या शतकात ‘बहुजनवादी राजकारणा’ची संकल्पना मांडली, त्याचा पुरस्कार केला आणि त्याची अपरिहार्यता परोपरीने महाराष्ट्राला पटवून देण्याचा प्रयत्नही केला. त्यांनी आपल्या उक्ती आणि कृतीला अभ्यास-संशोधनाची जोड दिली. अस्पृश्यांच्या उद्धारामुळे केवळ त्यांचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाचाच विकास होईल या धारणेतून त्यांनी ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ची १९०६मध्ये स्थापना केली. शिक्षणप्रसार, व्यवसाय, दुष्काळग्रस्तांना मदत, मोफत दवाखाने, वसतिगृहे, रात्रशाळा, अनाथालये व वृद्धाश्रम अशी बहुविध कामे या संस्थेच्या अंतर्गत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. प्रार्थना समाज व सत्यशोधक समाज यांनी अस्पृश्यतानिर्मूलनाचे काम एकत्रितपणे करावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. ते प्रार्थना समाजाचे निष्ठावंत प्रचारक होते.
म. फुल्यांच्या स्त्रीशूद्रातिशूद्र संकल्पनेचा कालसापेक्ष विस्तार करणाऱ्या आणि लो. टिळक सामाजिक समतेच्या तत्त्वाला विरोध करतात म्हणून त्यांना राष्ट्रनेतेपदास अपात्र म्हणणाऱ्या शिंदे यांनी स्वत:ला महात्मा गांधी यांच्या राजकारणाशी जोडून घेतले. धर्म, दर्शने, इतिहास, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांचा अतिशय बारकाईने अभ्यास करणाऱ्या शिंदे यांनी सामाजिक समतेच्या कसोटी जे टिकेल ते ग्राह्य़ आणि जे टिकणार नाही ते अग्राह्य़ मानत ‘ब्राह्मणेतर’ या शब्दापेक्षा ‘बहुजन’ या नावाने आपला पक्ष निर्धारित केला. या संकल्पनेची तत्त्वप्रणाली मांडली. त्याप्रमाणे सक्रिय राजकारणही केले. पण त्यांना त्यात फारसे यश आले नाही. नंतरच्या काळात तर त्यांचा विचारवारसा त्यांच्या समाजाने आणि महाराष्ट्रानेही काहीसा दुर्लक्षितच केला.

मनमोराचा पिसारा: सांझ ढले , गगन तले
माझा एकटेपणा मला कधी आणि कुठे भेटला, हे काही आठवत नाही. पण सुरेश वाडकरांनी म्हटलेलं ‘सांझ ढले, गगन तले हम कितने एकाकी है’ हे गाणं ऐकलं की त्या गहिऱ्या सुरांनी मनाला हुरहुर लागते आणि एकाकीपणा पुन्हा भिडतो.
‘उत्सव ’ चित्रपटातलं हे गाणं चारुदत्ताने वसंत सेनेच्या विरहानं व्याकूळ होऊन म्हटलंय, त्यामुळे एकाकी या शब्दात इतर हिंदी गाण्यात असते तशी ‘तनहाई’ची किंचित फिल्मी डूब आहे. गाण्यातल्या पुढच्या अंतऱ्यात तीच वेदना अतिशय गोड उपमांच्या आधारे व्यक्त होते. ती मर्यादा सुटावी म्हणून या गाण्याचा मुखडा मनात घोळवत बसलो आणि एकाकीपणाचे हळुवार पदर उलगडू लागले. एकाकी वाटणं ही संध्याकाळची खासियत असली तरी एकटेपणा दिवसभर आणि जन्मभर असतोच आपल्याबरोबर. पण तरी कातरवेळचं एकाकीपण मनात अधिक घुटमळतं. दिवसभर मागेपुढे करणाऱ्या आपल्या सावल्या सांजवेळी लांब जातात आणि अंधारलेल्या वाटेवर विरून जातात. दिवसभर अंगावर शाल पसरणारं आकाश काळोखतं. कारण दिवसाचा राजा ‘सूर्य’ आपला निरोप घेतो. सखेसोबती आसपास असतातच असं नाही. सगळं निपचित झालं की, एकटेपणा अंगावर येतो.
आपण सकाळी त्याला आंघोळ घालून इस्त्रीचे कपडे घालून कामाला पाठवलेलं असतं, तेव्हा समोरच्या संगणकाच्या पडद्यावर त्याला एकही ‘बाइट’ मिळत नाही. तो गुपचूप काम करीत राहतो. कामानिमित्त बाहेर पडल्यावर मात्र तो गर्दी बघून बावरतो, हरवल्यासारखा वाटतो आणि त्यातून उसंत मिळाली की म्हणतो, ‘गर्दीत असलो तर एकटेपण फारच नकोसं वाटतं रे!’ मी माझ्या एकटेपणाला जवळ करून रुमालाच्या घडीत ठेवतो.
रात्री मग मी त्याला आपलंसं करतो. कुशीत घेऊन निजतो. मग पुन्हा सकाळ येतेच. म्हणजे दिवेलागणीच्या वेळीच एकाकीपणा मला छेडतो, सुस्कारे सोडतो आणि बिलगून बसतो. संध्याकाळ असतेच तशी.
आता या एकटेपणाची समजूत काढायला हवी. त्याची विचारपूस करायला हवी. मग एकाकीपणाशी गजाली सुरू होतात. ‘बघ मित्रा, एकटेपणा हे अटळ वास्तव असतं रे. आपण जन्म घेताना टाहो फोडून रडतो. कारण आईच्या उदरातील सर्वात सुरक्षित स्थळापासून दूर व्हावं लागतं. अरे आई झाली म्हणून तिनं तरी किती काळ सोसावं सगळं?
आता इकडे-तिकडे जगात सर्वत्र बघ. प्रत्येक जणच एकटा असतो. कोणी त्याला भिऊन चैनी विलासात आपल्या एकटेपणाला बुडवून टाकतात. तर कोणी मित्र स्वजनांच्या घोळक्यात त्याला बांधून टाकतात. एकटेपण नाकारलं तरी ते नाहीसं होत नाही. सगळ्यांची तीच तर वेदना असते. तेव्हा तू माझ्याशी गट्टी कर. आपण दोघे एकमेकांना साथ करू. माझ्या चुकांबद्दल तू मला रागे भरू नकोस नि टाकून बोलू नकोस. मित्रासारखे राहू आपण. स्वत:मध्ये रममाण झालो की मन शांत आणि प्रसन्न राहतं. एकटेपणाचं आपल्याशी एकजीव होणं म्हणजेच समाधी अवस्था रे! माझा एकटेपणा खुदकन हसला, म्हणाला, तरी रोज संध्याकाळी का हुरहुरतं? दिवसभरच्या रगाडय़ात विसरायला होतं ना. म्हणून चल आपण स्वस्थ बसू. लांब श्वास घे आणि प्रदीर्घ उच्छ्वास सोड. बघ हळूहळू विरघळून जाईल एकटेपणा..
डॉ.राजेंद्र बर्वे  

Story img Loader