एका पेट्रोलियम कंपनीच्या गोदामाला अचानक आग लागली. सुरक्षेच्या दृष्टीने कर्तव्यतत्पर असलेल्या तिथल्या अधिकाऱ्यांना आगीचे कारण कळेना. त्या दुर्घटनेची ‘रुट कॉज अ‍ॅनालिसिस’ करण्यात आली. अखेरीस त्यांना ते कारण सापडले. त्या गोदामात पोटॅशियम परमॅग्नेट या रसायनाच्या गोणी साठवून ठेवल्या होत्या. त्याच्याच बाजूला असलेल्या दुसऱ्या कक्षात शीतलकाची पिंपे उभी केलेली होती. शीतलक हे मुख्यत: एथिलिन ग्लायकोल या रसायनाने बनलेले असते. जमिनीवर ठेवलेल्या एका पिंपातून शीतलकाची गळती झाली होती. ते जमिनीवरून झिरपत, घरंगळत पोटॅशियम परमॅग्नेटच्या संपर्कात आले होते त्या वेळी ‘उष्मादायी’ (एक्झोथर्मिक) प्रक्रिया घडून उष्णता वातावरणात मुक्त होऊन ज्वाला निर्माण झाल्या आणि गोदामाला आग लागली.
गाडीच्या तापलेल्या रेडियटर यंत्रणेला थंडावा देण्याचे कार्य करणारे शीतलक (कूलंट) आणि गाडीच्या ब्रेकला कार्यतत्पर ठेवणारे ब्रेकफ्लुईड दोन्ही वंगणे प्रत्यक्ष पेट्रोलियम खनिज तेलापासून तयार होत नसतात; म्हणूनच त्यांना ‘स्पेश्ॉलिटी ऑइल्स’ म्हणतात. या दोन्हींचा मुख्य घटक ‘एथलिन ग्लायकॉल’ हे रसायन असते या रसायनात योग्य ती रासायनिक पूरके टाकून त्यांची गुणवत्ता वाढविली जाते.
रेडियटरमध्ये घातले जाणारे शीतलक हिवाळ्यात गोठत नाही की उन्हाळ्यात उकळत नाही. वातानुकूलित कार गाडय़ांसाठी ते खूप उपयुक्त ठरते. वातानुकूलित यंत्रणा गंजू नये, तिथले रबर व प्लास्टिकचे भाग सुरक्षित राहावेत यासाठी हे शीतलक महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असते. या शीतलकांच्या विविध कार्यामुळे त्यांस ‘अ‍ॅण्टी फ्रीझ अ‍ॅण्ड कूलंट’ (ए.एफ. अ‍ॅण्ड सी.) असे संबोधिले जाते.
महामार्गावर ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’ अशी घोषणा सर्रासपणे आपल्या नजरेस पडते, पण भरधाव चालणाऱ्या गाडीचा ब्रेकदेखील तेवढाच महत्त्वाचा असतो. अचानक पुढे आलेल्या अडथळ्यावर गाडीच्या वेगाला आवर घालण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हा ‘थांबक’ (ब्रेक) करीत असतो. त्याची देखभाल व डागडुजी वेळोवेळी व्हायला हवी. त्यासाठी ग्लायकोलयुक्त रसायन कामी येते. ब्रेक दाबला की निर्माण होणाऱ्या उष्णतेला हे रसायन शोषून घेते व त्याच्या नाजूक भागाचे रक्षण करते. थांबकाचे घन प्रदूषणापासून रक्षण करण्याचे कार्यदेखील हे द्रव करीत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रबोधन पर्व: महिलाविद्यालयाची जरूर आहे, ती का?
‘‘महिला विद्यालय सुरू झालें, तेव्हां अशा प्रयत्नांकडे सहानुभूतीनें पाहणारीं कांहीं विचारीं मनुष्येंसुद्धां अशा संस्थेची खरोखर जरूर आहे काय, असा प्रश्न सद्भावानें करीत होतीं. त्या वेळीं उत्तर देऊन त्यांच्या मनाचें समाधान झालें नसतें. कित्येक प्रश्न असे असतात कीं, त्यांचीं शाब्दिक उत्तरें मनाला कधीं पटत नाहींत. कांहीं काळ लोटल्यावर प्रत्यक्ष नजरेला पटणारे परिणाम हींच अशा प्रश्नाला उत्तरें होत.. सरकारानें, संस्थानांनीं, म्युनिसिपालिटय़ांनीं, वगैरे केलेलीं कामें उपयोगाचीं व अधिक टिकाऊ असतात, यांत शंका नाहीं; परंतु मनुष्याच्या अंगांत जोर भरण्याला जसा त्याला व्यायाम पाहिजे, तसा समाजाच्या अंगांत जोर भरण्याला त्यालाहि व्यायाम पाहिजे. आपल्या गरजा आपण भागविण्यासाठीं धडपड केल्यानें शिक्षण मिळत असतें तें फार मूल्यवान असते. महिला विद्यालयाने स्त्रीशिक्षणाच्या बाबतींत स्वावलंबनाचा एक लहानसा धडा शिकविला आहे. प्रयत्न केला असतां आम्हांला अशा प्रकारच्या संस्था उभारतां येणें शक्य आहे, हें त्यानें सिद्ध केलें आहे.’’ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना केली. तेव्हा उपस्थित झालेल्या प्रश्नांना त्यांनी आपल्या आत्मचरित्रात दिलेले उत्तर-
‘‘उत्क्रान्तीच्या प्रवाहांत सांपडून आपण ज्या पायरीवर येऊन पोहोंचलों आहों, ती इष्ट आहे असें ज्यांना वाटत असेल त्यांनी..सावधगिरीनें प्रवाहाच्या दिशेनें पोहत जावें. ज्यांना ही स्थिति अनिष्ट वाटत असेल, त्यांनींहि उत्क्रमणप्राप्त म्हणून त्याच मार्गानें गेलें पाहिजे. ते जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनें पोहूं लागतील तर लवकरच थकून जाऊन प्रवाहाच्या वेगानें कोठें तरी जाऊन आपटतील, अगर प्रवाहांत गडप होऊन जातील. यासंबंधानें मला तर असें वाटतें कीं, मध्यम स्थितींतील आईबापांनीं मुलाप्रमाणेंच मुलींनाहि त्या वीस वर्षांच्या होतपर्यंत शिक्षण द्यावें, व प्रसंग पडल्यास आपलें व दोन मुलांचें पोषण करण्याचें समाथ्र्य त्यांच्या अंगीं आणून द्यावें व विवाहाचा प्रश्न त्यांचा त्यांजवर सोंपवून त्यांना या कामीं योग्य सल्लामसलत द्यावी.’’

मनमोराचा पिसारा: उपनिषदातील जिज्ञासा
माणसाच्या जीवितमात्र म्हणून मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. मैथुन आणि पुनरुत्पादन! असं सहज आणि स्पष्ट उत्तर मिळेल. वयात आलेल्या कोणालाही ते समजणं,उमजणं जड नाही. पैकी अन्न-वस्त्र निवाऱ्याच्या गरजा भौतिक आणि उरलेल्या दोन मनोशारीरिक! इथवर सगळं ठीक. आधुनिक काळातील मास्लोच्या ‘मोटिव्हेशन थिअरी’मधल्या तीन बेसिक गरजा असंच सुचवितात.
परंतु माणसाचा जन्म एवढय़ासाठीच असतो का? हा प्रश्न या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी असतो का? म्हणजे, ‘सारं काही पोटासाठी’ नाहीये तर या इहलोकातील, सभोवतालच्या सृष्टीचा, इतर प्राणी-पक्ष्यांचा, ऋतुचक्राचा अर्थ काय? यामध्ये माणूस म्हणून आपलं स्थान कोणतं? मी कोण? मी कशासाठी? अशा प्रश्नांची भेंडोळी त्याच्या मनात म्हणजे मेंदूत भिरभिरू लागली. पाच-सहा हजार वर्षांत माणसाच्या मेंदूमधली समजशक्ती अचानक अनेक पटीनं वाढली. कपाळामागच्या ‘प्रीफ्राँटल मेंदूमध्ये प्रचंड क्रांती झाली आणि एका अजब जाणिवेनं माणूस भारून गेला.
ही अजब गोष्ट म्हणजे ‘जिज्ञासा!’ आता जिज्ञासा म्हणजे काय? (तर शालेय आणि कॉलेजातील शिक्षणातून आज नष्ट केली जाते आहे ती. अर्थातच त्याला विविध वाहिन्या हातभार लावत आहेत हे सांगायला नको! तरुण पिढीची जिज्ञासा नष्ट झालेली नाही, ती अशा बथ्थड, सत्त्वहीन शिक्षण पद्धतीला पुरून उरली आहे) तर ही जिज्ञासा म्हणजे केवळ सृष्टीबद्दल कुतूहल आणि अचंबा नाही तर भवतालच्या जगड्व्याळ पसाऱ्याचा अभ्यास करण्याची, सृष्टीमधल्या विविध घटनांचा परस्परसंबंध वा कार्यकारणपरंपरा शोधण्याची न संपणारी, न आटलेली वृत्ती. इनडॉमिनेटेबल स्पिरिट डोळ्यांनी दिसणारं, कानानं समजणारं, स्पर्शानं ओळखता येणारं जग इतपत संवेदनांपलीकडे जाऊन सृष्टीचा पूर्ण अनुभव घेण्याची, बुद्धीच्या मदतीने तिच्या रहस्याचा भेद करण्याची जिज्ञासा वृत्ती हे मानवी जगण्याचं सर्वश्रेष्ठ श्रेयस आहे, असा भरभक्कम दावा ‘उपनिषद’ वाङ्मयानी केला. केवळ अनुभवसिद्ध प्रामाण्य, सांगोवांगी भाकड कथा (गणपती दूध पितो इ.) भिरकावून तर्क व बुद्धीच्या आधारे सृष्टी समजून घेण्याचं कार्य उपनिषदांनी केलं आणि शिकवलं.
बृहद्आरण्यक उपनिषदावर भाष्य करताना शंकराचार्य म्हणतात : न वाक्यस्य वस्त्वन्वाख्यानं क्रियान् वाख्यानं वा
प्रामाण्य अप्रामाण्यकारणं किं तऱ्हि?
निश्चित फलवत् विज्ञान उपादकत्वं
तत् यत्र अस्ति, तत् प्रमाणं वाक्यं
यत्र नास्ति, तत् अप्रमाणं (वाक्यं)
एखाद्या विधानाचा (सृष्टी निरीक्षणाचा) अर्थपूर्ण (सत्य) असण्याचा निकष कोणता? तर ते केवळ तसं दिसलं किंवा आहे म्हणून नाही. तर त्या विधानाची सत्यासत्यता पटवून घेण्याकरिता, त्याचा पडताळा येण्याकरिता मानसिक/ वैचारिक प्रक्रिया सुरू होणे महत्त्वाचे. पडताळ्याविना, कोणत्याही विधानाला अर्थ नसतो. तर्क आणि सापेक्षतेच्या निकषावरून ज्याचा पडताळा मिळतो, त्या विधानामधून ज्ञान निर्माण होते.
पडताळा, तर्कबुद्धी आणि शास्त्रीय कसोटय़ा शोधायला लावणारी जिज्ञासा वृत्ती उपनिषदातील गुरु-शिष्य संवादातून निपजते आणि विकास पावते. मी म्हणतो म्हणून मनमोराचा पिसारा फुलत नाही तर तुम्ही तुमच्या मनात पिसारा शोधता, म्हणून त्याचा पडताळा तुम्हाला येतो. नुसतेच भाषेचे फुलारे फुलवायचे नाहीयेत. पिसारा शोधायचाय, आपल्या मनात जागृत जिज्ञासेच्या जोरावर.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com