चिकूच्या झाडास वर्षभर फळे येतात. चिकूमध्ये पिष्टमय पदार्थाचे तसेच पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त असलेल्या तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असते. फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत असल्याने त्यांच्यात जैवरासायनिक क्रिया अतिशय जलद घडून येतात व फळ लगेच पक्व होऊन अल्पायुषी बनते. चिकूच्या पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात.
चिकूच्या फोडींचा लगदा करून, पेक्टीनेज एन्झाइम टाकून, दोन तास ठेवून लगदा मलमलच्या कापडातून गाळून तयार झालेला रस चिकूची पेये बनवण्यासाठी वापरावा.
चिकूच्या या रसात साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून सरबत तयार करता येते. १५ मिनिटे गरम करून, सोडियम बेन्झोएट मिसळून, र्निजतुक केलेल्या बाटल्यात भरून, हवाबंद करून साठवता येतो. याच प्रकारे घटकांचे प्रमाण बदलून चिकूचे स्क्व्ॉश व सिरप तयार करता येते.
चिकूच्या गरात साखर, सायट्रिक आम्ल मिसळून सतत ढवळत राहात मंद शिजवून घेतल्यास जॅम तयार होतो. जॅम गरम असतानाच र्निजतुक केलेल्या बाटल्यांत भरून साठवता येतो.
चिकूचा रस काढून झाल्यावर राहिलेल्या चोथ्यामध्ये मक्याचे पीठ व दूध पावडर मिसळून ते शिजवावे. यात साखर, तूप, सायट्रिक आम्ल व मीठ टाकून पुन्हा शिजवावे. गरम असतानाच पसरट ताटात ओतून थंड झाल्यावर तुकडे पाडावेत. स्वादिष्ट बर्फी तयार होते. प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून बरणीत साठवावी.
थोडय़ा पिकलेल्या चिकूची साल काढून फोडी साखरेच्या पाकात काही दिवस ठेवून व मग बाहेर काढून वाळवल्यास कॅन्डी तयार होते. ड्रायफ्रूट म्हणून त्याचा वापर करता येतो.
परिपक्व चिकूची साल काढून फोडींना गंधकाची धुरी देऊन, त्याला वाळवून, दळून त्याची पावडर तयार करता येते. या पावडरीपासून मिल्कशेक तसेच आईस्क्रीम तयार करता येते.
चिकूचा गर, मीठ, साखर, लाल मिरची, कांदा, लसूण, आले, वेलची पावडर, दालचिनी पावडर, व्हिनेगर हे घटक वापरून चिकूची चटणी तयार करता येते.
वॉर अँड पीस: आयुर्वेदीय प्रथमोपचार, तातडीचे उपचार भाग-१
मानवी जीवन जसजसे प्रगत होत आहे, तसतसे त्या जीवनातील प्रश्न वाढत आहेत. वाढत्या स्वास्थ्याबरोबर रोगही वाढत्या प्रमाणात, नित्य नवे रूप घेऊन येत असतात. कोणाच्या तरी आकस्मिक दुखण्याची बातमी आपण ऐकत असतो. हार्टअॅटॅक, मेंदू रक्तस्राव, अर्धागवात, फीट येणे, मूतखडय़ाचा अॅटॅक, रक्त कमी होणे, रक्ताची उलटी अशा गंभीर विकारांपासून जुलाब, उलटय़ा, तीव्र ताप, खोकला अशा विविध रोगांत तातडीच्या सेवेची गरज नेहमीच लागते व लागणार आहे. आजपर्यंत तातडीची वैद्यकीय सेवा म्हणजे अॅलोपॅथिक इमर्जन्सी ट्रीटमेंटच अशी समजूत सर्वाची आहे. इमर्जन्सी ट्रीटमेंट म्हणजे सलाइन किंवा ग्लुकोज चढवणे, पेनकिलर गोळ्या, झोपेच्या गोळ्या, अँटिबायोटिक देणे असे विविध उपचार केले जातात व ते उपचार बऱ्याच मोठय़ा जनतेची मोठय़ा प्रमाणात गरज भागवत आहेत. या उपचारांकरिता नेहमी पाश्चात्त्य वैद्यकांतील तज्ज्ञ डॉक्टर व त्यांची हॉस्पिटल्स यांची नितांत गरज असते. या प्रकारच्या इमर्जन्सी ट्रीटमेंटला हीच मर्यादा आहे. याकरिता काही वेगळा विचार आयुर्वेदात आहे का, याचा शोध व बोध आपण घेत आहोत. आयुर्वेदात इमर्जन्सी ट्रीटमेंट नाही. आयुर्वेदीय उपचारांचा गुण फार सावकाश येतो. आयुर्वेदात तातडीचा विचार नाही, असा चुकीचा समज जनसामान्यांमध्ये व ज्ञानी वैद्यांमध्येसुद्धा पसरलेला आहे. वैद्यवर्गानेच आमच्याकडे या-या विकारावर तातडीचे उपचार नाहीत, असे सांगून हात वर करणे बरोबर नाही. शास्त्रात तातडीचे उपचार, प्रभावी, लगेच गुण देणारे उपचार आहेत. विविध प्रकारचे विविध अवस्थांना धरून उपचार सांगितले आहेत. आम्हाला उपचार माहीत नाहीत किंवा आमच्या उपचारांनी गुण येत नाही, ही शास्त्राची चूक नाही. आम्हाला शास्त्र समजले नाही, तर शास्त्रवापरातील आमचा उणेपणा आम्ही प्रांजळपणे कबूल करून अधिक चिंतन करावयास हवे. आयुर्वेदीयांनी आपली रुग्णालये आयुर्वेदाच्याच उपचारांकरिता राबवली तर मार्ग नक्कीच दिसणार आहे. लोक अॅलोपॅथीच्या रुग्णालयात का जातात, याच्या उत्तरातच मार्ग आहे. शोधेल त्याला सापडेल!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. विठ्ठल
महाराष्ट्रातले एक अग्रगण्य विद्वान रा. चिं. ढेरे यांनी श्री विठ्ठल एक महान समन्वय असे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. त्यात मिळणारी माहिती: (१) पंढरपूरचे मूळ दैवत पुंडरीक आहे. (२) दक्षिणेतल्या यादवांचे म्हणजे गवळी धनगर जमातीचे दैवत विठ्ठल होते. (३) यादव समाजाच्या हातात सत्ता आल्यावर त्यांनी ह्य़ा लोकदेवतेला विष्णूरूप केले. (४) आणि पुंडरीकाला त्यांनी त्या विष्णू विठ्ठलाचा निस्सीम भक्त म्हणून त्याचा गौरव केला. (५) जवळच असलेल्या चिंचवनात किंवा दिंडीवनात शूद्रांची एक देवता होती, तिचे नाव रखूबाई. तिला ह्य़ा विठ्ठलाची सहचारिणी करण्यात आले. (६) संतांनी मग मूळ शंकर देवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून त्याला गोपवेष हरि किंवा विष्णूसहित शिव मानला आहे.
त्या पुस्तकात ह्य़ा विठ्ठलाच्या डोक्यावरची लेणी महावीर किंवा बुद्धाच्या डोक्यावरच्या लेण्यासारखी भासतात. आणि म्हणूनच त्या परंपरांचाही ह्य़ा विठ्ठलाशी संबंध आहे आणि ह्य़ा विठ्ठलाने डोक्यावर शंकराची पिंडी घेतली आहे. हे तर सगळ्यांना ठाऊकच असते. वैष्णवांच्या समन्वयाचा हा उत्तम नमुना आहे. यांना लोकव्यवहाराचे वावडे नाही.
विठ्ठलाला साधी सोपी भक्ती चालते. इतरत्र आणि इतर वेळी काही का असेना, वारीत सगळ्या जाती गळून पडतात. असल्या देवतेची उपासना किंवा त्याचे भजन कोणीही कुठेही करावे. समाज ऐहिक बाबतींत उत्क्रांत झाला तरी जोवर माणूस ईश्वराशी नाते जोडू इच्छितो तोवर ही विठ्ठल देवता त्याला नेहमीच उपलब्ध आहे. हे दैवत समाजाशी सन्मुख आहे आणि म्हणूनच वैष्णवांनी सामोपचाराचे धोरण धरून समाजाचे एकजिनसीकरण केले असा यथार्थ दावा करता येतो. ह्य़ा वैष्णवांचा सर्वात अलौकिक प्रतिनिधी श्रीकृष्ण. त्याने सांगितलेल्या गीतेत तुम्हाला पसंत पडू शकेल असे काहीतरी आहेच. विश्वरूप दर्शन आहे आणि त्यानंतर.
विश्वरूपाचे सोहळे। आता पुरे झाले।
होऊ देत माझे डोळे आंधळे। पण चतुर्भुज रूप दाखव तुझे।।
अशा अर्थाचे ओवी ज्ञानेश्वर सांगतात. त्यातच सर्व आले. गीता काय सांगते याबद्दल एकमत नाही. ‘पानी तेरा रंग कैसा जिसको चाहे वैसा’ अशी ही गीता. उद्या भारतातल्या दोन असामान्य आणि निराळ्या रूपातल्या वैष्णवांबद्दल.
रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com
आजचे महाराष्ट्रसारस्वत १६ डिसेंबर१९२६
प्रहसनकार बबन प्रभू यांचा जन्म. ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ ही त्यांची गाजलेली प्रहसने.
१९३३- लेखक, समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर भानुदास मांडे यांचा जन्म. लोककथा व लोकगीते यांचा विपुल संग्रह असणाऱ्या मांडे यांनी ‘लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, गावगाडय़ाबाहेर, सांकेतिक आणि गुप्त भाषा, परंपरा व स्वरूप, दलित साहित्याचे निराळेपण’ या पुस्तकांसह ‘महानुभावीय पद्यपुराण, लोकरंगकला आणि नागर रंगभूमी अशी संपादने केली.
१९३७- संत साहित्य आणि भाषा विज्ञानाचे अभ्यासक कल्याण वासुदेव काळे यांचा जन्म. ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान : स्वरूप आणि पद्धती, व्यावहारिक मराठी, संतसाहित्य : अभ्यासाची काही दिशा’ आदी ग्रंथ प्रसिद्ध.
१९६०- कोशकार चिंतामणी गणेश कर्वे यांचे निधन. ज्ञानकोशकार केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यात प्रचंड मदत केली. १९२८ च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्रीय कोश मंडळाची स्थापना केली. याशिवाय महाराष्ट्रीय शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश अशा अनेक कोशांच्या रचनेत संपादन म्हणून त्यांनी कार्य केले. ‘मानवी संस्कृतीचा इतिहास, मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी, कोशकार केतकर’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले.
संजय वझरेकर