डय़ू पॉन्ट कंपनीने १९५१ मध्ये हा पॉलिस्टर तंतू बाजारात आणला. याची जाहिरात करताना पॉलिस्टर हा तंतू जगातील एक नवा चमत्कार असून या तंतूपासून बनविलेले कपडे इस्त्री न करता अनेक वेळा वापरले तरी नव्यासारखे दिसतात, असे म्हटले होते. अगदी सुरुवातीपासूनच पॉलिस्टर तंतू अतिशय लोकप्रिय झाला. १९५८ मध्ये ईस्टर्न केमिकल प्रॉडक्ट्स या कंपनीने कोडेल नावाचा पॉलिस्टर तंतू उत्पादित करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच पॉलिस्टर तंतूचा प्रसार सर्वदूर झाला. त्या वेळेस अमेरिका व युरोपमध्ये पॉलिस्टर तंतू हा इतर नसíगक तंतू आणि नायलॉन यांच्यापेक्षा स्वस्त होता. (भारतामध्ये हे चित्र सुरुवातीस याच्या बरोबर उलटे होते) या त्याच्या विशेषत्वामुळे पॉलिस्टर तंतूच्या बाजारपेठेचा आणि त्यापासून कापड बनविणाऱ्या गिरण्यांचा मोठय़ा प्रमाणावर विस्तार झाला. अमेरिकेमध्ये अगदी जुन्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणीसुद्धा पॉलिस्टर तंतूपासून कापड बनविणारे छोटे-छोटे उद्योग उभे राहिले. या तंतूपासून बनविलेल्या स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कापडाची लोकप्रियता १९७० पर्यंत वाढत गेली. परंतु १९७० मध्ये पॉलिस्टर तंतूपासून बनविलेल्या ‘दुहेरी गुंफाई’ (डबल निट) केलेल्या कापडाच्या अपयशामुळे पॉलिस्टर तंतूची प्रतिमा खूपच खराब झाली आणि हा तंतू अंगावर घालावयाच्या योग्यतेचा नाही आणि या तंतूपासून बनविलेली वस्त्रे आरामदायक नसतात, तर संवेदनशील त्वचेला त्रासदायक असतात, असे मानले जाऊ लागले. त्यामुळे पॉलिस्टर तंतू आणि त्यापासून वस्त्रे बनविणाऱ्या उद्योगांना फार मोठा फटका बसला.
परंतु फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पॉलिस्टर तंतूने पुन्हा भरारी घेतली. पॉलिस्टर तंतूचे कापूस, लोकर यांसारख्या नसíगक तंतूंच्या बरोबर मिश्रण करून वस्त्रे बनविल्यास ती स्वस्त असतातच, पण नसíगक तंतूंपासून बनविलेल्या वस्त्रांपेक्षा अधिक टिकाऊ असतात, ते धुणे सोपे असते आणि त्यांना इस्त्री करावी लागत नाही हे लक्षात आल्यावर पॉलिस्टर तंतूंचा अशा मिश्रणासाठी मोठय़ा प्रमाणावर वापर होऊ लागला. त्याशिवाय पॉलिस्टरचे सूक्ष्म जाडीचे (मायक्रो फायबर) तसेच विविध आकाराच्या छेदाचे तंतू बनवून ते आरामदायी करण्यात यश आले. यामुळे पॉलिस्टर तंतूंपासून बनवलेली वस्त्रे पुन्हा लोकप्रिय होऊ लागली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा