फळे आणि भाजीपाल्यावर प्रक्रिया केल्यामुळे त्यांची मोठय़ा प्रमाणावर होणारी नासाडी कमी करता येते. प्रक्रियेमुळे फळे आणि भाजीपाल्यामध्ये तीन-चारपट मूल्यवर्धन होते. असे उद्योग खेडोपाडी उभारल्यामुळे रोजगारनिर्मिती होते. जी फळे थेट खाण्यास योग्य नसतात, त्यांचे खाण्यायोग्य पदार्थात रूपांतर उत्तम प्रकारे करता येते. उदा. आवळा, चिंच, कोकम इत्यादी. प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक आकर्षक रंग, चव, पोत व रूपात ग्राहकांस उपलब्ध करून देता येऊ शकते. फळे, भाजीपाला व त्यापासून तयार केलेल्या प्रक्रिया पदार्थाचा वापर इतर खाद्य पदार्थात करून त्यांची चव, पौष्टिकता व बाजारमूल्य वाढवता येते. प्रक्रियेनंतर राहिलेल्या साली, चोथा, बिया यांपासून उपपदार्थ तयार करून अधिक आíथक फायदा मिळवता येतो. प्रक्रिया केल्याने मालाचे पॅकिंग व वाहतूक करणे सोयीचे व सुलभ जाते. प्रक्रियायुक्त पदार्थाच्या निर्यातीमधून मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन मिळते.
फळप्रक्रिया उद्योगासाठी योग्य असणाऱ्या जातींची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली गेली पाहिजे. प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्रीची आयात परदेशातून करावी लागते. म्हणून अशी आधुनिक यंत्रसामग्री आपल्या देशात तयार केली गेली पाहिजे. कच्च्या मालाचे कमी उत्पादन व जास्त किंमत, प्रक्रिया उद्योगांची कमी उत्पादन क्षमता व मोठय़ा प्रमाणावर आकारले जाणारे कर इत्यादींमुळे प्रक्रियायुक्त पदार्थाची किंमत वाढते. भारतातील फळप्रक्रिया उद्योग एकाच प्रकारच्या फळावर प्रक्रिया करतात. त्यामुळे फळांचा हंगाम संपला की तो उद्योग बंद ठेवतात. त्यांची उत्पादन क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही. प्रक्रिया उद्योगासाठी पुरवठा केले जाणारे अर्थसाहाय्य वेळेवर उपलब्ध होत नाही. या पदार्थाना पाहिजे तेवढय़ा प्रमाणात मागणी नसते व निर्यातीसही प्रोत्साहन मिळत नाही. म्हणून या पदार्थाच्या विक्रीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रक्रियायुक्त पदार्थाची वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांद्वारे जाहिरात देऊन प्रसिद्धी केली तर त्याबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. मूल्यवíधत पदार्थाचा दर्जा व गुणवत्तेमध्ये सातत्य राखण्यासाठी गुणवत्तेच्या सर्व प्रमाणकांचा योग्य पद्धतीने अवलंब केला पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा