फळे आणि भाजीपाल्यावर प्रक्रिया केल्यामुळे त्यांची मोठय़ा प्रमाणावर होणारी नासाडी कमी करता येते. प्रक्रियेमुळे फळे आणि भाजीपाल्यामध्ये तीन-चारपट मूल्यवर्धन होते. असे उद्योग खेडोपाडी उभारल्यामुळे रोजगारनिर्मिती होते. जी फळे थेट खाण्यास योग्य नसतात, त्यांचे खाण्यायोग्य पदार्थात रूपांतर उत्तम प्रकारे करता येते. उदा. आवळा, चिंच, कोकम इत्यादी. प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक आकर्षक रंग, चव, पोत व रूपात ग्राहकांस उपलब्ध करून देता येऊ शकते. फळे, भाजीपाला व त्यापासून तयार केलेल्या प्रक्रिया पदार्थाचा वापर इतर खाद्य पदार्थात करून त्यांची चव, पौष्टिकता व बाजारमूल्य वाढवता येते. प्रक्रियेनंतर राहिलेल्या साली, चोथा, बिया यांपासून उपपदार्थ तयार करून अधिक आíथक फायदा मिळवता येतो. प्रक्रिया केल्याने मालाचे पॅकिंग व वाहतूक करणे सोयीचे व सुलभ जाते. प्रक्रियायुक्त पदार्थाच्या निर्यातीमधून मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन मिळते.
फळप्रक्रिया उद्योगासाठी योग्य असणाऱ्या जातींची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली गेली पाहिजे. प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्रीची आयात परदेशातून करावी लागते. म्हणून अशी आधुनिक यंत्रसामग्री आपल्या देशात तयार केली गेली पाहिजे. कच्च्या मालाचे कमी उत्पादन व जास्त किंमत, प्रक्रिया उद्योगांची कमी उत्पादन क्षमता व मोठय़ा प्रमाणावर आकारले जाणारे कर इत्यादींमुळे प्रक्रियायुक्त पदार्थाची किंमत वाढते. भारतातील फळप्रक्रिया उद्योग एकाच प्रकारच्या फळावर प्रक्रिया करतात. त्यामुळे फळांचा हंगाम संपला की तो उद्योग बंद ठेवतात. त्यांची उत्पादन क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही. प्रक्रिया उद्योगासाठी पुरवठा केले जाणारे अर्थसाहाय्य वेळेवर उपलब्ध होत नाही. या पदार्थाना पाहिजे तेवढय़ा प्रमाणात मागणी नसते व निर्यातीसही प्रोत्साहन मिळत नाही. म्हणून या पदार्थाच्या विक्रीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रक्रियायुक्त पदार्थाची वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांद्वारे जाहिरात देऊन प्रसिद्धी केली तर त्याबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. मूल्यवíधत पदार्थाचा दर्जा व गुणवत्तेमध्ये सातत्य राखण्यासाठी गुणवत्तेच्या सर्व प्रमाणकांचा योग्य पद्धतीने अवलंब केला पाहिजे.
वॉर अँड पीस: कोलेस्टेरॉल व संबंधित समस्या- भाग-१
चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयरोग हा संबंध सर्वानाच माहीत असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, हे पाहणे हिताचे आहे. कोलेस्टेरॉलचे ढोबळमानाने दोन प्रकार आहेत. हलक्या म्हणजे एलडीएल कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांवर पुटे चढल्यामुळे त्या अरुंद होऊन उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच याला ‘बॅड’ कोलेस्टेरॉल म्हणतात. जड कोलेस्टेरॉल म्हणजे एचडीएल. हलक्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून रक्तवाहिन्यांवर थर बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये खीळ घालतो, म्हणून त्याला ‘गुड’ कोलेस्टेरॉल म्हटले जाते. वाईट कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी केले तर हृदयविकारापासून प्रतिबंध होतो.
माझे कोलेस्टेरॉल वाढले आहे, लिपिड प्रोफाईलचे रिपोर्ट बघा, तुमच्याकडे काटा आहे का, असे सांगून बडी बडी मंडळी वजनाचा काटा तोडू पाहतात. आपल्या शरीराचे स्थैर्य, अस्तित्व प्राकृत कफावर अवलंबून आहे. तो फाजील प्रमाणात वाढला की अग्निमांद्य, लालास्राव, आळस, जाडय़, पांडुरता, गात्रशिथिलता, अतिनिद्रा उत्पन्न करतो. मांसवृद्धीमुळे शरीरात विविध ग्रंथी, मांडय़ा व पोट वाढणे, पोट लोंबणे, स्तन व पृष्ठभाग खूप वाढतात. अल्प श्रमाने धाप लागू लागते. ‘आपण पथ्य पाळायला पाहिजे हे कळते, पण वळत नाही.’ वैद्यकीय चिकित्सकांनी कठोर शब्दांत सुनावल्यावरच खूप कोलेस्टेरॉल वाढलेली मंडळी पथ्य पाळतात. तीन महिन्यांत बऱ्यापैकी प्रगती दाखवतात. ज्वारी, बाजरीची भाकरी, मूग, बटाटा, रताळे सोडून सर्व उकडलेल्या बिनमिठाच्या भाज्या, पूर्ण अळणी जेवण, गरमगरम पाणी यांनी वाढत्या चरबीला आळा बसतो. आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, सिंहनाद, लाक्षादि प्र. तीन, गोक्षुरादी, त्रिफळागुग्गुळ प्र. सहा दोन वेळा, रसायनचूर्ण एक चमचा बरोबर घेणे, रात्री जेवणानंतर फिरून येणे, गंधर्वहरितकीचूर्ण न चुकता घेणे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. क्रमयोग
क्रम शब्दामधला र सोडवला तर करम होते. करमणूक या शब्दाचा उगम करम+णूक असा झाला आहे. करमणूक शब्दात गंमत आनंद हे भाव दडले आहेत. याउलट उदास शब्द आहे त्यातला आस या शब्दाचा अर्थ दु:ख, पश्चात्ताप किंवा क्रोध असा दिला आहे. कृ. पां. कुलकर्णी यांच्या कोशात ‘उदास’ या शब्दाची व्युत्पत्ति उत्+आस अशी दिली आहे. उत् शब्दाचा उपयोग विचार करणे, शंका वाटणे, प्रश्न विचारणे यासाठी केला जातो. म्हणूनच उदासपणात दु:ख-पश्चात्ताप आणि क्रोधावर विचार करीत बसणे या गोष्टी अंतर्भूत आहेत. करमणे आणि औदासीन्य म्हणूनच परस्परविरोधी भाव आहेत. जेव्हा करमते तेव्हा घडणाऱ्या गोष्टी क्रमाने घडतात आणि तो क्रम सुखावतो. एखादा भक्त दु:ख निवारण्यासाठी, दुसरा सुख मिळविण्यासाठी, तिसरा जिज्ञासा म्हणून मला येऊन भेटतात, पण हा क्रम चौथ्या प्रकारच्या भक्तीत जेव्हा विलीन होतो तेव्हा ‘अरेच्या मीच परमात्मा परमेश्वर किंवा ब्रह्म आहे’ असा भाव तयार होतो आणि ही गोष्ट मी सातव्या अध्यायात हात वर करून आधीच सांगितली आहे, अशी ओवी ज्ञानेश्वरांनी अठराव्या अध्यायात आठवण म्हणून सांगितली आहे.
तेव्हा मग दांडेकरांच्या सातव्या अध्यायातले मुक्त भाषांतराचे गुपित उलगडते. त्यात आपण स्वत:च परमात्मा आहोत, असा विचार मनात आणून हा संसाराचा पूर पार करावा किंबहुना या पूर आलेल्या नदीच्या प्रवृत्तीच्या (म्हणजे काहीतरी करूया) काठावरच निवृत्तीचा (म्हणजे समजूतदारपणाचा) काठ लागतो आणि मग पूर आपोआपच ओसरतो, असा भाव व्यक्त झाला आहे. जर पुरात एखादा मी मी करीत पोहू लागला तर दु:ख, पश्चात्ताप आणि क्रोध आधीच वाढून ठेवलेले असतात आणि औदासीन्य मग अपरिहार्य ठरते.
मीच परमात्मा झालो हे वाक्य गर्विष्ठपणे सांगितले जात नाही. जेव्हा माणूस लहान असतो तेव्हा परमात्मा काहीतरी निराळा भव्यदिव्य असतो आणि संसाराची खळबळ अव्याहत असते तेव्हा त्या वाक्याला गर्विष्ठपणाचा वास असतो. माणसामधला मीपणा लीन झाला की उलटे होते. ते असे की तो माणूसच भव्यदिव्य होतो आणि संपतोही. पौर्णिमा होईपर्यंत चंद्र मोठा मोठा होत जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याची वाढ खुंटते आणि शुक्लपक्षच जसा नाहीसा होतो असे उदाहरण देत पौर्णिमेच्या आधीच्या त्या चंद्राच्या दशा आणि कला या भक्तीच्या पहिल्या पायऱ्या असतात, त्या अनुक्रमणिकेत (क्रमयोगात) मी ब्रह्मच आहे ही शेवटची पायरी असते आणि वर शिवाय खालच्या पायऱ्यासुद्धा माझीच निर्मिती असते असे जेव्हा श्रीकृष्ण म्हणतो तेव्हा तो शेवटी सगळेच ब्रह्मातून अवतरतात असे बजावून सांगत असतो. हे जे ब्रह्मातून येते ते कर्म असते. त्याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
आजचे महाराष्ट्रसारस्वत ११ नोव्हेंबर
१८५१ > पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, वेद, पुराणे, इतिहास यांचे चिकित्सक अभ्यासक राजारामशास्त्री रामकृष्ण भागवत यांचा जन्म. विधवाविवाह सशास्त्र की अशास्त्र, ब्राह्मण व ब्राह्मणी धर्म, मोगल व मोगली धर्म, पार्सी व पार्सी धर्म, हिंदुस्थानचा छोटा इतिहास, मराठी भाषेचे लहानसे व्याकरण आदी ४० पुस्तके त्यांनी लिहिली होती.
१८६६ > श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी, म्हणजेच ‘शाहीर पठ्ठे बापूराव’ यांचा जन्म. वग, गौळणी, पदे, कटाव, झगडय़ाच्या लावण्या, भेदिक लावण्या असे सारे प्रकार हाताळणाऱ्या बापूरावांच्या लावण्यांची संख्या दोन लाख असल्याचे म्हटले जाते, परंतु पुस्तकरूपाने त्यांच्या फार कमी रचना आज उपलब्ध आहेत, त्याही विविध संकलनवजा संग्रहांमधूनच.
१९११ > ‘लोककवी मनमोहन’ ऊर्फ गोपाळ नरहर नातू यांचा जन्म. युगायुगांचे सहप्रवासी (१९४६) हा त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह, त्याआधी त्यांचे ३ संग्रह प्रकाशित झाले होते. पुढे ते भावकाव्याकडे आणि गद्य लेखनाकडे वळले. त्यांच्या कवितांचे ‘आदित्य’ हे संकलन १९७१ साली शंकर वैद्य यांनी संपादित केले, तर १९९१ साली मनमोहन यांचे निधन झाले.
संजय वझरेकर