मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी आपण पर्फ्यूम्सचा वापर करतो, तर कधी कधी दरुगधी घालवण्यासाठीही करतो. पर्फ्यूम्सचा वास हा काही नुसता, त्यात वापरलेल्या रसायनांशी संबंधित नसतो. त्यात आणखीही काही महत्त्वाचे घटक असतात.
आपल्या सर्वानाच एक मजेशीर अनुभव आला असेल. आपला मित्र एखादा छान वासाचा पर्फ्यूम वापरतो. आपल्याला तो पर्फ्यूम आवडतो, आपणही आपल्यासाठी तो विकत आणतो. मग मोठय़ा उत्साहाने तो आपल्या अंगावर फवारतो, पण.. आपल्या पदरी थोडी निराशा येते. आपल्या मित्राच्या अंगाला येणारा सुगंध आता आपल्या अंगावर मात्र वेगळा कसा काय वाटतो, याचं आपल्याला आश्चर्य वाटतं; पण त्यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही. याचं मुख्य कारण म्हणजे, आपलं आणि आपण अंगावर मारलेल्या पर्फ्यूमचं, जसं रासायनिक सूत जमेल तसा त्या पर्फ्यूमच्या सुवासात थोडा बदल होतो.
 आपल्या प्रत्येकाचा आहार आणि आहाराच्या सवयी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे व्यक्तीनुसार त्वचेत रासायनिकदृष्टय़ा थोडासा फरक असतो. काहींची त्वचा अगदी सूक्ष्म प्रमाणात आम्लधर्मी, तर काहींची किंचितशी आम्लारीधर्मी असते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा सामू भिन्न असतो. अंगावर शिडकावा मारलेलं अत्तर किंवा पर्फ्यूम, अंगातली उष्णता शोषतं आणि मग त्याची वाफ होऊन ती आजूबाजूच्या परिसरात पसरते. पर्फ्यूम जेव्हा आपल्या अंगातली उष्णता शोषतात तेव्हा पर्फ्यूमवर अनेक प्रकारचे रासायनिक परिणामही होत असतात. त्यामध्ये मुख्यत्वेकरून आपण घेत असलेला आहार, औषधं, आपल्या त्वचेमध्ये असलेली रंगद्रव्यं किंवा तेलाचा अंश आणि हो.. आपली मन:स्थिती आणि त्यानुसार शरीरात होणारे रासायनिक बदल अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. ज्याच्या आहारात चरबीयुक्त पदार्थाचं प्रमाण जास्त असतं, त्याने वापरलेल्या पर्फ्यूमचा गंध जास्त तीव्र असतो. म्हणून तर पर्फ्यूम विकत घेताना थेट बाटलीतल्या रसायनाचा वास घेण्यापेक्षा, आपल्या हातावर वापरूनच तपासायला पाहिजे. त्वचेमध्ये तेलाचा अंश अधिक असलेल्या व्यक्तीने, अगदी थोडय़ा प्रमाणात वापरलेला पर्फ्यूम दिवसभर सुगंध देत राहतो. याउलट कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तीला दिवसभरात अनेकदा पर्फ्यूम फवारावं लागतं.

प्रबोधन पर्व दुसरे सरसंघचालक – गोळवलकर गुरुजी
माधव सदाशिव गोळवलकर ऊर्फ गुरुजी (१९०६-१९७३) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अधिक संघटित करण्यात, त्याचा एक मातृसंस्था म्हणून विस्तार करण्यात गोळवलकर गुरुजी यांचा मोठा वाटा आहे. गुरुजींनी काशी विश्वविद्यालयात अल्पकाळ प्राध्यापकाची नोकरी केली असली तरी शिकवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. त्यामुळे डॉ. हेडगेवार त्यांना ‘गुरुजी’ म्हणू लागले. पुढे तेच नामाभिधान सर्वमुखी झाले. ते वयाच्या ३४ व्या वर्षी सरसंघचालक झाले. संघकार्याला पुरेसा वेळ देता यावा म्हणून त्यांनी विवाह केला नाही. भारतातील प्रत्येक प्रांताला ते वर्षांतून दोनदा तरी भेट देत असत. गुरुजींच्या सांगण्यावरूनच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘भारतीय जनसंघ’ या नावाने राजकीय पक्षाची स्थापना केली. (त्याचे आजचे रूप म्हणजे ‘भारतीय जनता पक्ष’) समाजजीवनाच्या अनेकविध क्षेत्रांत त्यांनी एकविचाराने काम करणाऱ्या संस्था उभारल्या. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’, ‘भारतीय मजदूर संघ’, ‘विश्व हिंदू परिषद’, ‘वनवासी कल्याण’, ‘महारोगी सेवा’, ‘राष्ट्रीय शिशू शिक्षण’ अशा अनेक संस्था गुरुजींच्या प्रेरणेने उभ्या राहिल्या. ‘संघ परिवार’ असा जो शब्दप्रयोग केला जातो, त्यात अशा काही संस्थांचा समावेश होतो.
सुमारे २७ वर्षे गुरुजींनी सरसंघचालक म्हणून काम केले. या काळात त्यांनी ‘हिंदूंची सामाजिक- सांस्कृतिक संघटना’ हे संघाचे स्वरूप व्यापक केले. ‘विचारधन’ या पुस्तकात गोळवलकर गुरुजींनी दिलेल्या विविध भाषणांचा समावेश आहे. यात त्यांनी प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्र याविषयीची आपली संकल्पनात्मक मांडणी केली आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि येथील सर्व नागरिक हिंदू धर्माचे पालन, किमान आदर करणारे असावेत या आग्रही मताचे गुरुजी होते. आपल्या या मताचा ते हिरिरीने पुरस्कार करत. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून कडवट टीका केली जाते.

मनमोराचा पिसारा: प्रेम, इष्क, मोहोब्बत वगैरे..
‘प्रेम’, ‘प्यार, इष्क, मोहोब्बत, लव्ह अशा शब्दांशिवाय कोणतंही फिल्मी गाणं काय, कविता, महाकाव्य किंवा थेट रामायण, महाभारत लिहिणं अशक्य आहे. प्रेमामधली शारीरिक ओढ, वासना, आर्त जवळीक, उमाळा आणि बेधुंदी पॅशन, ते आत्मिक बंध या सर्वावर सगळं जीवन कला आणि कलाकृती बेतलेल्या असतात. प्रेमातलं माधुर्य, मादकता, मदमत्तपणा, मालकीपणाची भावना यावर रचलेल्या हजारो गोष्टी वाचल्यात, पाहिल्यात आणि अनुभवलेल्या आहेत.
परंतु या सर्व भावभावना आणि तत्त्वविचारांपलीकडे एक विज्ञान आहे. संशोधनाला प्रेरणा, वाव आणि आवाहन करणारा प्रेम हा विषय आहे. अर्थातच मानसशास्त्रामधील!! डॉ. रॉबर्ट एपस्टिन (एबस्टाइन) असं या विलक्षण मानसशास्त्रज्ञाचं नाव. मुक्काम, कार्यस्थळ आणि कर्तबगारी हार्वर्ड विद्यापीठ. विषय ‘प्रेम लव्ह, रोमान्स, विवाह, विवाहातली प्रेमाची चढती-उतरणी भाजणी. बॉब एपस्टिनचं व्यक्तिगत आयुष्य ही मजेशीर आणि नवी आव्हानं स्वीकारत पुढे जाणारं. अमेरिकेत बुद्धिमान मंडळींना उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी आणि क्रमिक अभ्यासात भरपूर लवचीकता असल्याने संशोधन बहरून येते; याचा प्रत्यय येतो. बॉबनं तरुणवयात आतला आवाज ऐकून ज्यू धर्मोपदेशक (रॅबाय) व्हायचं ठरवून इस्रायल गाठलं. सहा महिन्यांत तो आवाज ‘क्षीण’ झाला आणि तो अमेरिकेत परतला आणि पंचविशी गाठल्यानंतर पदवीपूर्व शिक्षण सुरू केलं. पुढे थेट डॉक्टरेटपर्यंत थांबला नाही. मग ते सोडून ‘सायकॉलॉजी टुडे’चं संपादकत्व स्वीकारलं. सर्वत्र संशोधन, चिंतन, व्याख्यान यांचा विषय एकच ‘प्रेम’. मग संचालकपद सोडून पुन्हा संशोधन. प्रेमावर. प्रेमाबद्दल बॉबचं ब्रीद ‘प्रेम ही जीवनातली अनमोल गोष्ट आहे, जगण्याचा केंद्रबिंदू आहे. परंतु प्रेम कसं ओळखावं? कसं जोपासावं? कसं जपावं? या गोष्टीवर कोणीही, कधीही ना माहिती देत, ना प्रशिक्षण.’ आपल्या दृष्टीने ‘प्रेम’ केवळ योगायोगानं घडतं, आपला ‘आत्ममित्र’ (सोलमेट) शोधण्यासाठी आपण वणवण करतो, परंतु ‘प्रेम लाभे प्रेमळाला’ हे विसरतो. प्रेम कसं व्यक्त होतं? प्रेमात पडणं? या गोष्टी आपल्या चान्सने आयुष्यात घडत नाहीत, त्या सहज घडवून आणणंही शक्य असतं.
प्रेम आंधळं असतं, असं आपण म्हणतो. परंतु प्रेमात पडण्यासाठी डोळस असावं लागतं. डोळे उघडून जगाकडे, मोकळ्या मनानं, स्वच्छ दृष्टिकोनानं पाहावं लागतं. प्रेमात पडायला आपण उत्सुक आहोत, म्हणून आपण प्रेम शोधण्याकरिता, समोरच्या व्यक्तीकडे पाहतो का? की प्रेमात पडून आपण फसणार तर नाही ना? प्रेमात आपल्याला धोका पत्करावा लागणार नाही ना? या धास्तीने आपण जगाकडे पाहतो? अशा वृत्तीमुळे आपण प्रेमापासून वंचित राहतो.  
म्हणजे ‘प्रेम’ ही गोष्ट केवळ योगायोग नसून, नशिबानं मिळविण्यासारखी नसून, समजून, उमजून घडू शकते, घडते. ह विचार बॉबनं ठामपणे मांडला. यासाठी त्याने अनेक अभिनव प्रयोगांची प्रारूपं मांडली. एकमेकांकडे पाहणं, दृष्टिक्षेपातला अर्थ समजून घेणं, शारीरिक प्रेमापलीकडे जाणारी भावनिक गुंतवणूक ओळखण्यासाठी मनाचा कौल समजून घेणे; यासाठी हार्वर्ड विद्यापीठातून विद्यार्थ्यांवर प्रयोग केले.  प्रेमाभोवती असणारं ‘गूढ’ वलय सोडून त्यातली तर्कशुद्धता, जीवरसायनिक चढउतार यांचा हा शास्त्रीय अभ्यास मनाला थक्क करतो. मनमोराचा पिसारा फुलतो तोही असाच, प्रेमाखातर, मित्रा, तुझा आणि माझाही..
रॉबर्ट एपस्टिनवर गुगल करा, यूटय़ूबवर त्याचे प्रयोग पाहा.
डॉ.राजेंद्र बर्वे
        

Story img Loader