हायड्रोजन आणि कार्बन या मूलद्रव्यांचे अणू संयोग पावून ‘हायड्रोकार्बन’ रसायने तयार होतात. नाना तऱ्हेच्या हायड्रोकार्बन्स रसायनांची संख्या प्रचंड असून त्यांच्यापासून रसायनशास्त्रात एक वेगळा विभाग तयार होतो. पेट्रोलियम पदार्थ हे या भिन्न हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणांनी बनलेले असतात. त्या संयुगातील कार्बनची संख्या जेवढी जास्त त्यावरून त्यापासून मिळणाऱ्या पदार्थाची वर्गवारी केली जाते. हे पदार्थ ऊध्र्वपातन पद्धतीने वेगळे केले जातात. सुमारे ७५०० पदार्थ पुरविणाऱ्या खनिज तेलाला विविध तापमानाला तापवून त्यांची वाफ वेगळी केली जाते. पुन्हा थंडावा देऊन त्यांचे द्रवात रूपांतर केले जाते. पेट्रोलियम खनिज तेलातील एक आणि दोन कार्बनयुक्त रसायने बाहेर काढली की त्यापासून नसíगक वायू मिळतो. या वायूत मिथेन आणि इथेन ही वायुरूप संयुगे असतात. घरेदारे, कार्यालये उबदार ठेवण्यासाठी या वायूंचा वापर होतो. अलीकडे हा वायू पाइपद्वारा स्वयंपाकघरात पोहोचवला जातो. तीन ते चार कार्बनयुक्त हायड्रोकार्बन संयुगांच्या मिश्रणाने स्वयंपाकघरात सर्रासपणे वापरला जाणारा एल.पी.जी. (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) मिळतो. पाच ते दहा कार्बनयुक्त हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणातून खते व पेट्रोकेमिकल्स तयार करण्यासाठी लागणारे नॅफ्था हे द्रावण, पेट्रोलसारखे मोटारगाडय़ांचे इंधन, तसेच बेंझिन, टोल्वीन, झायलीनसारखी उपयुक्त रसायने प्राप्त होतात. दहा ते बारा कार्बनने बनलेली संयुगे विमानासाठी वापरले जाणारे ए. टी. एफ. (एविएशन टर्बाइन फ्युएल) तयार करण्यासाठी वापरली जातात. तेरा ते सोळा कार्बनच्या हायड्रोकार्बन संयुगांच्या मिश्रणातून दिव्यात व स्टोव्हमध्ये जळणारे केरोसीन मिळते. रेलगाडय़ा, जहाजे, ट्रक, बसगाडय़ांसाठी लागणारे डिझेल तेल सोळा ते बावीस कार्बनयुक्त संयुगांच्या मिश्रणाने प्राप्त केले जाते, तर घर्षण कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वंगणतेलात बावीस ते अठ्ठावीस कार्बनपासून बनलेली रसायने असतात. शेवटी जो घनरूप चोथा उरतो, त्याला डांबर म्हणतात. अनेक क्लिष्ट रसायनांनी व्यापलेला डांबर हा बहुपयोगी पदार्थ असून तो रस्ते, विमानतळावरील धावपट्टय़ा, नदीचे बांध यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी उपयोगास येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा